Friday 1 April 2022

#सण_सुट्टी_माहेरपण



  आमची दोघींची लग्न झाली, आई-बाबा दोघंच!! रोजचा स्वयंपाक आटोपशीर , 'उराऊर' नको ; या पद्धतीने व्हायला लागला. तसं दोघांनाही मधुमेह नसल्याने, इतरही तब्येतीचे त्रास नसल्याने पथ्यपाणी काही नव्हतं. वजन आटोक्यात ठेवणे ... हे एकमेव पथ्य पाळायची आईची सूज्ञ धडपड भजी, गोडाच्या गोष्टी .. यांना लांब ठेवणारी झाली.


   बाबांना गोड पदार्थ... विशेषतः श्रीखंड अतिशय आवडीचे!! रोज सुद्धा खातील इतकं प्रेम!! अतिरेक टाळण्याची आईची शिस्त असल्याने सणवार असले तरच श्रीखंड, जिलेबी ची वर्णी लागत असे! बाबा वाटच पहात असायचे .... मी किंवा ताई माहेरी जाणार असलो म्हणजे गडबड करायला सुरुवात!! 


   मुलींसाठी, नातवंडांसाठी तरी आणाला हवं! ... असं म्हणत 'हे' स्वतः साठीच श्रीखंड, कोथिंबीर वड्या, फाफडा , भजी वगैरे आणतात. अशी तक्रार एकदा तरी आई करीत असेच आम्ही गेलो की! (तिला समोसा अतिशय आवडतो , तो सुद्धा आणलेला असायचा .. याकडे कानाडोळा 😉)


  हळूहळू ताई आणि मी सणावारी जाण्याऐवजी सुट्टी.. रविवार, मे महिना इतपतच जाऊ लागलो. आमचे सांसारिक व्याप , नोकऱ्या , मुलांच्या शाळा -परीक्षा .. यांमुळे ते सहाजिकच होतं. आई-बाबा पण मुंबईत नसायचे. बरेचसे सणवार आई-बाबा गुहागरला साजरे करू लागले. अति पावसाचे तीनेक महिने वगळले तर दोघं गुहागरलाच जाऊन येऊन असतं. बाबा गेले, तोवर हा क्रम होताच.


   नंतर आई एकटी असायची... तिला सणाच्या दिवशी एकटी ठेवायचं नाही, असं आम्ही बहिणींनी न ठरवता ठरवून टाकलं होतं. ती आमच्या दोघींपैकी कुणाकडे किंवा आम्हीच तिच्या कडे!! .. असं करू लागलो. कोण कोणाकडे गेलं हा मुद्दा नसतो ... जिथं आई तिथं 'माहेरपण' असा अलिखित नियम असतो. 

  

  आता सणवार , माहेरपण आणि गोडधोड -चमचमीत असं समीकरण देखील संपलंय. आईला वयानुसार, तब्येती नुसार बरेच पथ्यपाणी सुरू झाले आहे. श्रीखंड आवडीने खाण्याची परंपरा माझ्या लेकाने चालवली आहे. त्याची ही आवड ताईने छान गाठीला बांधून ठेवली आहे! आम्ही ठाण्यात किंवा ती आमच्या कडे यायची असली की 'स्वाद' मधलं श्रीखंड हमखास तिच्या तर्फे ठरलेलं असतं!  


   वयाने वडील.. मोठं भावंडं आपोआपच पालकत्वाची जबाबदारी का घेत असावेत? ताई जवळजवळ सात वर्षे वडील आहे, पण ती जणू काही आधीच्या पिढीत आहे.. असं कसं काय वागू लागते? किंवा.. आई, ताई असल्या की मला. 'ह्हा , रिलॅक्स' .. असं का राहू वाटतं!! 


   नाती , बदलणाऱ्या भूमिका, जबाबदारी घेणं किंवा स्वतः कडे सानपण घेऊन निर्णय थोरल्यावर टाकून निर्धास्त, मजेत पाय हलवत बसून रहाणं!! सगळं कुतूहल कारक आहे.  


   आजुबाजुला नाती असावीत. आपल्या पेक्षा मोठी माणसं असावीत आणि आपल्यालाही थोरलेपणा घ्यायला मिळावा. सगळ्या चक्रातून फिरता यायला हवे.