Sunday, 24 March 2019

स्वयंपाक घर



  स्वयंपाकघर म्हणजे माझी आवडती जागा आहे. इथले माझे सखे सोबती म्हणजे भांडी कुंडी आणि डबे. संसार मांडला तेव्हा पासून ते आत्ता पर्यंत माझ्या मधे जे बदल झाले...स्त्री म्हणून आई म्हणून ..जे जबाबदारी चं भान येत गेलं....धांदरट अल्लड मुलगी ते कर्ती जेऊ घालून समोरच्या ला समाधान देऊ शकणारी ग्रुहिणी.....या सगळ्या चं प्रतिबिंब मला माझ्या डबे-भांड्यांत बघायला मिळतं.
  आधीचे काटकसरीचे दिवस खूप काही शिकवून गेले. वाण्याकडे 'टाकून द्यायला' ठेवलेले विविध आकाराचे डबे आणि बरण्या स्वयंपाक घरातील लाकडी फळीवर येऊन बसल्या. त्यांनी खूप खूप साथ केली मला. आता जवळपास प्रत्येक डबा-बरणी बदलून चांगल्यातलं सगळं घेतलंय , लाकडी फळी ची जागा बंद कपाटाने घेतली आहे. फक्त पोहे ठेवायला अजूनही मी तोच 'वाण्या कडच्या रद्दी मधला' बरणा वापरते. 😂
  एकात एक ठेवण्या सारख्या खूप पातेल्या आहेत. शिल्लक राहिलेले अन्न पदार्थ ' काढून ठेवायच्या पातेल्या ' आणि microwave आल्यावर ' काढून ठेवाचे काचेचे सट ' छान फ्रीजमधे किंवा ओट्या कडेला आटोपशीर बसतात आणि मोठी भांडी घासून घ्यायला मोकळी होतात.
   लहान-मोठ्या मिळून पाच कढया आहेत. इतक्या काय करायच्या? ....असे आईने ही विचारले ...पण कढई अशी मैत्रीण आहे की तळायला , कोरड्याचं भाजायला , कणीक मळायला होतेच शिवाय ग्रेव्ही असो , सुखी भाजी करायची असो...त्यालाही सोईची वाटते.
   तिच गोष्ट कुकरची!! बरीच माणसे जेवायला असतील तर भात , उसळ , डायरेक्ट फोडणी चे वरण...अशा गोष्टी पटापटा मार्गी लागतात. गाजर हलवा होतो. बिर्याणी होते. मी तर शिटी न लावता गवार , तोंडली या भाज्या ,भरली वांगी ..हे ही केलं आहे कुकर मधे. 2 लिटर , 4 लिटर चे छोटे दोन कुकर , एक पाच लिटरचा आणि एक मोट्ठा सात लिटरचा कुकर असेल तर कल्पकतेने पुष्कळ व्हेज-नॉनव्हेज पदार्थ करता येतात. त्यामुळे हे चार फार लाडके आहेत माझे.
  नॉनस्टिक पँनस् शिवाय आजकाल कोणाचं पान हलत नाही 😂 . डोसे करायला एक प्यान वेगळाच ठेवायचा. त्यावर पोळ्या , परठे न करावे. त्या प्यानला अति तापला जाईल अशा साठी वापरायचं नाही. की कोटींग टिकतं आणि डोसे ही छान होतात. तो प्यान जूना होऊ लागला की पोळ्या  -पराठ्याला घ्यावा नि डोशा साठी नवा आणावा.
  डबे तर लहान-मोठे -गोल-चौकोनी -आयताक्रुती-उभे-बसके -आडवे....😂😂 ...जे म्हणाल त्या आकाराचे निघतील कोपऱ्यातल्या पिंपामधून !!! जसा पदार्थ तसा डबा....माझा मुलगा म्हणतो....आई , डब्याचा आकार पाहून माझे मित्र ओळखतात की डब्यात इडली आहे की सँडवीच की दही वडे 😂😂😂
   तर असं हे पुराण मारुती रायाच्या शेपटासारखं कितीही वाढू शकेल...पण आता थांबते. ...माझी स्वयंपाक घरातली भांडी माझ्याकडे उत्सुकतेने पहातायत...आज माझा हात कोणावर फिरायचाय आणि स्वयंपाकघरात कसला मसाला गंध दरवळायचा आहे आज......

---प्रज्ञा🙋

No comments:

Post a Comment