Tuesday 26 March 2019

#एक_vote_की_किमत....... (by भारतीय नागरिक)

 निवडणूक उंबरठ्यावर आहे. कुठेही जा...मोदी विरुद्ध नॉन-मोदी.. असं चित्र दिसतंय!! विरोधक एका पक्षा विरोधात पेक्षाही एका व्यक्ती च्या विरोधात इतकी 'एकजूट ' दाखवत आहेत की ज्याचं नाव ते!

 आणखी एका गोष्टीत भयंकर एकमत आहे ...ते म्हणजे ...'मला सत्ता हवी.' या साठी आपापले पक्ष सोडून देऊन इकडे तिकडे पळापळ सुरू आहे नेत्यांची..!! किंवा..आम्ही सत्तेत राहून च सत्तेत असणाऱ्या भागीदारावर 'लक्ष' ठेवू ( पण...सत्ता सोडणार नै म्हंजे नै)

  एक पोस्ट फिरते....पक्षातले कार्यकर्ते कढीपत्त्या सारखे....फोडणीत सर्वात आधी आहूती आणि चव घेताना सर्वात आधी ताटा बाहेर..😢 बंद पुकारताना, राडे घालताना ,पकडले जाताना हे कार्यकर्ते पुढे घातले जातात ...सर / साहेब/ प्रमुख एसी ऑफिस मधे बसून असतात..!! मग 'तरूण रक्ताला संधी ' देण्याची वेळ आली की मात्र मुले , जावई , नातवंडे ( पार तिसरी पिढी😁 ) यांचाच विचार होतो. मग त्यांची बोलताना भंबेरी का उडेना?

  इतक्या उघडपणे स्वतः चा हावरटपणा सत्तापिपासुत्त्व जनतेला दाखवून निवडणूक जिंकायचं स्वप्न बघू शकतात हे नीच नेते? कसलीच चाड नाही.😒 प्रस्थापित असोत की वंचित .....कुणाकडे #नाव आहे ..तर कोणाकडे #नाक ...😫 आणि जो तो समोरच्या कडे बोटं दाखवतो आहे.

  उभे केलेल्या उमेदवारांपैकी एकाला आपण निवडू शकतो ...पण कोणाला उभं केलं जावं याची आपण निवड करू शकत नाही. मला एक्कही उमेदवार पसंत नसेल  तर '#नोटा ' चा पर्याय आहे....!! पण व्यक्तिगत मला हा पर्याय निरर्थक वाटतो. नोटा चं % वाढलं...परत निवड प्रक्रिया होणार ...असं असतं त एकवेळ ठिक होतं ....तसं काहीच होणार नाही. म्हणजे च मतदान न केल्यातच जमा!!😢

  मला वाटतं ...मतदान च नको / नोटा पर्याय घेणं ....हे दोन्हीही टाळलं पाहिजे. त्यातल्या त्यात कमी भ्रष्ट ...असा निकष लावा ..पण कोणा ना कोणा उमेदवाराला प्रत्येकाचं 'एक मत' जायलाच हवंय. तरच बरं -वाईट ..योग्य -अयोग्य  ...आवळ्या-भोपळ्याचं सरकार तयार होईल.

 जाती भेद , वंशभेद , बेरोजगारी , आर्थिक समस्या आणि दहशतवाद ....हे गंभीर प्रश्न आहेत .....आणि ते नाहीत असा एक तरी देश जगाच्या पाठीवर शोधून बघुया....बघूया कोणाला सापडतो ? पण कसाही आहे ..हा माझा भारत आहे. माझं बरचसं आटोपलंय ...पण माझ्या मुलाची तर अजून सुरुवात ही झालेली नाही..!! तो आज विचारतो....'.तू कोणाला मत देणार आई? ' आणि पुढचा प्रश्न ...जास्त महत्त्वाचा ...'का?' पहिल्या चं सोप्पं उत्तर दुसऱ्या प्रश्नाला आपल्याला विचारात पाडता कामा नये. तुमचं मत द्या ...ठामपणे द्या.... कारणासकट द्या.

  जमलं तर तुमच्या मुलांची किंवा आजूबाजूच्या मुलांची नागरीकशास्त्राची ( civics किंवा political science ची) पुस्तकं वाचून ..आपण नक्की कुठल्या निवडणूक प्रक्रियेत सामील होणार आहोत...याचा अंदाज घ्या. जेणेकरून पक्ष की नाव की उमेदवार ...हे ठरवताना सोपं जाईल.😊 सर्वाधिक महत्त्वाचा विषय सर्वात 'बोअर' आणि कमीत कमी मार्कांचा असायचा ..नै?

   गरज पडली तर सुट्टी घ्या. कामा निमित्ताने तुमचं नाव असलेल्या मतदान केंद्रापासून लांब असाल तर ...प्रवासाची दगदग करा...मतदान केंद्राबाहेर अशा पांगलेल्यांचं एखादं गेट टूगेदरच करून टाका ना? तुमच्या पुढच्या पिढीला मतदानाचं महत्त्व पटवून देण्याची सोन्यासारखी संधी दवडू नका😊

   एक वोट की किमत हम तो जानते हैं ---बाबू ....किंवा एक वोट भी बहुत बड़ी चीज़ होती है बाबू.....वगैरे वगैरे वगैरे........

#भारतीय_नागरिक

Sunday 24 March 2019

रंगोत्सव

#रंगोत्सव                  (by PRadnya )

चहुकडे रंग रंग
त्यात रंगला श्रीरंग
राधे नको गे बेरंग
लपून करीशी रसभंग

यत्न तुझे ठरति फोल
श्रीरंगाविण काय ते मोल?
प्रेमरंग ना बहरेल..
रासक्रीडा ही बेताल

आली राधा, कृष्ण ही आला
याचसाठी अट्टहास केला...
रंग रंग चढला वृंदावनाला
एकेक गोपिका , गोपही रंगला

मलाही वाटे , रंगून जावे..
मना मनांचे ठाव गाठावे..
प्रेम करावे , प्रेम करावे..
जगास गूज एक सांगावे..

छटा सात जरी इंद्रधनुच्या..
रंग पांढरा गाभ्यात ..
अथांग विभ्रम प्रेमछटांचे
कृष्णराधिका प्रणयात

सख्य , मैत्री , वात्सल्य,
भक्ती , प्रणय , रोमांच ,
अमर्याद, अनिर्बंध
प्रेमाचेच सारे बंध!!

#प्रज्ञा

स्वयंपाक घर



  स्वयंपाकघर म्हणजे माझी आवडती जागा आहे. इथले माझे सखे सोबती म्हणजे भांडी कुंडी आणि डबे. संसार मांडला तेव्हा पासून ते आत्ता पर्यंत माझ्या मधे जे बदल झाले...स्त्री म्हणून आई म्हणून ..जे जबाबदारी चं भान येत गेलं....धांदरट अल्लड मुलगी ते कर्ती जेऊ घालून समोरच्या ला समाधान देऊ शकणारी ग्रुहिणी.....या सगळ्या चं प्रतिबिंब मला माझ्या डबे-भांड्यांत बघायला मिळतं.
  आधीचे काटकसरीचे दिवस खूप काही शिकवून गेले. वाण्याकडे 'टाकून द्यायला' ठेवलेले विविध आकाराचे डबे आणि बरण्या स्वयंपाक घरातील लाकडी फळीवर येऊन बसल्या. त्यांनी खूप खूप साथ केली मला. आता जवळपास प्रत्येक डबा-बरणी बदलून चांगल्यातलं सगळं घेतलंय , लाकडी फळी ची जागा बंद कपाटाने घेतली आहे. फक्त पोहे ठेवायला अजूनही मी तोच 'वाण्या कडच्या रद्दी मधला' बरणा वापरते. 😂
  एकात एक ठेवण्या सारख्या खूप पातेल्या आहेत. शिल्लक राहिलेले अन्न पदार्थ ' काढून ठेवायच्या पातेल्या ' आणि microwave आल्यावर ' काढून ठेवाचे काचेचे सट ' छान फ्रीजमधे किंवा ओट्या कडेला आटोपशीर बसतात आणि मोठी भांडी घासून घ्यायला मोकळी होतात.
   लहान-मोठ्या मिळून पाच कढया आहेत. इतक्या काय करायच्या? ....असे आईने ही विचारले ...पण कढई अशी मैत्रीण आहे की तळायला , कोरड्याचं भाजायला , कणीक मळायला होतेच शिवाय ग्रेव्ही असो , सुखी भाजी करायची असो...त्यालाही सोईची वाटते.
   तिच गोष्ट कुकरची!! बरीच माणसे जेवायला असतील तर भात , उसळ , डायरेक्ट फोडणी चे वरण...अशा गोष्टी पटापटा मार्गी लागतात. गाजर हलवा होतो. बिर्याणी होते. मी तर शिटी न लावता गवार , तोंडली या भाज्या ,भरली वांगी ..हे ही केलं आहे कुकर मधे. 2 लिटर , 4 लिटर चे छोटे दोन कुकर , एक पाच लिटरचा आणि एक मोट्ठा सात लिटरचा कुकर असेल तर कल्पकतेने पुष्कळ व्हेज-नॉनव्हेज पदार्थ करता येतात. त्यामुळे हे चार फार लाडके आहेत माझे.
  नॉनस्टिक पँनस् शिवाय आजकाल कोणाचं पान हलत नाही 😂 . डोसे करायला एक प्यान वेगळाच ठेवायचा. त्यावर पोळ्या , परठे न करावे. त्या प्यानला अति तापला जाईल अशा साठी वापरायचं नाही. की कोटींग टिकतं आणि डोसे ही छान होतात. तो प्यान जूना होऊ लागला की पोळ्या  -पराठ्याला घ्यावा नि डोशा साठी नवा आणावा.
  डबे तर लहान-मोठे -गोल-चौकोनी -आयताक्रुती-उभे-बसके -आडवे....😂😂 ...जे म्हणाल त्या आकाराचे निघतील कोपऱ्यातल्या पिंपामधून !!! जसा पदार्थ तसा डबा....माझा मुलगा म्हणतो....आई , डब्याचा आकार पाहून माझे मित्र ओळखतात की डब्यात इडली आहे की सँडवीच की दही वडे 😂😂😂
   तर असं हे पुराण मारुती रायाच्या शेपटासारखं कितीही वाढू शकेल...पण आता थांबते. ...माझी स्वयंपाक घरातली भांडी माझ्याकडे उत्सुकतेने पहातायत...आज माझा हात कोणावर फिरायचाय आणि स्वयंपाकघरात कसला मसाला गंध दरवळायचा आहे आज......

---प्रज्ञा🙋