Friday, 15 January 2021

#तेव्हा_असं_झालं_की



 आठवणी वादळासारख्या , लाटांसारख्या  असतात. एक आली की पाठून दुसरी येते , तिसरी येते ....जाणारीला परत किनाऱ्याला आणणारी आणीक एक येते!! 


  पूर्वी एखादे रंजक पुस्तक वाचायला बसले की मन म्हणायचं ...हा एक्कच भाग वाचून ठेऊन देऊ ...परीक्षा आहे , अभ्यास आहे , गृहपाठ आहे!! मग वाचता वाचता कधी पुढल्या भागात पोहोचायचे ते कळत नसे ...मग परत म्हणायचं , नै नै ..हा आता शेवटचाच भाग वाचू! ! उरलेलं नंतर वाचू 😀


  भूतकाळातल्या आठवणींचंही असंच काहीसं होतं!! त्यात जर त्या 'रम्य बालपणीच्या' किंवा 'कर्तबगारीच्या' काळातल्या असतील तर मन परत वर्तमानात यायला खूपच खळखळ करतं! 


 तुमचा अनुभव? 


#प्रज्ञा

#तो_म्हणून_मी

  


एक जण खाणाखुणा करून बोलत होता ...समोरचा ही खाणाखुणा करून बोलत होता.


   तिसरा आला ..तो ही तसेच बोलू लागला.


 आता पहिला खूप म्हणजे खूपच वैतागला!! त्याने जवळचा एक कागद घेतला , पेन घेतले आणि त्यावर लिहिले ...


"अरे ...माझी दाढ काढलिये ,  दाढेत कापूस दाबून धरुन बस म्हणालाय डेंटिस्ट! म्हणून खूणा करतोय मी ... तुम्ही दोघे का खाणाखुणा करताय? " 🤔😒


 दुसरे दोघे ....👉 हा ..तू 👈 ..👉 तो 👈 बोलतोय म्हणून मी बोलतोय 


😁😁😁😁


#प्रज्ञा

Sunday, 24 May 2020

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग१२
 गोवर्धनदास यांनी बाबांना शांत रहायला सांगितलं. मिटिंगमध्ये फक्त आणि फक्त ऐकण्याचं काम करायचं. ना चिडायचं ना इमोशनल व्हायचं ना अपराधी भाव मनात ठेवायचे! सगळं ऐकून 'ठिक आहे, विचार करून कळवतो.' एवढंच बोलून यायचं.
  काकांनी सुद्धा बाबांना जवळपास असाच सल्ला दिला. डोकं थंड ठेव हा मुख्य सल्ला होता.😀
  मिटिंगला बाबांबरोबर गोवर्धनदास यांचे एक स्नेही गेले होते. मला त्यांचं नाव आठवत नाही. ते आर्किटेक्ट आणि वकील होते. मांजरेकरांच्या पुतण्याने 'आमचं कुटुंब त्यांच्या (मांजरेकर मामांच्या) एकट्यावर अवलंबून आहे' असा दावा केला. तसंच कामगार जर कामावर ..साईटवर असताना जखमी झाला , मृत्यू पावला वगैरे तर मालकावर /कंपनीवर थेट जबाबदारी असते. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी लागते. कायद्यात तशी तरतूद आहे. असं पुतण्या चं म्हण्णं होतं. त्याच्या वकिलाने पाच लाख रुपये नुकसानभरपाई ची मागणी केली.
   बाबा म्हणाले की त्या दिवशी ते घरी कसे पोहचले ते त्यांचं त्यांना माहीत! हात पाय कापत होते. हृदयाची धडधड दुप्पटीने होत होती. संध्याकाळी काका , बाबा खूप वेळ बोलत बसले होते. पुढचे अनेक दिवस, महिने काका गिरगावात खूप उशिरा पर्यंत थांबायचे. पार शेवटच्या गाडीने बोरीवलीला परत जायचे. सतत बाबांबरोबर थांबायचे. नंतर एकदाच काकांनी बोलता बोलता म्हटलं की 'मी थांबाचो ...याचा काय भरवसा? भलतं सलतं डोक्यात घेतलंन , इकडे तिकडे निघून गेला ...त्याला आपल्या डोळ्यासमोर गुंतवून ठेवला पाहिजे एवढं माझं मी ठरवलं होतं.'
   नंतर या सगळ्या गोष्टी वर गोवर्धनदास , त्यांचे स्नेही , कंपनी (ज्यांची मुख्य साईट होती) चा एक लिगल अॅडव्हायझर आणि पै काका पण यांच्या चर्चा झाल्या. कोर्टात न जाता बाहेर सेटलमेंट झाली तर बरं ...यावर सगळ्यांचं एकमत होतं.
  पुतण्या खोटं बोलत होता हे नक्की. कारण मांजरेकर मामांची पत्नी काही वर्षांपूर्वी वारली होती आणि त्यांना मूलबाळ नव्हते. ते स्वत:च्या घरात दोन मित्र म्हणा, गाववाले म्हणा .. यांच्या बरोबर रहात. तेच लोक अंत्यसंस्काराला पुतण्या व भावा बरोबर होते. पुतण्याचा आणि भावाचा जेवढ्यास तेवढाच संबंध होता. पण माझे बाबा 'हिरो' ..पुतण्या 'व्हिलन' ..मग कोर्टात हिंदी सिनेमा इष्टाईल आरोप-प्रत्यारोप होऊन बाबा जिंकले ..असं व्हायला आयुष्य काही हिंदी सिनेमा थोडाच होता? 😄
   कोर्टात काहीही होऊ शकतं. केस कितीही वर्ष चालू शकते. जेव्हा मांजरेकरला अटॅक आला तेव्हा काम बंद होतं, लंच ब्रेक होता. त्या दिवशी मुळातच कामाला हातही लावला नव्हता मांजरेकरांनी. अर्धा दिवस उलटला आहे..रोज पूरा मिळणार नाही , तुम्ही आराम करा , उद्या या ...वगैरे संवाद सर्वां समक्षच झाला होता. ही बाबांसाठी मोठी जमेची बाजू होती. तरीही मनस्ताप टाळण्यासाठी समझौता करण्यावर भर द्यायचं ठरलं.
  पुतण्याने मागितलेली रक्कम देणं तर निव्वळ अशक्य अशक्यच होतं. बाबांना जीवाला तोच घोर लागून राहीला होता. दोन्ही मुलींची शिक्षणं बाकी , आई तर निवृत्ती घेऊन बसली होती! व्यवसायाचा पसारा मांडला होता. दिवसा गणिक गरजा वाढत होत्या.. महागाई वाढत होती.
   त्यांचं मनस्वास्थ्य साफ बिघडलं. ते पूर्ण नास्तिक होते वा काय मला माहित नाही ..पण जप , नामस्मरण केल्याने आणि देवाचा धावा केल्याने संकट टळत नाही हे ज्याला पक्कं ठाऊक आहे ..असा प्रचंड practical माणूस होता तो!!! अशा प्रसंगात देवावर विश्वास नसणाऱ्यांची खूप खूप मोठी परीक्षा असते. सगळी कडून आधारच नाहिसा होतो ...ज्या स्वत:वरच्या दूर्दम्य विश्वासावर सगळं उभं केलेलं असतं तो विश्वासच जर हलला गेला तर काय होईल?
   त्यांची सिगरेट वाढली , चहा वाढला. वजन घटलं , केसही पांढरे होऊ लागले भरभर. कोणा कोणाला चालल्या प्रकाराची कुणकुण लागली की त्यांचे चौकशी ला फोन येत. असे फोन घेतले , बोललं की त्यांना अधिकच नैराश्य येई.
  गोवर्धनदास काकांच्या सल्ल्या प्रमाणे ते रोजच दिवसभरातील महत्त्वाच्या गोष्टी, घटना लिहून ठेवत होते. मग बाबांनी त्याच चोपडीच्या (बिझनेसवाले लोक बरेचदा वही ला (notebook) 'चोपडी' म्हणतात.😄 ) शेवटच्या पानावर स्वत: साठी काही तरी सकारात्मक लिहायला सुरुवात केली. उदाहरणार्थ : माझ्यावर पाच पैशांचही कर्ज , उधारी आज घडीला नाही.
Yess ..😀 this was a positive thought 👍
मग यात भर पडू लागली , माझा भाऊ माझी बहीण मला धीर देतात. माझी बरीचशी माणसं (😢) अजूनही माझ्या बरोबर आहेत...
माझी पत्नी समजूतदार आहे, माझ्या बरोबर खंबीरपणे उभी आहे.
मुली शिक्षणात हुशार आणि समंजस आहेत. वगैरे!!
   त्यांनी या काळात 'positive thinking'. या विषयावरील पाच पंचवीस पुस्तकं वाचून काढली. सतत मनाला उभारी मिळावी म्हणून जे करता येईल ते केलं. आम्हाला 'लघुरुद्र घाला , उपवास धरा , गुरू शोधा' असे पुष्कळ सल्ले मिळाले. आई-बाबांनी या प्रेमळ सल्ला देणाऱ्यांची मने कधीच दुखावली नाहीत पण आई म्हणते ..आमचं अशा गोष्टींत मनच रमलं नाही..कराव्याशा वाटल्याच नाहीत तर जूलुमाचा रामराम हवा कशाला?  नाही म्हणायला आई दर शुक्रवारी काळ्या रामाच्या देवळात तेवढं जायची. एक गजरा देवीला वहायची.
  बऱ्याच मिटिंगज् झाल्या. गोवर्धनदास यांचे स्नेही हुशार होते. त्यांनी एका फार मोठ्या आणि नावाजलेल्या वकिलांच्या वांद्रे येथील मोठ्या आॅफिस मधे फायनल मिटिंग ठरवली. पुतण्या , त्याचा वकील , बाबा आणि ते स्नेही असे मिटिंगला गेले. बाबा म्हणाले...तो माणूस म्हणजे प्रचंड आत्मविश्वास!! एक एक करत तो पुतण्याच्या वकीलांशी कायद्याच्या अगम्य भाषेत बोलत होता...त्यांना निरुत्तर करत होता.कोर्टात जाणं तुम्हाच भारी पडेल , त्यापेक्षा अनुकंपा म्हणून खरे देऊ करत असलेली रक्कम चर्या निवांत !! हे सहज गळी उतरत होता त्यांच्या!! त्या कायदेशीर भाषेतलं मला काही जरी कळत नव्हतं तरी मला अचानकच अवघड पेपर सोप्पा वाटायला लागला! इतके दिवस उगाच मी चिंता केलीसं वाटून मला मानेवर केस उभे राहिले. माझ्या ही नकळत माझे ओठ छोटं हसू येऊन ताणले गेले आणि डोळेही चुरचुरीत होते! 😄
  पुतण्या व त्याचा वकील तोंड पाडून होते पण तरी पैशांवर तडजोड ही केलीच त्यांनी!! पाच लाखावरून थेट पन्नास हजारांवर 😂😂 त्यांनी सगळं आवरतं घेतलं.
  वांद्र्याच्या या (बहुतेक कुलकर्णी साॅलिसिटर्स ..नाव नक्की आठवत नाही) वकीलांनी या तीन तासांच्या मिटिंगची सात हजार रुपये फी घेतली. 😄
बाबांनी मग काही दिवस चक्क नोकरी केली ...त्यांच्या माणसां सकट त्यांना नोकरी दिली तरी कोणी? मग तिथे पुढला वाढदिवस कसा साजरा झाला? 😂😂😂 हा किस्सा ऐकायचा आहे का तुम्हाला?
#PradnyaSubodhAhire.


   
 
 

  
#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग११

 बाबा, काळेले दोघं धावत फाटकातून आत गेले. गोवर्धनदास यांनी गेट जवळच्या इंटरकाॅम वरुन वरच्या office मधे काॅल केला आणि कंपनीचा डाॅक्टर बोलवा वगैरे सांगून मेन officer ना पण काय झालं ते कळवलं!!
  बाबांना माणसांनी सांगितलं की सगळे बसले , बोलत होते आणि एकदम मामा छाती दुखते दुखते करत आडवा झाला. तोंडावर पाणी मारलं , हात चोळले ... काही उपयोग नाही. बाकी officer , कंपनी डॉक्टर येऊन पटापट ambulance बोलाऊन पुढच्या वीसेक मिनीटात जवळच्या हाॅस्पिटल मधे नेलं. तिथे डाॅक्टरांनी सांगितलं की काही करता येणार नाही. मॅसिव्ह हार्टअटॅक...आॅन द स्पाॅट गेले. 😑
  सगळं वातावरण पालटलं. वाईट वाटतं होतं , मांजरेकर मामांच्या घरी कळवायचं तर फोन वगैरे नव्हता. बाबांनी त्यांच्याच दोन माणसांना स्वत: घरी जाऊन निरोप द्यायला पाठवलं.
   कंपनीतले officer , पोलिस , गोवर्धनदास सर , हाॅस्पिटल , डेथ सर्टिफिकेट देतानाचे सोपस्कार या सगळ्यात बाबांचा उरलेला वाढदिवस संपून गेला. मांजरेकरचा पुतण्या , भाऊ आणि काही जण आले. सगळे विधीवत आटोपून "काही लागलं तर कळवा" सांगून बाबा एकदाचे घरी निघाले.
   गोवर्धनदास साहेब दुपार पासून बाबांसोबतच होते. त्यांनी बाबांना स्वत:च्या गाडीने घरा पर्यंत सोडलं. तू खूप जास्त काळजी करतोस खरे ! आणि खूप चूकीच्या ठिकाणी ओवर रिएक्ट पण करतोस. एवढा नरम दिल कामाचा नाही. जे झालं त्यात तुझा काय मिस्टेक आहे का? मऊ लागलं की लोक कोपराने उकरणार! तुला कसली गरज लागली तर मला सांग. आणि आज पासून एक एक गोष्ट जी होते , कोणाचा काॅल आला , कोण तुला काय बोलला ...एव्हरीथिंग तू नोट डाऊन कर.
   असे चमत्कारीक सल्ले गोवर्धनदास साहेबांनी का द्यावेत ? हे समजण्या एवढी शारीरिक, मानसिक शक्ती बाबांना नव्हती. ते दुपारपासून उपाशी , उभ्या-उभ्याच धावपळ , चिंता , मदत सगळंच करत होते. मोठा सुस्कारा सोडत आणखी एक सिगरेट पेटवत ते म्हणले "मी जरा जास्तच कडक सूनावलं मांजरेकरला" ते ऐकल्या बरोबर गोवर्धनदास साहेब ताडकन उठून बोलले , तू हे वाक्य आयुष्यात परत एकदा जरी बोललास तरी तू , तुझं संसार , तुझी पत सगळं डूबवशील. माझं ऐक पोरा ...एकच लक्षात ठेव .. जिंदगी कोणाच्या हातात नसते. जे झालं त्यात तुझी काही चूक नाही हे दिमागमधे फिट्ट कर. 
   त्यांनी आईला त्याच सूचना दिल्या की कोणाचा फोन आला गेला वगैरे गोष्टी नोंद करून ठेवा. आईने विचारण्याचा प्रयत्न केला की हे सगळं का? कशासाठी करायचंय , बुवा काय होणार आहे? त्यावर साहेब म्हणाले की काही झालं नाही तर चांगलंच आहे. मग हसून , गप्पा मारून , मला काजू चिक्की चं पाकीट देऊन ते गेले.
   मी तर फार लहान होते ....ताई माझ्या हून सहा-सात वर्षे मोठी !! तिला गांभीर्य कळलं होतं. आई पण चिंतेत होती. बाबा मात्र रात्री थकून असे काही झोपले होते ...अगदी घोडे बेचके👍
     पुढले दोन-तीन महिने तरी ही अशी गाढ झोप त्यांच्या वाट्याला आली नाही. ...असं आई सांगते. बाबा या काळाबद्दल बोलायचे किंवा सांगायचे तेव्हा समुद्रसफर करून सुखरूप घरी पोहोचलेला सिंदबाद असाच दिसला असेल असं मला वाटायचं 😄
   शनिवार , रविवार गेला !! सोमवारी संध्याकाळी मांजरेकरच्या पुतण्याचा फोन आला ....त्याने बाबांवर आणि कंपनी वर केस करणार आहे ..असं कळवलं !! सगळं सामोपचाराने व्हावं असं वाटतं असेल तर आधी मिटिंग करूया असं म्हणाला !! 🙁
    या फोन नंतर बाबांनी सर्वात आधी गोवर्धनदास साहेब आणि नंतर गजूकाका (बाबांचा सख्खा मोठा भाऊ) यांना फोन करून घडलेल्या गोष्टी सांगितल्या. पुढले काही दिवस बाबांचं सगळंच .. सुख , चैन , केलेली चांगली कर्म , पूर्वसंचित (याच जन्मातली) , नातेवाईक , मैत्र ...सगळंच पणाला लागलं.
    कसं काय घडल्या पुढच्या गोष्टी? कोर्ट-कचेरी झाली की नाही? केस नक्की काय केली गेली? त्यातनं रस्ते कोणी कसे काढले? ...वाचत रहा.

#PradnyaSubodhAhire
#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग१०

  बाबांच्या कामाच्या साईटवर त्यांच्या वाढदिवशीच घडलेला जो प्रसंग पुढं येणार आहे ..तो त्या क्षणी चित्तथरारक वगैरे नव्हता. पण त्याचे खूप वाईट पडसाद त्यांच्या व्यवसायात उमटले, बाबांना-आईला अत्यंत मनस्ताप देणारे ठरले.
  आता व्यवसाय स्थिरावला होता. कंपनी , कामं आणि माणसं ही गाडी ठराविक गतीने पुढे पुढे जात होती. संघर्षाच्या वर्षांत , आर्थिक स्थैर्य नसणाऱ्या काळात बाबा कमी-अधिक प्रमाणात त्यांच्या अटी शर्तींवर काम करू शकले कारण माझी आई खमकी होती. ती नोकरी , घर आणि दोन मुली ..अशा तीनही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होती.
  गाठीला चार पैसे , रूळलेली व्यवसाय व संसाराची गाडी यावर विसंबून दोघांनी ठरवलं की मुलींचं आरोग्य, अभ्यास आणि संस्कार याला महत्त्व देत आईने नोकरी सोडावी. तिला पेन्शन मिळणार आहे हे कळल्यावर आजी (वडीलांची आई) म्हणाली .."वा , छान!!तुला साडी चोळी ला याच्यापुढे हात पसरायला नकोत" 😂😂 मला आणि ताईला हा प्रसंग आई अनेकदा प्रेमाने सांगायची की सासूला सुद्धा सून आत्मनिर्भर असणं महत्त्वाचं वाटलं होतं. असो ...विषयांतरा बद्दल क्षमस्व😊
   खरं असं होतं की मी फारच मस्तीखोर आणि सतत धडपडणारी आणि धावरी मुलगी होते, शाळेतून जवळपास रोज निरोप येत , ताई ला चांगले मार्क्स मिळवण्याची इच्छा होऊ लागली होती आणि वरच्या इयत्तांच्या अभ्यासात मदत लागू लागली होती. आईला office मधे increament आणि promotion तर मिळालं असतं पण... त्यापाठोपाठ त्रासदायक राजकारण येऊ घातलं होतं ज्यामुळे ती मेटाकुटीला आली होती.
  हे सर्व सांगायचं कारण एवढंच ..की आता पहिल्या प्रथमच माझे बाबा व्यवसाय आणि संसार एकट्याने पेलण्याकरीता सज्ज झाले होते. फाजिल नव्हे तर अनुभवाने आलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर , कष्टाने जमवलेल्या घडवलेल्या माणसांच्या भरवशावर त्यांनी हे करायचं ठरवलं होतं. खरं तर हे सगळं ते already करत होते ..... सायकल ला नाममात्र लावलेला हाताचा टेकू अलगद बाजूला व्हावा आणि सायकल विनासायास चालवत रहावं ...अशा सारखं होतं हे सगळं!!
   पण!! माणूस जसं ठरवतो ते आणि तसंच दर वेळेस होतं असं काही नाही 😀. एखादं वर्ष आई ने रिटायर होऊन झालं असेल. शुक्रवार होता , बाबांचा वाढदिवस होता. आमच्या कडे वाढदिवसाचं फारसं कोणाला कौतुक नसायचं ...कोणाचेच बड्डे वगैरे करायची प्रथाच नव्हती. म्हणजे केक वगैरे तर नाहीच ..पण मला कोणाचं औक्षण वगैरे केलेलंही आठवत नाही. (पुढं मग मी माझ्या वाढदिवसाला मी स्वत:च  खूप्पच खुश  रहाण्याची , मीच माझं कौतुक करण्याची प्रथा पाडली 😉😁😂. असो.)
   बाबांचा दिवस नेहमीप्रमाणे उगवला, एका मोठ्या फॅक्टरीच्या मोठ्या साईटवर बाबा सब-काॅन्ट्रॅक्टर होते. ( वेगवेगळ्या कामातील स्पेशालिस्ट वेगवेगळे काॅन्ट्रॅक्टर असतात...प्रत्येक जण मुख्य contractor कडे टेन्डर भरत असतो.) ते जरा त्रासलेही होते. ज्या वेगाने आणि वेळेत ठरलेलं काम व्हायला हवं तसं ते होत नव्हतं.
   मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टीत तरबेज असणारी वेगवेगळी माणसे कायम स्वरुपी म्हणावीत अशी होती. काही होते ..जे चार दिवस बाबांच्या साईटवर काम करत आणि पुढले दोन वा चार दिवस दुसऱ्याही एखाद्या शेटची साईट किंवा स्वत:ची घेतलेली कामेही करून येत. अशा लोकांचे 'रोज' एखाद्दोन दिवसांसाठी कापले जात नसत scalene मधे!!
   पण मांजरेकर नावाचा माणूस जवळपास आठ दिवस आला नव्हता ..त्या दिवशी आला तो ही अकरा वाजे नंतर ....बाबा कधी नव्हे ते जरा गरम झाले. ते तापट होते, पण माणसे , दांड्या , अंगावर पैशांची उचल वगैरे बाबतीत ते कमालीचे सहनशील होते. की माझं काम अडकून रहात नसेल तर 'खाली टाईम' चा वापर करा स्वत: साठी बुवा!! त्यांनी मांजरेकर मामांना जाब विचारला. तुमच्या जागी वेगळा माणूस तजवीज करावी लागते, त्या करता लोकाकडे शब्द खर्चावा लागतो ( obligation नको वाटायचं त्यांना ...कारण वेळेला आपली चांगली माणसे दुसऱ्याला द्यावीही लागतात 😄) नेमलेला मानुष्य आणि शिवाय तुमचाही 'रोज' द्यायचा ...हे मला कसं परवडणार? असा सवाल बाबांनी मामांना केला.
  मामा गयावया करून म्हणले की त्यांची तबियत बरोबर नसल्याने ते आठ दिवस आले नाहीत. फोन केला नाही कारण एक रुपयाची नाणी नव्हती PCO मधे टाकायला 🤦
    "तुमची तब्येत बरी नसेल तर तुम्ही आज पण घरी जा. .. नाही मला काही ऐकायचे नाही. आराम करा. #माझी_जिम्मेवारी_नाही.उद्या या. आज अर्धा दिवस उलटला आहे ...आजचा रोज पूरा मिळाचा नाही." 
      वरील संवाद सर्व माणसं , काळेले नावाचे सुपरवायजर यांच्या समक्ष झाला होता. नंतर काही वेळातच कंपनीतून जेवणाच्या सुट्टीचा भोंगा झाला. बाबा , काळेले , वैद्य आणि गोवर्धनदास नावाचे एक वयस्कर मोठे साहेब एकत्र गप्पा करत कंपनी बाहेर जाऊन चहा पाणी सिगरेट आणि काही बाही खाण्यात गुंतले !!! पंधराच मिनिटे झाली असतील ...तोच ओरडा आरडा , खरे शेट च्या नावाचा जोरदार पुकारा ... समोरून बाबांची माणसं ..विजय , नथू आणि महाराज ..धावत आले.
  "शेट , मांजरेकर मामाच्या छातीत कळायली. आता नाडी लागत नाही. "

😑😑😑😑😑😑😑

#PradnyaSubodhAhire


#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग९

  Contractor म्हणून स्वतंत्र लहान-मोठी कामं करतानाच वेगवेगळ्या ठिकाणी , मोठ्या कंपन्या, इंडस्ट्री, केमिकल फॅक्टरी अशा ठिकाणी सब-काॅन्ट्रॅक्टर म्हणून कामे मिळणं हे हुरुप वाढवणारं , पैसा आणि अनुभव .. दोन्ही देणारं असायचं.
  बाबांनी अगदी सुरवातीच्या काळात BPT(Bombay Port Trust) आणि हर्डिलिया केमिकल्स ...अशा आणखी ही ठिकाणी काही महिने कालावधी च्या नोकऱ्या केल्या. ते permanent झालेही असते पण त्यांना स्वत:चा व्यवसायच करायचा होता, त्यामुळे कायम नोकरीसाठी प्रयत्न केलाच नाही.
  जून्या office मधील एक सहकारी ...मिस्टर पै !! हे बाबांना अचानक ट्रेनच्या प्रवासात भेटले. 'स्लज काढण्याचे टेंडर निघत आहे.' या वर पुष्कळ चर्चा झाली. गमती गमतीत शिअर इमॅजिनेशन करत ...पण तांत्रिक दृष्ट्या अचूक पद्धतीने तेही मोठी मशीनरी / पंप न वापरता हे काम मी आणि माझी माणसं असू तर कसं करू!! हे बाबांनी पै ना समजावलं. 😊
   चार दिवसांनी 'खरे , तू हे टेंडर सिरियसली भरतो का? ' असा पै काकांचा फोन आला ; बाबांनी टेंडर भरलं ; आणि मग एका मोठ्या मुलाखती नंतर ते टेंडर आणि प्लॅन पास!!!
   कंपनी ला कित्येकपट कमी खर्चात काम करून मिळालं. पै काकांचा भाव वधारला (त्यांना कमिशन मिळालं , नोकरी च्या ठिकाणी हितशत्रू ही निर्माण झाले. 😑) बाबांना खूप आव्हानात्मक काम मिळालं. पैसे मिळाले , दांडगा अनुभव मिळाला , कल्पना प्रत्यक्षात आणू शकतो ..हा आत्मविश्वास मिळाला. पुढे सतत हे काम scalene लाच मिळत राहिलं.
   पण ...याच साईटवर बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशीच नेमका सदाशिव चा अपघात होणार होता. त्याचा जीवच जायचा !! काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
   मोठ्या पाईपलानमधे उतरून , खूणा केलेल्या काठ्या वापरून , चक्क aluminium च्या बादल्या , कंटेनर्स वापरून बाबांची माणसं घाण पाणी/ साॅलिडीफाईड झालेला कचारा / वर तरंगणारे oily chemicals वगैरे काढून टाकत. ड्रेनेज साफ करत. तोंडावर घालायला हेल्मेट असायची. ही अग्निशमनदलाकडून आणि ज्यांचं काम होतं त्या कंपनी कडूनच मिळायची.
    पाईप मधे फक्त माणसंच नाही तर बरेचदा बाबा स्वत: उतरायचे. सूचना द्यायचे , सुपरवाईज करायचे. शर्ट आणि पॅन्ट काढून माणसांच्या कपड्यांबरोबरच लटकवून देत. वाटेल तिथे कपडे लटकवल्यामुळेच  आमच्या घरात एकदा ढेकूण शिरकाव करणार होते 😂 म्हणून आई भयंकर कावली होती. बनियान आणि हाफ पॅन्ट वरच्या 'खरे शेट' ला पाहून पै काकांना त्रास वाटायचा!! पण बाबांना माणसांची काळजी असायची!! आणि ती अनाठायी नव्हती.
    सदाशिव तब्ब्येतीचा उन्नीसबीस असूनही या कामात विशेष तरबेज होता. म्युनसिपालटीच्या मैल्याच्या पाईपपेक्षा हे खूप 'बेस' आहे असं म्हणायचा. त्याला अनुभव जास्त! तोच आधी आत उतरायचा. तसाच उतरला होता. पण त्या दिवशी नक्की काय झालं ते त्यालाही कळलं नाही. तो आत गेला ...तो बाहेर येईचना!!! बाबांना लगेच गडबड जाणवली. ते पण आत होते!! आणि त्यांना सदाशिव चे केस दिसत होते खाली ..पण हालचाल दिसेना! बाबा दोरी खेचून ठरलेल्या खूणा करत होते पण हा काहीच प्रतिसाद देईना.
  बाबांना भीतीने घाम फुटला आणि घसा कोरडा पडला एवढा ..की वर बघून ओरडत होते तो आवाजही फूटेना!! आपल्या तोंडावर हेल्मेट आहे , हे लक्षात आलं आणि ते कसंबसं त्यांनी ओढून काढलं, ओरडून वर आवाज दिले.
   सिक्योरिटी गार्ड‌‌‌ साईटवर कायम तैनात असणं ..हा नियमच होता. हा गार्ड पण विशेष प्रशिक्षण दिलेलाच असतो. पुढल्या काही मिनीटात हालचाल करून बाबांना आणि सदाशिव ला बाहेर काढलं. बाबा सुरक्षित खोलीपर्यंतच उतरले होते ...प्रश्न सदाशिवचा होता.
   सदाशिव व्यवस्थित शुद्धीवर होता. त्याला खाली गेल्यावर 'पंजन्ट आॅडर' ...(chemical gas strong smell) मुळे जोरदार शिंक आली आणि नाकापासून पार डोक्यात झिणझिण्या गेल्या. हिसका बसल्याने कमरेचा बेल्ट सैल झाल्याची त्याला शंका आली. पाईपच्या दोन्ही बाजूला ..डाव्या बाजूला गुढगा , डावं कोपर आणि दूसऱ्या पायाचं पाऊल दुसऱ्या बाजूला रोऊन पट्ठा तोल सावरत न हलता-डूलता थांबून राहिला.
   दोर हलवून इशारा करायला हातच मोकळा नव्हता बिचाऱ्याचा 😄.. आणि हेल्मेट शिंकल्यामुळे बरबटून गेल्याने हा डोकं पण न हलवता स्टॅच्यू केल्यासारखा स्तब्ध राहिला 😂
   त्याला बाहेर काढला , नंतर ताण निवळला खरा!! पण सदाशिव धोकादायक डिपनेस पर्यंत पोहोचला होता , तिथे प्राणवायू कमी पडला असता , विषारी वायू वगैरे असले असते तर सगळंच कठीण होतं.
   हे वर्णन अगदी अचूक आणि तंतोतंत असेल असं नाही. घडलं तेव्हा थोडंफार कानावर पडंलंय. नंतर मी बाळंतपणात घरी रिकामी असायचे तेव्हा बाबांकडून बऱ्यापैकी संगतवार ऐकलं. तेव्हाच छान लिहून ठेवायचं का नाही सुचलं मला! 🙁 
असो.
    सदाशिव ने बाबांना दोषही दिला नाही , कामही सोडलं नाही किंवा स्वभावही सोडला नाही. 😄तो अपघात जीवावर बेतता ..तर सदाशिव चा जीव , बाबांचं करीअर , पैंची नोकरी वगैरे सगळ्यावर गंडांतर होतं!!
   बाबांचा 'असा' साजरा होणारा हा एकच वाढदिवस नव्हता!! योगायोगाने पुढेही काही वेळा नेमक्या वाढदिवसाच्याच दिवशी अशा काही गोष्टी घडल्या ...की शेवटी आई ने 'वाढदिवसाच्या दिवशी काम बंद' असा नाॅन - अपिलेबल फतवा काढला आणि आम्हाला दिवाळीच्या आसपास बाबा घरातच सापडू लागले ..😄 ऐन दिवाळीत घर उघडे पाहिजे वगैरे गोष्टी फाट्यावर मारत 😜 आमची पुणे-महाबळेश्वर वारी पण होऊ लागली.

#PradnyaSubodhAhire

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग८

  सदाशिव म्हणजे एक शेलका नमुना होता!! त्याचं वय सांगणं मुश्किल. पांढरा फटक दिसायचा. अॅनिमिक होता. डोक्यावरचा केस न् केस पांढरा , ते केसही डोक्यावर टोपलं ठेवल्यासारखे दिसायचे. डोळ्यांच्या पापण्या पण पांढऱ्या!! पांढरं भूत!!
  दारू खूप प्यायचा. डोळे दारूने आणि झोप न झाल्याने क काय ..लाल लाल दिसायचे. अवतार भूताटकी असला तरी सदाशिव चं वागणं मात्र अतिशय मर्यादशील होतं. घरी वरती शेटनी पाठवला की हळू कडी ठोकून लांब जाऊन उभा राही. आम्ही 'या आत' म्हटलं की जर्राही आवाज न करता हवी ती हत्यारं गोणपाटात गुंडाळून रस्सी बांधून घेऊन जाई.
  त्याचे हात थरथर थरथर कापायचे ....मी टक लावून बघत नवल करायचे की इतकी घट्ट रस्सी बांधता तरी कशी येते त्याला!! मला आणि ताईला छोटी बेबी , मोठी बेबी ...असं म्हणायचा पायंडा त्यानेच पाडला. 😊
   बाबांना खूप घाबरायचा. दारू पिऊन कामाला यायचं नाही ..अशी बाबांची सख्त ताकीद होती. बाबा म्हणायचे की हा दारू साठीच काम करतो xxx 😅. बाबा त्याचे काही पैसे पोस्टात टाकायचे. नाही तर सगळ्याची दारू पील म्हणायचे.
   तरी कधी कधी हा संध्याकाळी चहा च्या सुट्टीत गायब व्हायचा तो परत उगवत नसे 😄 मग बाबा घाल घाल शिव्या घालत दुसऱ्या दिवशी 😂. कामाच्या ठिकाणी बरेचदा फूटके नळ , गंजके पाईप , इतर भंगार सामान जमा व्हायचं. नियमाने याची विल्हेवाट contractor ने लावायची असते. वेगवेगळ्या प्रकारचं scrap वेगवेगळ्या प्रकारे डिस्पोज करावं लागत असे.
   या स्क्रॅप ला पाय फूटले ...की समजून जायचं ... सदाशिवची करामत आहे 😂 रद्दीचे पैसे मिळाले की हा नवटांक मारून बसेल घरीच!!! हा कयास करून ..बाबा, नथु , विजय वगैरे सगळेच हसायचे. पण दारू पिऊन साईटला यायचं नाही ...हे मात्र सदाशिव कसोशीने पाळत असे. नाही तर बाबांकडे टिकलाच नसता!
  साध्या , निरुपद्रवी सदाशिव चा बाबांच्या साईट वर विचित्र अपघात होता होता राहिला!! काळ आला होता पण वेळ आली नव्हती ...असा हा प्रसंग! सदाशिव चा जीव , बाबांची करीअर , मोठ्या कंपनीचं नाव आणि कामावरच्या माणसांचं भवितव्य पणाला लागलं ....पण पण ... यातून सगळेच सहीसलामत बाहेर ही पडले 😄
  अपघात का आणि कसा घडणार होता , कसं सगळं निभावलं ...हा प्रसंग उद्या!! 😊

#PradnyaSubodhAhire