Sunday 24 May 2020

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग१२
 गोवर्धनदास यांनी बाबांना शांत रहायला सांगितलं. मिटिंगमध्ये फक्त आणि फक्त ऐकण्याचं काम करायचं. ना चिडायचं ना इमोशनल व्हायचं ना अपराधी भाव मनात ठेवायचे! सगळं ऐकून 'ठिक आहे, विचार करून कळवतो.' एवढंच बोलून यायचं.
  काकांनी सुद्धा बाबांना जवळपास असाच सल्ला दिला. डोकं थंड ठेव हा मुख्य सल्ला होता.😀
  मिटिंगला बाबांबरोबर गोवर्धनदास यांचे एक स्नेही गेले होते. मला त्यांचं नाव आठवत नाही. ते आर्किटेक्ट आणि वकील होते. मांजरेकरांच्या पुतण्याने 'आमचं कुटुंब त्यांच्या (मांजरेकर मामांच्या) एकट्यावर अवलंबून आहे' असा दावा केला. तसंच कामगार जर कामावर ..साईटवर असताना जखमी झाला , मृत्यू पावला वगैरे तर मालकावर /कंपनीवर थेट जबाबदारी असते. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी लागते. कायद्यात तशी तरतूद आहे. असं पुतण्या चं म्हण्णं होतं. त्याच्या वकिलाने पाच लाख रुपये नुकसानभरपाई ची मागणी केली.
   बाबा म्हणाले की त्या दिवशी ते घरी कसे पोहचले ते त्यांचं त्यांना माहीत! हात पाय कापत होते. हृदयाची धडधड दुप्पटीने होत होती. संध्याकाळी काका , बाबा खूप वेळ बोलत बसले होते. पुढचे अनेक दिवस, महिने काका गिरगावात खूप उशिरा पर्यंत थांबायचे. पार शेवटच्या गाडीने बोरीवलीला परत जायचे. सतत बाबांबरोबर थांबायचे. नंतर एकदाच काकांनी बोलता बोलता म्हटलं की 'मी थांबाचो ...याचा काय भरवसा? भलतं सलतं डोक्यात घेतलंन , इकडे तिकडे निघून गेला ...त्याला आपल्या डोळ्यासमोर गुंतवून ठेवला पाहिजे एवढं माझं मी ठरवलं होतं.'
   नंतर या सगळ्या गोष्टी वर गोवर्धनदास , त्यांचे स्नेही , कंपनी (ज्यांची मुख्य साईट होती) चा एक लिगल अॅडव्हायझर आणि पै काका पण यांच्या चर्चा झाल्या. कोर्टात न जाता बाहेर सेटलमेंट झाली तर बरं ...यावर सगळ्यांचं एकमत होतं.
  पुतण्या खोटं बोलत होता हे नक्की. कारण मांजरेकर मामांची पत्नी काही वर्षांपूर्वी वारली होती आणि त्यांना मूलबाळ नव्हते. ते स्वत:च्या घरात दोन मित्र म्हणा, गाववाले म्हणा .. यांच्या बरोबर रहात. तेच लोक अंत्यसंस्काराला पुतण्या व भावा बरोबर होते. पुतण्याचा आणि भावाचा जेवढ्यास तेवढाच संबंध होता. पण माझे बाबा 'हिरो' ..पुतण्या 'व्हिलन' ..मग कोर्टात हिंदी सिनेमा इष्टाईल आरोप-प्रत्यारोप होऊन बाबा जिंकले ..असं व्हायला आयुष्य काही हिंदी सिनेमा थोडाच होता? 😄
   कोर्टात काहीही होऊ शकतं. केस कितीही वर्ष चालू शकते. जेव्हा मांजरेकरला अटॅक आला तेव्हा काम बंद होतं, लंच ब्रेक होता. त्या दिवशी मुळातच कामाला हातही लावला नव्हता मांजरेकरांनी. अर्धा दिवस उलटला आहे..रोज पूरा मिळणार नाही , तुम्ही आराम करा , उद्या या ...वगैरे संवाद सर्वां समक्षच झाला होता. ही बाबांसाठी मोठी जमेची बाजू होती. तरीही मनस्ताप टाळण्यासाठी समझौता करण्यावर भर द्यायचं ठरलं.
  पुतण्याने मागितलेली रक्कम देणं तर निव्वळ अशक्य अशक्यच होतं. बाबांना जीवाला तोच घोर लागून राहीला होता. दोन्ही मुलींची शिक्षणं बाकी , आई तर निवृत्ती घेऊन बसली होती! व्यवसायाचा पसारा मांडला होता. दिवसा गणिक गरजा वाढत होत्या.. महागाई वाढत होती.
   त्यांचं मनस्वास्थ्य साफ बिघडलं. ते पूर्ण नास्तिक होते वा काय मला माहित नाही ..पण जप , नामस्मरण केल्याने आणि देवाचा धावा केल्याने संकट टळत नाही हे ज्याला पक्कं ठाऊक आहे ..असा प्रचंड practical माणूस होता तो!!! अशा प्रसंगात देवावर विश्वास नसणाऱ्यांची खूप खूप मोठी परीक्षा असते. सगळी कडून आधारच नाहिसा होतो ...ज्या स्वत:वरच्या दूर्दम्य विश्वासावर सगळं उभं केलेलं असतं तो विश्वासच जर हलला गेला तर काय होईल?
   त्यांची सिगरेट वाढली , चहा वाढला. वजन घटलं , केसही पांढरे होऊ लागले भरभर. कोणा कोणाला चालल्या प्रकाराची कुणकुण लागली की त्यांचे चौकशी ला फोन येत. असे फोन घेतले , बोललं की त्यांना अधिकच नैराश्य येई.
  गोवर्धनदास काकांच्या सल्ल्या प्रमाणे ते रोजच दिवसभरातील महत्त्वाच्या गोष्टी, घटना लिहून ठेवत होते. मग बाबांनी त्याच चोपडीच्या (बिझनेसवाले लोक बरेचदा वही ला (notebook) 'चोपडी' म्हणतात.😄 ) शेवटच्या पानावर स्वत: साठी काही तरी सकारात्मक लिहायला सुरुवात केली. उदाहरणार्थ : माझ्यावर पाच पैशांचही कर्ज , उधारी आज घडीला नाही.
Yess ..😀 this was a positive thought 👍
मग यात भर पडू लागली , माझा भाऊ माझी बहीण मला धीर देतात. माझी बरीचशी माणसं (😢) अजूनही माझ्या बरोबर आहेत...
माझी पत्नी समजूतदार आहे, माझ्या बरोबर खंबीरपणे उभी आहे.
मुली शिक्षणात हुशार आणि समंजस आहेत. वगैरे!!
   त्यांनी या काळात 'positive thinking'. या विषयावरील पाच पंचवीस पुस्तकं वाचून काढली. सतत मनाला उभारी मिळावी म्हणून जे करता येईल ते केलं. आम्हाला 'लघुरुद्र घाला , उपवास धरा , गुरू शोधा' असे पुष्कळ सल्ले मिळाले. आई-बाबांनी या प्रेमळ सल्ला देणाऱ्यांची मने कधीच दुखावली नाहीत पण आई म्हणते ..आमचं अशा गोष्टींत मनच रमलं नाही..कराव्याशा वाटल्याच नाहीत तर जूलुमाचा रामराम हवा कशाला?  नाही म्हणायला आई दर शुक्रवारी काळ्या रामाच्या देवळात तेवढं जायची. एक गजरा देवीला वहायची.
  बऱ्याच मिटिंगज् झाल्या. गोवर्धनदास यांचे स्नेही हुशार होते. त्यांनी एका फार मोठ्या आणि नावाजलेल्या वकिलांच्या वांद्रे येथील मोठ्या आॅफिस मधे फायनल मिटिंग ठरवली. पुतण्या , त्याचा वकील , बाबा आणि ते स्नेही असे मिटिंगला गेले. बाबा म्हणाले...तो माणूस म्हणजे प्रचंड आत्मविश्वास!! एक एक करत तो पुतण्याच्या वकीलांशी कायद्याच्या अगम्य भाषेत बोलत होता...त्यांना निरुत्तर करत होता.कोर्टात जाणं तुम्हाच भारी पडेल , त्यापेक्षा अनुकंपा म्हणून खरे देऊ करत असलेली रक्कम चर्या निवांत !! हे सहज गळी उतरत होता त्यांच्या!! त्या कायदेशीर भाषेतलं मला काही जरी कळत नव्हतं तरी मला अचानकच अवघड पेपर सोप्पा वाटायला लागला! इतके दिवस उगाच मी चिंता केलीसं वाटून मला मानेवर केस उभे राहिले. माझ्या ही नकळत माझे ओठ छोटं हसू येऊन ताणले गेले आणि डोळेही चुरचुरीत होते! 😄
  पुतण्या व त्याचा वकील तोंड पाडून होते पण तरी पैशांवर तडजोड ही केलीच त्यांनी!! पाच लाखावरून थेट पन्नास हजारांवर 😂😂 त्यांनी सगळं आवरतं घेतलं.
  वांद्र्याच्या या (बहुतेक कुलकर्णी साॅलिसिटर्स ..नाव नक्की आठवत नाही) वकीलांनी या तीन तासांच्या मिटिंगची सात हजार रुपये फी घेतली. 😄
बाबांनी मग काही दिवस चक्क नोकरी केली ...त्यांच्या माणसां सकट त्यांना नोकरी दिली तरी कोणी? मग तिथे पुढला वाढदिवस कसा साजरा झाला? 😂😂😂 हा किस्सा ऐकायचा आहे का तुम्हाला?
#PradnyaSubodhAhire.


   
 
 

  
#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग११

 बाबा, काळेले दोघं धावत फाटकातून आत गेले. गोवर्धनदास यांनी गेट जवळच्या इंटरकाॅम वरुन वरच्या office मधे काॅल केला आणि कंपनीचा डाॅक्टर बोलवा वगैरे सांगून मेन officer ना पण काय झालं ते कळवलं!!
  बाबांना माणसांनी सांगितलं की सगळे बसले , बोलत होते आणि एकदम मामा छाती दुखते दुखते करत आडवा झाला. तोंडावर पाणी मारलं , हात चोळले ... काही उपयोग नाही. बाकी officer , कंपनी डॉक्टर येऊन पटापट ambulance बोलाऊन पुढच्या वीसेक मिनीटात जवळच्या हाॅस्पिटल मधे नेलं. तिथे डाॅक्टरांनी सांगितलं की काही करता येणार नाही. मॅसिव्ह हार्टअटॅक...आॅन द स्पाॅट गेले. 😑
  सगळं वातावरण पालटलं. वाईट वाटतं होतं , मांजरेकर मामांच्या घरी कळवायचं तर फोन वगैरे नव्हता. बाबांनी त्यांच्याच दोन माणसांना स्वत: घरी जाऊन निरोप द्यायला पाठवलं.
   कंपनीतले officer , पोलिस , गोवर्धनदास सर , हाॅस्पिटल , डेथ सर्टिफिकेट देतानाचे सोपस्कार या सगळ्यात बाबांचा उरलेला वाढदिवस संपून गेला. मांजरेकरचा पुतण्या , भाऊ आणि काही जण आले. सगळे विधीवत आटोपून "काही लागलं तर कळवा" सांगून बाबा एकदाचे घरी निघाले.
   गोवर्धनदास साहेब दुपार पासून बाबांसोबतच होते. त्यांनी बाबांना स्वत:च्या गाडीने घरा पर्यंत सोडलं. तू खूप जास्त काळजी करतोस खरे ! आणि खूप चूकीच्या ठिकाणी ओवर रिएक्ट पण करतोस. एवढा नरम दिल कामाचा नाही. जे झालं त्यात तुझा काय मिस्टेक आहे का? मऊ लागलं की लोक कोपराने उकरणार! तुला कसली गरज लागली तर मला सांग. आणि आज पासून एक एक गोष्ट जी होते , कोणाचा काॅल आला , कोण तुला काय बोलला ...एव्हरीथिंग तू नोट डाऊन कर.
   असे चमत्कारीक सल्ले गोवर्धनदास साहेबांनी का द्यावेत ? हे समजण्या एवढी शारीरिक, मानसिक शक्ती बाबांना नव्हती. ते दुपारपासून उपाशी , उभ्या-उभ्याच धावपळ , चिंता , मदत सगळंच करत होते. मोठा सुस्कारा सोडत आणखी एक सिगरेट पेटवत ते म्हणले "मी जरा जास्तच कडक सूनावलं मांजरेकरला" ते ऐकल्या बरोबर गोवर्धनदास साहेब ताडकन उठून बोलले , तू हे वाक्य आयुष्यात परत एकदा जरी बोललास तरी तू , तुझं संसार , तुझी पत सगळं डूबवशील. माझं ऐक पोरा ...एकच लक्षात ठेव .. जिंदगी कोणाच्या हातात नसते. जे झालं त्यात तुझी काही चूक नाही हे दिमागमधे फिट्ट कर. 
   त्यांनी आईला त्याच सूचना दिल्या की कोणाचा फोन आला गेला वगैरे गोष्टी नोंद करून ठेवा. आईने विचारण्याचा प्रयत्न केला की हे सगळं का? कशासाठी करायचंय , बुवा काय होणार आहे? त्यावर साहेब म्हणाले की काही झालं नाही तर चांगलंच आहे. मग हसून , गप्पा मारून , मला काजू चिक्की चं पाकीट देऊन ते गेले.
   मी तर फार लहान होते ....ताई माझ्या हून सहा-सात वर्षे मोठी !! तिला गांभीर्य कळलं होतं. आई पण चिंतेत होती. बाबा मात्र रात्री थकून असे काही झोपले होते ...अगदी घोडे बेचके👍
     पुढले दोन-तीन महिने तरी ही अशी गाढ झोप त्यांच्या वाट्याला आली नाही. ...असं आई सांगते. बाबा या काळाबद्दल बोलायचे किंवा सांगायचे तेव्हा समुद्रसफर करून सुखरूप घरी पोहोचलेला सिंदबाद असाच दिसला असेल असं मला वाटायचं 😄
   शनिवार , रविवार गेला !! सोमवारी संध्याकाळी मांजरेकरच्या पुतण्याचा फोन आला ....त्याने बाबांवर आणि कंपनी वर केस करणार आहे ..असं कळवलं !! सगळं सामोपचाराने व्हावं असं वाटतं असेल तर आधी मिटिंग करूया असं म्हणाला !! 🙁
    या फोन नंतर बाबांनी सर्वात आधी गोवर्धनदास साहेब आणि नंतर गजूकाका (बाबांचा सख्खा मोठा भाऊ) यांना फोन करून घडलेल्या गोष्टी सांगितल्या. पुढले काही दिवस बाबांचं सगळंच .. सुख , चैन , केलेली चांगली कर्म , पूर्वसंचित (याच जन्मातली) , नातेवाईक , मैत्र ...सगळंच पणाला लागलं.
    कसं काय घडल्या पुढच्या गोष्टी? कोर्ट-कचेरी झाली की नाही? केस नक्की काय केली गेली? त्यातनं रस्ते कोणी कसे काढले? ...वाचत रहा.

#PradnyaSubodhAhire
#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग१०

  बाबांच्या कामाच्या साईटवर त्यांच्या वाढदिवशीच घडलेला जो प्रसंग पुढं येणार आहे ..तो त्या क्षणी चित्तथरारक वगैरे नव्हता. पण त्याचे खूप वाईट पडसाद त्यांच्या व्यवसायात उमटले, बाबांना-आईला अत्यंत मनस्ताप देणारे ठरले.
  आता व्यवसाय स्थिरावला होता. कंपनी , कामं आणि माणसं ही गाडी ठराविक गतीने पुढे पुढे जात होती. संघर्षाच्या वर्षांत , आर्थिक स्थैर्य नसणाऱ्या काळात बाबा कमी-अधिक प्रमाणात त्यांच्या अटी शर्तींवर काम करू शकले कारण माझी आई खमकी होती. ती नोकरी , घर आणि दोन मुली ..अशा तीनही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होती.
  गाठीला चार पैसे , रूळलेली व्यवसाय व संसाराची गाडी यावर विसंबून दोघांनी ठरवलं की मुलींचं आरोग्य, अभ्यास आणि संस्कार याला महत्त्व देत आईने नोकरी सोडावी. तिला पेन्शन मिळणार आहे हे कळल्यावर आजी (वडीलांची आई) म्हणाली .."वा , छान!!तुला साडी चोळी ला याच्यापुढे हात पसरायला नकोत" 😂😂 मला आणि ताईला हा प्रसंग आई अनेकदा प्रेमाने सांगायची की सासूला सुद्धा सून आत्मनिर्भर असणं महत्त्वाचं वाटलं होतं. असो ...विषयांतरा बद्दल क्षमस्व😊
   खरं असं होतं की मी फारच मस्तीखोर आणि सतत धडपडणारी आणि धावरी मुलगी होते, शाळेतून जवळपास रोज निरोप येत , ताई ला चांगले मार्क्स मिळवण्याची इच्छा होऊ लागली होती आणि वरच्या इयत्तांच्या अभ्यासात मदत लागू लागली होती. आईला office मधे increament आणि promotion तर मिळालं असतं पण... त्यापाठोपाठ त्रासदायक राजकारण येऊ घातलं होतं ज्यामुळे ती मेटाकुटीला आली होती.
  हे सर्व सांगायचं कारण एवढंच ..की आता पहिल्या प्रथमच माझे बाबा व्यवसाय आणि संसार एकट्याने पेलण्याकरीता सज्ज झाले होते. फाजिल नव्हे तर अनुभवाने आलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर , कष्टाने जमवलेल्या घडवलेल्या माणसांच्या भरवशावर त्यांनी हे करायचं ठरवलं होतं. खरं तर हे सगळं ते already करत होते ..... सायकल ला नाममात्र लावलेला हाताचा टेकू अलगद बाजूला व्हावा आणि सायकल विनासायास चालवत रहावं ...अशा सारखं होतं हे सगळं!!
   पण!! माणूस जसं ठरवतो ते आणि तसंच दर वेळेस होतं असं काही नाही 😀. एखादं वर्ष आई ने रिटायर होऊन झालं असेल. शुक्रवार होता , बाबांचा वाढदिवस होता. आमच्या कडे वाढदिवसाचं फारसं कोणाला कौतुक नसायचं ...कोणाचेच बड्डे वगैरे करायची प्रथाच नव्हती. म्हणजे केक वगैरे तर नाहीच ..पण मला कोणाचं औक्षण वगैरे केलेलंही आठवत नाही. (पुढं मग मी माझ्या वाढदिवसाला मी स्वत:च  खूप्पच खुश  रहाण्याची , मीच माझं कौतुक करण्याची प्रथा पाडली 😉😁😂. असो.)
   बाबांचा दिवस नेहमीप्रमाणे उगवला, एका मोठ्या फॅक्टरीच्या मोठ्या साईटवर बाबा सब-काॅन्ट्रॅक्टर होते. ( वेगवेगळ्या कामातील स्पेशालिस्ट वेगवेगळे काॅन्ट्रॅक्टर असतात...प्रत्येक जण मुख्य contractor कडे टेन्डर भरत असतो.) ते जरा त्रासलेही होते. ज्या वेगाने आणि वेळेत ठरलेलं काम व्हायला हवं तसं ते होत नव्हतं.
   मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टीत तरबेज असणारी वेगवेगळी माणसे कायम स्वरुपी म्हणावीत अशी होती. काही होते ..जे चार दिवस बाबांच्या साईटवर काम करत आणि पुढले दोन वा चार दिवस दुसऱ्याही एखाद्या शेटची साईट किंवा स्वत:ची घेतलेली कामेही करून येत. अशा लोकांचे 'रोज' एखाद्दोन दिवसांसाठी कापले जात नसत scalene मधे!!
   पण मांजरेकर नावाचा माणूस जवळपास आठ दिवस आला नव्हता ..त्या दिवशी आला तो ही अकरा वाजे नंतर ....बाबा कधी नव्हे ते जरा गरम झाले. ते तापट होते, पण माणसे , दांड्या , अंगावर पैशांची उचल वगैरे बाबतीत ते कमालीचे सहनशील होते. की माझं काम अडकून रहात नसेल तर 'खाली टाईम' चा वापर करा स्वत: साठी बुवा!! त्यांनी मांजरेकर मामांना जाब विचारला. तुमच्या जागी वेगळा माणूस तजवीज करावी लागते, त्या करता लोकाकडे शब्द खर्चावा लागतो ( obligation नको वाटायचं त्यांना ...कारण वेळेला आपली चांगली माणसे दुसऱ्याला द्यावीही लागतात 😄) नेमलेला मानुष्य आणि शिवाय तुमचाही 'रोज' द्यायचा ...हे मला कसं परवडणार? असा सवाल बाबांनी मामांना केला.
  मामा गयावया करून म्हणले की त्यांची तबियत बरोबर नसल्याने ते आठ दिवस आले नाहीत. फोन केला नाही कारण एक रुपयाची नाणी नव्हती PCO मधे टाकायला 🤦
    "तुमची तब्येत बरी नसेल तर तुम्ही आज पण घरी जा. .. नाही मला काही ऐकायचे नाही. आराम करा. #माझी_जिम्मेवारी_नाही.उद्या या. आज अर्धा दिवस उलटला आहे ...आजचा रोज पूरा मिळाचा नाही." 
      वरील संवाद सर्व माणसं , काळेले नावाचे सुपरवायजर यांच्या समक्ष झाला होता. नंतर काही वेळातच कंपनीतून जेवणाच्या सुट्टीचा भोंगा झाला. बाबा , काळेले , वैद्य आणि गोवर्धनदास नावाचे एक वयस्कर मोठे साहेब एकत्र गप्पा करत कंपनी बाहेर जाऊन चहा पाणी सिगरेट आणि काही बाही खाण्यात गुंतले !!! पंधराच मिनिटे झाली असतील ...तोच ओरडा आरडा , खरे शेट च्या नावाचा जोरदार पुकारा ... समोरून बाबांची माणसं ..विजय , नथू आणि महाराज ..धावत आले.
  "शेट , मांजरेकर मामाच्या छातीत कळायली. आता नाडी लागत नाही. "

😑😑😑😑😑😑😑

#PradnyaSubodhAhire


#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग९

  Contractor म्हणून स्वतंत्र लहान-मोठी कामं करतानाच वेगवेगळ्या ठिकाणी , मोठ्या कंपन्या, इंडस्ट्री, केमिकल फॅक्टरी अशा ठिकाणी सब-काॅन्ट्रॅक्टर म्हणून कामे मिळणं हे हुरुप वाढवणारं , पैसा आणि अनुभव .. दोन्ही देणारं असायचं.
  बाबांनी अगदी सुरवातीच्या काळात BPT(Bombay Port Trust) आणि हर्डिलिया केमिकल्स ...अशा आणखी ही ठिकाणी काही महिने कालावधी च्या नोकऱ्या केल्या. ते permanent झालेही असते पण त्यांना स्वत:चा व्यवसायच करायचा होता, त्यामुळे कायम नोकरीसाठी प्रयत्न केलाच नाही.
  जून्या office मधील एक सहकारी ...मिस्टर पै !! हे बाबांना अचानक ट्रेनच्या प्रवासात भेटले. 'स्लज काढण्याचे टेंडर निघत आहे.' या वर पुष्कळ चर्चा झाली. गमती गमतीत शिअर इमॅजिनेशन करत ...पण तांत्रिक दृष्ट्या अचूक पद्धतीने तेही मोठी मशीनरी / पंप न वापरता हे काम मी आणि माझी माणसं असू तर कसं करू!! हे बाबांनी पै ना समजावलं. 😊
   चार दिवसांनी 'खरे , तू हे टेंडर सिरियसली भरतो का? ' असा पै काकांचा फोन आला ; बाबांनी टेंडर भरलं ; आणि मग एका मोठ्या मुलाखती नंतर ते टेंडर आणि प्लॅन पास!!!
   कंपनी ला कित्येकपट कमी खर्चात काम करून मिळालं. पै काकांचा भाव वधारला (त्यांना कमिशन मिळालं , नोकरी च्या ठिकाणी हितशत्रू ही निर्माण झाले. 😑) बाबांना खूप आव्हानात्मक काम मिळालं. पैसे मिळाले , दांडगा अनुभव मिळाला , कल्पना प्रत्यक्षात आणू शकतो ..हा आत्मविश्वास मिळाला. पुढे सतत हे काम scalene लाच मिळत राहिलं.
   पण ...याच साईटवर बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशीच नेमका सदाशिव चा अपघात होणार होता. त्याचा जीवच जायचा !! काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
   मोठ्या पाईपलानमधे उतरून , खूणा केलेल्या काठ्या वापरून , चक्क aluminium च्या बादल्या , कंटेनर्स वापरून बाबांची माणसं घाण पाणी/ साॅलिडीफाईड झालेला कचारा / वर तरंगणारे oily chemicals वगैरे काढून टाकत. ड्रेनेज साफ करत. तोंडावर घालायला हेल्मेट असायची. ही अग्निशमनदलाकडून आणि ज्यांचं काम होतं त्या कंपनी कडूनच मिळायची.
    पाईप मधे फक्त माणसंच नाही तर बरेचदा बाबा स्वत: उतरायचे. सूचना द्यायचे , सुपरवाईज करायचे. शर्ट आणि पॅन्ट काढून माणसांच्या कपड्यांबरोबरच लटकवून देत. वाटेल तिथे कपडे लटकवल्यामुळेच  आमच्या घरात एकदा ढेकूण शिरकाव करणार होते 😂 म्हणून आई भयंकर कावली होती. बनियान आणि हाफ पॅन्ट वरच्या 'खरे शेट' ला पाहून पै काकांना त्रास वाटायचा!! पण बाबांना माणसांची काळजी असायची!! आणि ती अनाठायी नव्हती.
    सदाशिव तब्ब्येतीचा उन्नीसबीस असूनही या कामात विशेष तरबेज होता. म्युनसिपालटीच्या मैल्याच्या पाईपपेक्षा हे खूप 'बेस' आहे असं म्हणायचा. त्याला अनुभव जास्त! तोच आधी आत उतरायचा. तसाच उतरला होता. पण त्या दिवशी नक्की काय झालं ते त्यालाही कळलं नाही. तो आत गेला ...तो बाहेर येईचना!!! बाबांना लगेच गडबड जाणवली. ते पण आत होते!! आणि त्यांना सदाशिव चे केस दिसत होते खाली ..पण हालचाल दिसेना! बाबा दोरी खेचून ठरलेल्या खूणा करत होते पण हा काहीच प्रतिसाद देईना.
  बाबांना भीतीने घाम फुटला आणि घसा कोरडा पडला एवढा ..की वर बघून ओरडत होते तो आवाजही फूटेना!! आपल्या तोंडावर हेल्मेट आहे , हे लक्षात आलं आणि ते कसंबसं त्यांनी ओढून काढलं, ओरडून वर आवाज दिले.
   सिक्योरिटी गार्ड‌‌‌ साईटवर कायम तैनात असणं ..हा नियमच होता. हा गार्ड पण विशेष प्रशिक्षण दिलेलाच असतो. पुढल्या काही मिनीटात हालचाल करून बाबांना आणि सदाशिव ला बाहेर काढलं. बाबा सुरक्षित खोलीपर्यंतच उतरले होते ...प्रश्न सदाशिवचा होता.
   सदाशिव व्यवस्थित शुद्धीवर होता. त्याला खाली गेल्यावर 'पंजन्ट आॅडर' ...(chemical gas strong smell) मुळे जोरदार शिंक आली आणि नाकापासून पार डोक्यात झिणझिण्या गेल्या. हिसका बसल्याने कमरेचा बेल्ट सैल झाल्याची त्याला शंका आली. पाईपच्या दोन्ही बाजूला ..डाव्या बाजूला गुढगा , डावं कोपर आणि दूसऱ्या पायाचं पाऊल दुसऱ्या बाजूला रोऊन पट्ठा तोल सावरत न हलता-डूलता थांबून राहिला.
   दोर हलवून इशारा करायला हातच मोकळा नव्हता बिचाऱ्याचा 😄.. आणि हेल्मेट शिंकल्यामुळे बरबटून गेल्याने हा डोकं पण न हलवता स्टॅच्यू केल्यासारखा स्तब्ध राहिला 😂
   त्याला बाहेर काढला , नंतर ताण निवळला खरा!! पण सदाशिव धोकादायक डिपनेस पर्यंत पोहोचला होता , तिथे प्राणवायू कमी पडला असता , विषारी वायू वगैरे असले असते तर सगळंच कठीण होतं.
   हे वर्णन अगदी अचूक आणि तंतोतंत असेल असं नाही. घडलं तेव्हा थोडंफार कानावर पडंलंय. नंतर मी बाळंतपणात घरी रिकामी असायचे तेव्हा बाबांकडून बऱ्यापैकी संगतवार ऐकलं. तेव्हाच छान लिहून ठेवायचं का नाही सुचलं मला! 🙁 
असो.
    सदाशिव ने बाबांना दोषही दिला नाही , कामही सोडलं नाही किंवा स्वभावही सोडला नाही. 😄तो अपघात जीवावर बेतता ..तर सदाशिव चा जीव , बाबांचं करीअर , पैंची नोकरी वगैरे सगळ्यावर गंडांतर होतं!!
   बाबांचा 'असा' साजरा होणारा हा एकच वाढदिवस नव्हता!! योगायोगाने पुढेही काही वेळा नेमक्या वाढदिवसाच्याच दिवशी अशा काही गोष्टी घडल्या ...की शेवटी आई ने 'वाढदिवसाच्या दिवशी काम बंद' असा नाॅन - अपिलेबल फतवा काढला आणि आम्हाला दिवाळीच्या आसपास बाबा घरातच सापडू लागले ..😄 ऐन दिवाळीत घर उघडे पाहिजे वगैरे गोष्टी फाट्यावर मारत 😜 आमची पुणे-महाबळेश्वर वारी पण होऊ लागली.

#PradnyaSubodhAhire

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग८

  सदाशिव म्हणजे एक शेलका नमुना होता!! त्याचं वय सांगणं मुश्किल. पांढरा फटक दिसायचा. अॅनिमिक होता. डोक्यावरचा केस न् केस पांढरा , ते केसही डोक्यावर टोपलं ठेवल्यासारखे दिसायचे. डोळ्यांच्या पापण्या पण पांढऱ्या!! पांढरं भूत!!
  दारू खूप प्यायचा. डोळे दारूने आणि झोप न झाल्याने क काय ..लाल लाल दिसायचे. अवतार भूताटकी असला तरी सदाशिव चं वागणं मात्र अतिशय मर्यादशील होतं. घरी वरती शेटनी पाठवला की हळू कडी ठोकून लांब जाऊन उभा राही. आम्ही 'या आत' म्हटलं की जर्राही आवाज न करता हवी ती हत्यारं गोणपाटात गुंडाळून रस्सी बांधून घेऊन जाई.
  त्याचे हात थरथर थरथर कापायचे ....मी टक लावून बघत नवल करायचे की इतकी घट्ट रस्सी बांधता तरी कशी येते त्याला!! मला आणि ताईला छोटी बेबी , मोठी बेबी ...असं म्हणायचा पायंडा त्यानेच पाडला. 😊
   बाबांना खूप घाबरायचा. दारू पिऊन कामाला यायचं नाही ..अशी बाबांची सख्त ताकीद होती. बाबा म्हणायचे की हा दारू साठीच काम करतो xxx 😅. बाबा त्याचे काही पैसे पोस्टात टाकायचे. नाही तर सगळ्याची दारू पील म्हणायचे.
   तरी कधी कधी हा संध्याकाळी चहा च्या सुट्टीत गायब व्हायचा तो परत उगवत नसे 😄 मग बाबा घाल घाल शिव्या घालत दुसऱ्या दिवशी 😂. कामाच्या ठिकाणी बरेचदा फूटके नळ , गंजके पाईप , इतर भंगार सामान जमा व्हायचं. नियमाने याची विल्हेवाट contractor ने लावायची असते. वेगवेगळ्या प्रकारचं scrap वेगवेगळ्या प्रकारे डिस्पोज करावं लागत असे.
   या स्क्रॅप ला पाय फूटले ...की समजून जायचं ... सदाशिवची करामत आहे 😂 रद्दीचे पैसे मिळाले की हा नवटांक मारून बसेल घरीच!!! हा कयास करून ..बाबा, नथु , विजय वगैरे सगळेच हसायचे. पण दारू पिऊन साईटला यायचं नाही ...हे मात्र सदाशिव कसोशीने पाळत असे. नाही तर बाबांकडे टिकलाच नसता!
  साध्या , निरुपद्रवी सदाशिव चा बाबांच्या साईट वर विचित्र अपघात होता होता राहिला!! काळ आला होता पण वेळ आली नव्हती ...असा हा प्रसंग! सदाशिव चा जीव , बाबांची करीअर , मोठ्या कंपनीचं नाव आणि कामावरच्या माणसांचं भवितव्य पणाला लागलं ....पण पण ... यातून सगळेच सहीसलामत बाहेर ही पडले 😄
  अपघात का आणि कसा घडणार होता , कसं सगळं निभावलं ...हा प्रसंग उद्या!! 😊

#PradnyaSubodhAhire

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग७

  ट्रक चा चालक म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते पंजाब दे पुत्तर!! ...हिंदी सिनेमा चे गारूड , बाकी काही नाही. 😄 पण तसं नाही. हिम्मतलाल , मगनलाल वगैरे बाबांचे ठरलेले मालवाले होते आणि त्यांच्याच माध्यमातून काही राजस्थानी ट्रकवाले बाबांच्या संपर्कात आले. ट्रक कधी मालकीचा असायचा तर कधी भाड्याचा!!!
  मोठमोठे कडाप्पा , संगमरवरी लाद्या , ग्रॅनाईट चे ओट्याचे दगड यांच्या ट्रकमधून मुंबईत येत. धोतर किंवा लुंगी , त्यावर जाळीवाले बनियान , डोक्याला मुंडासे असायचे. अंगकाठी काटक!!
   या लोकांकडे मनगटा एवढे जाड दोरखंड , लोखंडी पुलीज् ,   फल्क्रम बदलता येतील अशा levers  वगैरे अद्भुत वस्तू (बाबा त्या गोष्टींना अद्भूत म्हणायचे 😂) असायच्या ... आणि अवजडातलं अवजड सामान हे लोक लिलया दहा मजली इमारती मधे चढवत असत.
   पवईला टाईल्स् फॅक्टरीची काही कामं , एका प्रतिथयश हाॅटेलच्या कामात मोठाल्या अवजड फर्निचर वगैरे गोष्टी चढवण्याचे काम , कडाप्पा फरशा वगैरे चे काम ....बाबांमुळे त्यांना मिळाले.
    हे लोक पैसे advance घेत नसंत कारण महागडा माल ट्रकवर असे. माझ्या वडिलांची पद्धत contract करून घेण्याची असे. समजावणं मुश्कील आहे. एखादं काम ठरलं , ते किती आणि काय स्वरूपाचं हे ठरलं की एकच काय रक्कम ठरवायची. जसं जसं काम पुढे सरकलं तसं तसं पैसेही देत जायचं... बाबांकडून हा ट्रकवाला त्याच्या कडच्या 'अद्भूत हत्यारांचा' वापर जास्त innovative पद्धतीने करायला शिकला. फक्त हे इथून ने आणि तिथे रिकामं कर ...यापेक्षा वेगळ्या प्रकारची कामं मिळवू लागला. त्याने एकदा 'प्रसाद' म्हणून लाल कापड ...(बहुदा देवी वगैरे चा प्रसाद असावा) , रेवड्या आणि अक्रोड पाठवलेले. 
   पुढे ..बाबांनी व्यवसाय बंद करून ..त्यातही मोठी महत्त्वाकांशी कामं कमी करून काही वर्ष उलटली होती. फोन नंबर्स चं तंत्र बदललं होतं. Landline आठ आकडी असायचे ते दहा आकडी झाले , landline कमी होऊन pagger mobile चा जमाना आला!!
   माझ्या घराचं शिफ्टिंग सुरू असताना मोठाले बेड , लाकडी अवजड युनिट दरवाज्यातून आणि चिंचोळ्या जिन्यातून उतरवणे आणि नवीन घरी हलवणे ...या विचारानेच नवरा , दिर गळपटले! बाबांनी "काय माहीत... संपर्क होईल क नाही, निरोप ठेऊन पहातो ...ओळखलंन माझं नाव तरी खूप म्हणाला हवं" वगैरे पुटपुटत दोन-तीन ठिकाणी निरोप-नंबर दिला.
    अक्षरशः तीन तासांत 'अजमेरवाला बोलता हूं खरेसाप! किधर पहूंचना है?' ...असा फोन आला आणि दोरखंड लावून कधी व्हरांड्याच्या मोठ्या खिडकीतून बेड, कपाट , फ्रिज , लाकडी युनिट खाली उतरले ...नव्या घरी पोहोचले ...कळलंही नाही. 😄 त्यांनी लोखंडी कपाटावरची माझी magnet वाली चिकटवायची फूलं पण सांभाळून परत कपाटाला चिकटवली. 😂. मेहुण्या सोबत भागीदारीत तीन ट्रक ,विटांचा आणि टाईल चा कारखाना वगैरे प्रगती ऐकून बाबाना ही मजा आली!!!

#PradnyaSubodhAhire

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग६

   बाबांकडे 'रामचंद्र' नावाचा सुतार होता. हा असाच अचानक scalene ने शी जोडला गेलेला कुशल कामगार! (Skilled worker)
    दारूचं आणि तंबाखू चं व्यसन! आणि तीन-चार महिने होतात की नाही ...त्याला गावी जायची सय यायची!! 😄 बाकी ची माणसं चिडवत ..."'काय रे रामचंद्र , खूप दिवसात बायकोची आठवण नाय काहाडलीस ?" 😆 की हा गोरामोरा होई 😄😄
     खूप थापा मारायचा , दांड्या मारायचा , सारखे अंगावर पैसे घ्यायचा!अंगावर पैसे घेणे म्हणजे गरज लागली की पैसे घ्यायचे आणि कामाचा पगार ठरला असेल त्यातून हळूहळू फेडायचे. बाबांना खूप त्रास व्हायचा. पण रामचंद्र नक्कीच as carpenter ...तरबेज असणार. त्याचे हजार नखरे सहन केले पण बाबांनी त्याला तोडला नाही.
   गिरगावात चाळीत आधीच जागा लहान...सामान ठेवायला , साठवणीला कपाटे घेऊन ठेवणार कुठं ती? आमच्या 'C' block च्या खोल्यांमधे तर पोटमाळा करता येणंही शक्य नव्हतं. पण रामचंद्र ने खूबीने एक लांब लाकडी युनिट बनवलं. ते दोन्ही बाजूंनी उघडून त्या सामान ठेवता यायचं! स्वयंपाकघर आणि बाहेरची खोली ...यातल्या भिंतीवर ते बसवलं. ते लाकडी युनिट नंतर आम्ही बोरीवलीच्या घरातही वापरतोय!! फक्त आता त्या युनिट ला चक्क खाली चाकं लाऊन , वरुन सन्मायका लाऊन त्याची गाडी केली आहे 😄.
    या युनिट चं काम ...लाकूड कापणे , रंधा मारणे , रामचंद्र उकिडवा बसलेला , एका कानावर पेन्सिल दुसऱ्या कानावर पेन अडवलेलं , पट्ट्या , मोठ-मोठे लाकडी सेट स्क्वेअर ✏️📐📏🔧🛠️🔨 😄 सगळं अगदी आत्ताही माझ्या डोळ्यासमोर जसं च तसं दिसतंय.
    त्याने मला खेळातली लाकडी खूर्ची बनवून दिलेली कौतुकाने. त्या लाकडी खुर्ची चा वापर विविध गोष्टी ठोकणे , अक्रोड फोडणे , 'टेकू' किंवा balancing देणे अशाही कामी झाला 😆
   मी तिथेच बसून त्याचं काम पहात राही. त्याला हवी असलेली वस्तू लांब असेल तर तत्परतेने त्याच्या हातात द्यायची , त्या प्रश्न विचारायचे! तो फक्त ऊं ऊं ..हूं हूं करायचा!! कारण तोंडात तंबाखू असायची. लाकडावर रंधा मारला की सुप् साप् आवाज येतो , पातळ सालं निघतात ...यात मी तासंतास रमायचे! 😄😄 आणखी त्याचं बघून बघून मी फर्मास नक्कल करायला शिकले!!? डाव्या तळव्यावरची तंबाखू उजव्या हाताच्या बोटाने मळायची , छान टाळी वाजवायची आणि गोळी तोंडात सरकवायची 🤦🤣🤣🤣
     पण भुसा घशात जाऊन मला त्रास झाला.मला टाॅन्सिल्स् सुजण्याची सवय! मग माझी रवानगी मुगभाटात मामाकडे झाली काही दिवस ..हे काम संपेतोवर.
    बाबांकडे काम नसलं की तो चित्रपटांच्या सेटस् वर काम करायचा. तिथं त्याचे नखरे फार कोणी सहन करत नसावं बहुतेक!!एकदा दारू पिण्यामुळे त्याला हाकललाही होता स्टुडिओ मधून. त्याला पैसे हवे असले की बाबांकडे यायचा...बाबा माणसांना तीन महिन्यांचा पास ...व्हिटी ते ठाणे , चर्चगेट ते विरार वगैरे काढून द्यायचे ..स्वस्त पडायचं !! हा पास काढायला पैसे घ्यायचा आणि गायब व्हायचा! 🤦
    बाबा चिडून शिव्या द्यायचे , माणसं हसायची , आई बाबांना म्हणायची ...तो दर वेळेस शेंडी लावतो नि तुम्ही लावून घेता!!😏मी बाबांना नंतर हसून विचारलं तेव्हा म्हणाले ...कोणाचं काय दु:ख असेल कसं कळणार? मी कधी विचारलं नाही की गावी का जातोस बा सारखा? मला माहित होतं तो पळणार तरी पैसे द्यायचो ...कारण शेट उल्लू बनतो या भरवशावर तरी तो परत येईल हे मला माहीत होतं.😊 तेव्हा हल्लीसारखे उठसूट मोबाईल नव्हते. संपर्क स्वत:हून केला तरच व्हायचा. जाऊदे ...त्या चार पैशांनी मी काय अशी माडी बांधणार होतो की वाडी विकत घेणार होतो!!

#PradnyaSubodhAhire

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग५

  नथू ने तर बरीच प्रगती केली. स्वतंत्र कंत्राटे घेत असतानाच बाबांकडे काम करत होता. त्याचा भाऊ ..जितू !! त्यालाही मुंबई ला आणायचं आणि आपल्या बरोबर कामाला लावायचं ..ही नथू ची इच्छा होती.
  जितू ला मात्र हे उन्हा-तान्हात उघडं राबणं , घाणीचे पाईप साफ करणं , टपरीवर चहा तंबाखू करत बसणं कमीपणाचं वाटत होतं. लाज वाटत होती ...पण तो ते उघडपणे बोलत नव्हता. त्याच्या देहबोली वरून हे बाबांच्या लक्षात आलं होतं पण नथू हे समजून घेऊ शकत नव्हता!!
  ही 'लाज' कुठून येते? असं शिक्षण काय कामाचं जे तुमचे हात-पाय निकामी करतं? काम ..हे काम असतं! शारीरिक कामात बुद्धी वापरावी लागत नाही ...अशी समजूत का असते लोकांची?
  जितू तरूण होता आणि त्याला office मधलं काम जास्त 'सन्मानाचं' वाटत होतं. नथू ने समजूत घालून त्याला घेऊन यावं. आणि त्याने अनिच्छेने काम करावं. असा प्रकार काही दिवस चालला.
   बाबांची , जितूची आणि नथूची सुद्धा सहनशक्ती एक दिवस संपली. 😄 मग आमच्या घरात एक मोठी चर्चा झाली. बाबा खूर्चीत , नथु स्टूलवर आणि जितू बाबांसमोर काॅटवर ...फूल्ल टेन्शनमध्ये टेकला. चहा च्या फैरी , एकीकडे बाबांचं सिगरेट ओढणं ( he was a chain smoker) आणि प्रश्नोत्तरे!!
   मी शिकलेला आहे. माझे दुसरे मित्र शिकून दुबई-मस्कत ला गेले. ते इस्त्रीचे कपडे घालतात.शर्ट पॅन्ट घालतात. खूप पगार घेतात.चांगली पितात. पिच्चर बघतात.....असे जितूचे मुद्दे होते. त्याच्या समजूती , स्वप्न ..यांचं बाबांना मनातून हसू येत होतं. पण त्याचं म्हण्णं खोडून काढणं कठीण होतं!
    एकतर....बाबा त्याचे कोण? तो केवळ मोठ्या भावाच्या शब्दाखातर बाबांसमोर बसला होता. बाबांचं ही तेच झालं होतं. समोरचा तरूण कोणी जिव्हाळ्याचा नव्हे की 'हक्काने' काही सांगता येईल!
   मग बाबांनी जितुकडे त्याच्या मित्रांची चौकशी सुरू केली. किती शिकला? कुठे काम करतो? मुख्य म्हणजे काय काम करतो? ते कष्टाचं आहे? सोप्पं आहे? किती तास आहे? कुटुंब जवळ आहे की लांब ? काॅन्ट्रॅक्ट किती ? कामाचं प्रमाण आणि स्वरूप या गुणोत्तरात पैसे मिळतात का?
   या प्रश्नांची उत्तरं .... काही त्याला माहीत होती...जी माहिती नव्हती ती बाबा त्याला अंदाजाने सांगत होते. ते त्याला पटत होतं. (नशीबाने!) गंमत म्हणजे बाबांनी जितू ला समजवण्या ऐवजी नथुला समजावण्याचा आविर्भाव ठेवला होता! 😄 कोणत्याही नोट वर office चं काम वाईट .... असं चुकूनही म्हणत नव्हते.
   नथु अस्वस्थ झाला. पण जितूला असे बरेच मुद्दे लक्षात आले ... ज्यामुळे त्याचे हवेत तरंगणारे पाय जमिनीवर घट्ट उभे व्हायला लागले होते. 'नववी' पास ...हा जितू करता पराक्रम होता नक्की !! पण नोकरी (सन्माननीय) मिळण्याच्या दृष्टीने मुंबईत हे प्लॅटफॉर्म तिकीट सुद्धा नव्हते. त्याचे मित्र सुद्धा दिवसाचे अनेक तास , अथक परिश्रमच करत होते. कित्येक जण बरेच बरेच दिवस कुटुंबियां पासून खूप लांब होते.( तेव्हा मोबाईल फोन वगैरे सुविधा नव्हत्या. महिनोन्महिने संपर्क होत नसे. पत्र एकमेकांना पोहोचेतो दोन दोन आठवडे जात )
    आता  चौथा चहाचा कप ... आणि दुसरी फेरी सुरू झाली!! जितू 'नोकरी मिळणे मुश्कील' चा राग आलापू लागला 😄 आणि बाबा 'तुला आॅफिसजाॅब मिळू शकतो' असं त्याला पटवून देऊ लागले. 😆😆
   बाहेरून दहावी , मग बारावी किंवा वायरमन , टर्नर फिटर वगैरे सारखे कोर्सेस ...आवड आणि चिकाटी असेल तर टायपिंग ( जितू नाही गेला टायपिंग साठी) असे रस्ते बाबा दाखवत होते. आणि नथु- जितू ची कळी खुलत होती.
    शेवटी .... किमान दोन-तीन वर्षे कळ काढली पाहिजे, अनुभवाचा बराच पल्ला गाठला पाहिजे. हे जितूच्या गळी उतरवण्यात बाबा यशस्वी झाले. वेगवेगळे कोर्स करायला फी भरली. ती फी जितू कामातून फेडू शकतो हे पण सुचवलं.😊जीतू तरीही सताठ वर्षे होताच कामावर!! नंतर त्याला मिळाली बाबा एकदाची मना सारखी नोकरी! हूश्श्!!
   मला आश्चर्य वाटतं की बाबा कधीही त्यांच्या माणसांच्या समस्यांमधे भावनिक गुंतवणूक होऊ देत नसंत!! अलिप्त राहून मदत करत असत. पण गुंतले नाहीत कधीच! हे कसं शक्य होत होतं? ... माहिती नाही मला.
    त्यांनी आणि माझ्या काकांनी कामावरच्या माणसांनी काही नवं शिकतो ... अमुक कोर्स करतो म्हटलं तर नेहमीच प्रोत्साहन दिलं. माणसं तयार केली , सुपरवायझर तयार झाले त्यांच्या हाताखाली!! असंही व्हायचं कधी कधी की कोणी बाबांच्या/काकांच्या पैशांनी कोर्स शिकायचे 😄 आणि for better prospects ...टांग देऊन निघुन जात !! आई बडबडली की काका-बाबा ...म्हणायचे पैसे गेले #अक्कलखाती!! 😀
    'शिकलेलं फुकट जात नाही कधीच!' हे ठरलेलं वाक्य होतं त्यांचं! तर मग आज ..इति अलम् 🙏

#PradnyaSubodhAhire

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग४

   कामाची साईट जर कोणाचं घर असेल ...रेसिडेन्शियल साईट ..तर सहसा ते रिकामं असायचं. रहात्या घरात काम असेल तर बाबा किंवा साईटचा सुपरवायजर घरच्यांना आधीच सूचना देत की महत्त्वाच्या , मौल्यवान वस्तू उचलून सुरक्षित ठेवा. उगीच त्या तुटणे मोडणे गहाळ होणे चोरी होणे वगैरे नको.
   अंधेरीला एक 'परीख ' म्हणून क्लायंटकडे नथु आणि त्याची माणसं रंगाचं , ओटा कडप्पा आणि प्लंबिंग वगैरेचं काम करत होती. बाबांच आणखी एका साईटवर काम सुरू होतं.
    अचानक परीख साहेबांचा घरी तणतणत फोन आला की घरात चोरी झालीये आणि ती नथुनेच केलीये. परीख एवढ्या मोठ्याने बोलता होते की रिसिव्हरमधून आवाज बाजूला आम्हालाही ऐकू येत होता!!!बाबांनी शांतपणे पण ठामपणे हे शक्यच नाही... माझी माणसं उचलेगिरी करणारच नाहीत असं सांगितलं. नथु आला ...तो तोंड लटकावून! म्हणाला ...त्या बाईंचे मंगळसूत्र, चेन, पायल सगळं बाथरूममध्ये पडलेलं असतं. मी त्यांना कालच बोललो की उचलून ठेवा.. आणि आज ते माझ्यावरच आरोप करतायत की मी चोरलं त्यांची पायल.
    बाबा आता चिंताक्रांत झाले. त्यांनी परत परीख यांना फोन केला आणि शांतपणे नक्की काय झालंय सांगा ..म्हणाले!मिसेस परीख यांची #एक पायल मिळत नव्हती! 🤦 बाबा म्हणाले , चोरी करायचीच असती तर एकच चांदीचं पायातलं का चोरेल तो? तेही अजून महिनाभराचं काम शिल्लक असताना? तुम्ही घरातच शोधा!
   अर्थातच ...पायल घरातच सापडली. बाबा स्वत: नथुला घेऊन परीख यांच्याकडे गेले , मिसेस परीख कडून नथुला 'साॅरी' बदवलं. आणि...., झालेल्या कामाचे ही पैसे न घेता...ते काम सोडून दिलं. मिस्टर परीख यांनी नंतरही फोन केला, ज्यांच्या थ्रू हे काम मिळालं ..ते वैद्य साहेब ही बाबांना समजावू शकले नाहीत. मि.परीख स्वत: बेजबाबदार लागले आणि कसलीही शहानिशा न करता केवळ नथु कामगार आहे म्हणून आरोप केला, scalene चं नाव खराब करायचा प्रयत्न केला. आता एवढं व्यवस्थित काम करणारा ठेकेदार शोध म्हणा त्याला! ...असा स्टॅण्ड घेऊन बाबा मोकळे झाले.
   बाबांकडे शिस्त कडक होती. बारीक रद्दी सामान काय आहे, हत्यारं ( equipments) कोणती आणि किती आहेत याची ठिक नोंद असायची त्यांच्या डोक्यात आणि नजरेत. गंजका टॅप (नळ) जरी गायब असला तरी त्यांना कळायचं....कोणा मुळे नळाला पाय फुटतात (सदाशिव 😆😆 किस्सा वाटेवर आहे 👍) हे ही त्यांना ठाऊक असे. पण त्यांची माणसं विश्वासू होती. 'आपली ' टीम , कंपनी , आपलं नाव! अशा गोष्टी तोंडाने बोलून नाही तर कृतीतून दाखवणारी होती. 😊

#PradnyaSubodhAhire
#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग_३

  नथू अबोल , बारीक अंगकाठी चा , पंधरा-सोळा वर्षांचा मुलगाच म्हणायला हवा ..असा बाबांकडे कामाला लागला. शिक्षण जुजबी पण डोक्याने हुशार! तो आधी रंगाचे हात मारायचे ..एवढंच करे!
  बाबांच्या हातात मातीचा गोळा मिळाला होता. प्लंबिंग ची कामं तर तो शिकलाच पण रंग लावण्याची त्याची आवड बघून बाबांनी त्याला बरंच प्रोत्साहन दिलं. नथू एकही शब्द तोंडातून न काढता , तासंतास सतत काम करत असे. अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती. बाबा जे जे दाखवत ते ते तो लगेच शिकत असे. तो उपजत 'जुगाड मास्टर' होता 😄 असंही बाबा म्हणायचे!
   सगळीच कामं थोड-थोडी तरी आली पाहिजेत, समजली पाहिजेत , निदान माणसांकडून करून घेता आली पाहिजेत...हे सूत्र नथूने कायम लक्षात ठेवलं. निरीक्षण महत्त्वाचं! कान डोळे आणि हात आपले गुरू!!! हा बाबांकडून मिळालेला दुसरा गुरुमंत्र!!😊
  बाबांच्या बरोबर सगळ्या महत्त्वाच्या साईट्सवर ...क्वालिटी आईस्क्रीम, हर्डिलिया केमिकल्स वगैरे ...नथू होताच. काही साईटस् वर अपघाताचे प्रसंग आले , बाबा अडचणीत सापडण्याचे प्रसंग आले ...सर्व गोष्टींचा तो साक्षीदार होता!!
  तो रंग लावण्याची कामे स्वतंत्रपणे घेऊ लागला. चक्क त्याची दोन माणसं आणली पुढे त्याने हाताखाली. नथू चा आता 'नथूशेट' झाला .😄 शिवाय बाबांकडे कामे मिळायचीच !! 
  माझ्या वडिलांनी स्वत:चा व्यवसाय बंद करतानाही धाडकन बंद केला नाही. साधारणपणे दोन वर्षाच्या कालावधीत , सर्व कामांची , माणसांची पोटापाण्याची नीट सोय लाऊन बंद केला. या अवधीत ते आमचं गुहागर चं घर बांधून घेत , डागडूजी करून घेत राहिले आणि हातातली कामे संपवत राहिले.
  नथू ला हल्ली काही वर्षांपूर्वीच कामावर अपघात झाला. पाय फ्रॅक्चर झाला आणि पायात सळी घालावी लागली. तो त्यावेळेस ज्या हार्डवेअर वाल्या बरोबर ( यांचा ग्रूप असतो , हार्डवेअर वाला , electrician, plumber , carpenter वगैरे ) काम करत होता ...त्याने जुजबी मदत केली पण हा सर्व अपघात , हाॅस्पिटल वगैरे नथूला फार खर्चिक गेलं.
  निरोप मिळाल्यावर माझ्या बाबांनी पुष्कळ आर्थिक मदत केली. ती मदत नथूने लक्षातही ठेवली आणि आदराने त्याची परतफेड ही केली. माझ्या घरचं बरंच काम त्याने करून दिलं.छोटी बेबी,  फक्त सामान आणण्यासाठी पैसे द्या. बाकी काम त घरचंच आहे. असं म्हणून निग्रहाने एकही पैसा जास्तीचा घेतला नाही.
   नथुने जितूला ..त्याच्या भावाला ही मुंबईत आणला. जितूला मात्र  'office' मधे काम करायची हौस होती. 😊 भावासाठी त्याने काय केलं? आणि 'नथुवर चोरीचा आळ' आल्याचा किस्सा ...पुढच्या भागात!!!

#PradnyaSubodhAhire


#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#दोन

  हे किस्से पुढे सांगायच्या आधी एक सांगायचं आहे...माझे
बाबा कोणी साधू-संत नव्हते. त्यांनी कामगारांचं कल्याण ...या उदात्त वगैरे हेतूने व्यवसाय केला नाही. ते स्वत:च्या कुटुंबाचं पोट भरावं , आमची भरभराट व्हावी म्हणून झटले. 😊 तेही स्वार्थी होतेच ...सगळ्यां सारखेच!! पण पापभीरू होते!! कारस्थानं , राजकारण यांपासून शंभरहात लांब!
   कामगार आहेत ... म्हणून मी आहे, माझा व्यवसाय आहे ...हेच ते नेहमी म्हणत. मला योग्य मोबदला मिळायला हवा आणि त्यामुळे मी योग्य तो मोबदला द्यायला हवा. या गणितावर त्यांनी व्यवहार केले. कामगारांचा 'माणूस' म्हणून विचार नक्की केला. पण शिस्त , काम ..यात सूट नाही दिली.
  ते तापट होते. त्यांनी माणसं शब्दशः तयार केली!! पॅन्ट वर फोल्ड करून, अंगातला शर्ट बाजूला काढून ठेऊन ते साईटवर स्वत: काम करत आणि करवून घेत. माणसांची सुटकाच नसायची!! शेटच उभे म्हटल्यावर काम ..तेही शेटचं समाधान होईल तसं करण्या वाचून पर्याय नसायचा. उन्हात , सतत साईटवर उभं राहून त्यांचा चेहरा मानेपर्यंत रापून काळा कुळकुळीत झाला होता. ते घरच्या कपड्यांत उघडे बसले की गोऱ्या धडावर काळं मडकं ठेवल्यासारखं 😂😂 दिसायचं.
   काल सूर असा लागला ..जणू काही मी माझ्या महान सहृदय वडीलांना ग्लोरीफाय करतेय! 😄 पण हे किस्से 'त्यांच्या माणसांचे , कामांचे ' आहेत. अर्थात माझे बाबा माझे लाडके असणार 😂 माझ्या नजरेत 'हिरो' असणार ..हे ओघाने आलंच ❤️ .....उद्या नथु - जितू चा किस्सा!



#PradnyaSubodhAhire
#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#एक

   माझे बाबा सिव्हिल इंजिनिअर होते. Scalene नावाची स्वत:ची कंपनी आणि प्लंबिंग काॅन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी ३२ वर्ष व्यवसाय केला.
  त्यांच्या कडेचे  कामावरचे कामगार, कामावरची हत्यारं ( पाना , हातोडी , लेवल बाटली , व्हाल , गाॅज, व्हायसर 😂) हे बघत मी मोठी झाले.
  ही माणसं वर्षानुवर्षे बाबांकडे कामाला होती. बाबांचे ठरलेले 'मालवाले' होते ...हिम्मतलाल , मगनलाल , बाटलीवाला ...अशा नावाचे !! या मालवाल्यांना  बाबांकडे टिकलेली माणसं पाहून आश्चर्य वाटत असे. सहसा रोजावर काम करणारी (daily basis वर) माणसं एकाच contractor कडे टिकून रहाणं जवळपास अशक्य असतं.
   या व्यवसायात जून ते ऑगस्ट ..तीन महिने जवळपास काहीच काम नसे! आमच्या शाळा सुरू झाल्या की बाबांची सुट्टी सुरू व्हायची ... आणि 'वसूली' रोज फोनाफोनी, चढलेले आवाज , गुजराथी, हिंदी, इंग्रजी मधून बाबांचं बोलणं! कामं नाहीत, बरेच ठिकाणी पैसे येणं बाकी आणि माणसांचे 'रोज' मात्र चालू!! माझ्या बाबांना येणारा ताण, त्यांचं चिंतातूर होऊन जाणं पाहून शेवटी आई आणि माझे काका (ते पण सिव्हिल इंजिनिअर होते) म्हणत की माणसांना जाऊ दे कुठे दुसरीकडे वा गावी ... सुट्टी करून टाकायची एखाद्दोन महिने!
  पण बाबांनी काय किंवा काकांनीही ..कायम सगळी माणसं तीन महिने कामं नसूनही रोजावर ठेवण्याची सवय सोडली नाही.म्हणायचे ... ही मी तयार केलेली माणसं आहेत, त्यांची सुट्टी करून दुसऱ्या कोणाला आयते 'कुशल कामगार' (skilled workers) देऊ? .. उद्या आलं पटकन काम ..तर परत कुठे शोधणार यांना?
  बाबांकडे काम नसतानाही माणसांचा 'रोज' चालू रहायचा. ही भर पगारी सुट्टी त्यांना मानवायची. कोणी गावी जात ...येताना आंबे , खाजे , काजू , चिंचेचे गोळे आणत! कोणी छोटी मोठी कामे मिळाली तर तिही करत. पण खरे शेट च्या एका हाकेवर परत हजर होत!
   नथुराम कामाला आला तेंव्हा पंधरा वर्षांचा होता. त्याने बाबांकडे शेवटपर्यंत काम केलं. तो स्वत: रंग लावण्याची contracts घेऊ लागला. त्याच्या भावाला ...जितू ला पण खरे शेट कडेच लावायचा... म्हणून मुंबईत घेऊन आला !! हा जितू थोडंफार शिकलेला होता...बाबांनी त्याला आणि आणखीही काही जणांना  इतर छोटे मोठे courses ...वायरमन , टर्नर फिटर वगैरे शिकायला मदत केली. जितू .. जितेंद्र नंतर एके ठिकाणी proper job करू लागला.
  एकेका माणसांचे , कामांचे कडू गोड चांगले वाईट किस्से आहेत!! नथु ,जीतू , विजय , सदाशिव , रामचंद्र , काळेले ..सगळे सांगायचा माझा विचार आहे. अर्थात रोज किंवा एक दिवस आड करून एखादी पोस्ट !!
   आवडतात का सांगा!!

#PradnyaSubodhAhire