Sunday 12 December 2021

सिनेमातल्या सारखी माणसं २

 #सिनेमातल्यासारखी_माणसं 

#अप्पी_बद्दल_आणखीन_सांग😊

    अप्पी सारखी माणसं भूरळ घालतात. परवाच्या पोस्ट मुळे अनेक मित्र मैत्रिणी ना तिच्या बद्दल कमाल आणि आदर वाटला. लोकांचं कुतूहल जागं केलं. असं कसं ती मुलगा होऊन राहिली? कोणी नव्हतं का तिचं आगे मागे? वगैरे बरेच प्रश्न पडले सर्वांना 😀

   मी सुरवातीला म्हणलं तर अगदी सहज आणि म्हणलं तर गैरसमजातून .. टूरिझम चा साधा सर्टीफिकेट कोर्स पूर्ण केला. ज्या इन्स्टिट्यूट मधे मी तो कोर्स करत होते, तिथे नारायण सर म्हणून होते. त्यांच्या मुळे मला Galileo या CRS (Computer Reservation System) चं ट्रेनींग घ्यायला जाता आलं. खरं म्हणजे असं कोणीही उठून गेलं ट्रेनींगला ... असं करता येत नाही. ट्रॅव्हल एजन्सी चे एम्प्लाॅयी फक्त ट्रेन केले जातात. 

    मी 'Aries Travels' ची एम्प्लाॅयी म्हणून तिकडे दाखल झाले. हीच युसुफ ची कंपनी होती. आणि हा जमवून आणलेला घोळ अर्थात अप्पीमुळे शक्य झाला होता. 

    आमची instructor म्हणून ती आत क्लासरूम मधे आली, प्लॅटफॉर्म वर चढली ... तरीही ती नीट दिसेना! इतकी बुटूकली होती. सरळसोट केसांचा झिडूक फिडूक करणारा पोनी , किंचित पुढे वाटणारे सशासारखे दात आणि टिपीकल बारीक डोळे.. अशी आमची ही instructor 😀 सगळं मिळून पाच दिवसांचं प्रशिक्षण , सहाव्या दिवशी टेस्ट आणि लगेच हातात सर्टीफिकेट!! 

    लंच ला ती आमच्यात येऊन बसायची. ती माझ्या बाजूला बसली... आणि तिच्या संपूर्ण डाव्या हातावर भाजल्याचा डाग दिसला. मी संकोचाने काही विचारलं नाही, पण माझी नजर , त्यातला प्रश्न समजला तिला. 

    बैदा पावच्या गाडीशी तवा अंगावर उलटून अपघात झाला म्हणाली! पुढे सगळी कहाणी .. निव्वळ सुरस! तिच्या बुटूकलेपणामुळे वयाचा अंदाज येत नव्हता. माझ्याहून आठ-दहा वर्षे तरी मोठी ! खेड्यात लहानपण गेलं. खाण्यापिण्याची आबाळ नव्हती. शिकायला ही मिळालं. त्यांना त्यांच्या खेड्यापासून जवळ जोगिंदर नगर च्या शाळेत , काॅलेजात बारावी पर्यंत रेटता आलं....पास नापास करत!

   अप्पी सात वर्षांची असताना तिच्या वडिलांना काहीतरी 'बाधा' झाली म्हणे! ते भ्रमिष्ट आणि वेगळ्या जगात हरवल्या सारखे झाले. मोठा भाऊ, अप्पी आणि तिची आई कष्ट करत , वडीलांची काळजी घेत , ही भावंडं जमेल तसा अभ्यास करत.

   मग वडील कुठे तरी निघून गेले, हरवले आणि सापडलेच नाहीत. दूर्दैवाने असं गाठलं या कुटूंबाला की आई ला घशाचा कॅन्सर झाला. उपचार करण्यात सगळंच पणाला लागलं !! आई पण गेलीच शेवटी. आता कमावणे , जगणे , शिकणे ... यामागे लागण्या शिवाय दोघा भावंडांकडे पर्याय नव्हता. 

     अप्पी चा भाऊ पर्यटकांना फिरवायचा , गाईड बनून फिरायचा!या पर्यटकांकडून बाकीचं जग जाणून घेण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. तेव्हा गुगल , यू ट्यूब सोडा ... मोबाईल तरी कुठे होता!! ओळखीची माणसं , माहिती असणारी माणसं आणि स्वतःवर विश्वास यावरच भिस्त ठेवावी लागायची. मुंबईत काही नशीब काढता येईल असं ठरलं. शिक्षण आणि अर्थार्जन दोन्ही दृष्टीने मुंबई गाठणं बरं वाटलं. मुंबईत म्हणावी तशी सोय लागली नाही. 

    अप्पीचा भाऊ अनेक भाषा सफाईदारपणे बोलायचा! विशेषतः इंग्रजी आणि हिंदी. जेवण उत्कृष्ट बनवायचा! त्याला काम मिळालं... पण फिरतीचं. अप्पीची सोय करता आली नाही, शिवाय तिला ग्रॅज्युएशन काही झालं तरी करायचंच होतं. रहाणार कुठे? काय कमावणार? वगैरे प्रश्न आ वासून समोर होते! 

    बेनी काका/चाचा बरोबर काम करायला ,रहायला, रस्त्यावर झोपायला , मिळेल तिथे आंघोळ इत्यादी करायला अप्पी तयार झाली कारण .... 'मला जगायचं होतं , मला चांगलं जगायचं होतं'. अप्पी म्हणते की आत्महत्या वगैरे विचार दूर दूर पर्यंत कधीच आला नाही मनात! पहाडी भाषा , त्यांचं कल्चर भाषा, त्यातली शिकवण वगैरे बद्दल सांगितलेलं बारीकसारीक लक्षात नाही माझ्या!! पण मथीतार्थ असा की आत्महत्या हे पाप !! संकट म्हणजे संधी! 'पहाडी' म्हणवल्या जाणाऱ्या बऱ्याच भाषा आहेत म्हणे! तिच्या मातृभाषेत बरेच संस्कृत शब्द आहेत. अप्पी बहुतेक त्यामुळेच मराठी खूप पटकन शिकली असावी. असो. 

     तर ...सुदैवाने ती लहान चणीची , बारीक काटक होती ...की मुलगा आहे, मुलगी आहे , ते कळतच नसे. अप्पी म्हणाली , खरं म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की 'मुलगा' म्हणून रहायचं!! योगायोगाने तिच्या अंगावर भावाचे ढगळ टी-शर्ट , चेक्स च्या थ्री-फोर्थ हेच बाॅईश कपडे होते. लोक आपले आपणच तिला 'अरे टिंगू, अरे छोटू' असं आवाज देऊ लागले. ती ज्या जागी होती त्या जागी एखादी मुलगी असेल अशी कल्पनाच केली नसणार कोणी!!या समजूती ची दुरुस्ती करायच्या फंदात ती पडली नाही. कारण हे पथ्यावर पडणार होतं.

   आठ महिने!! आठ महिने अप्पी अशी राहिली. 'गरज नसेल तर बोलायचं नाही. तोंडून शब्द काढायचा नाही.' ... हा गुरुमंत्र अप्पीने इतका मनावर घेतला होता की ती नंतर सगळं बऱ्यापैकी ठीक झाल्यावर सुद्धा बोलायचं विसरायची!'बोलने में बहुत एनर्जी वेस्ट करता है मनुष्य' 😂 असं म्हणत असे ती आम्हाला शिकवताना सुद्धा! अप्पी डिस्टंट एज्युकेशन ला हजार दूवा देते! ते नसतं तर तिला डिग्री मिळवणं फार कठीण गेलं असतं. ती मुंबई ला ही दुवा देते. 'मला चांगले लोक भेटले' असं आवर्जून सांगते. 

  ' त्यांच्यात ' बायका खूप कष्टाळू आणि त्या मानाने स्वतंत्र असतात. विशेषतः लग्न न करता एखादी तरूणी , स्त्री आयुष्यभर राहू शकते. कोणीच तिला प्रश्न विचारत नाही. तिला मूल झाले तरीही (लग्ना शिवाय) तिला प्रश्न विचारत नाहीत. मला वाटतं , या प्रकारच्या समाजात राहिल्यामुळे अप्पी एकटीने रहाणे , हिम्मत न हरता लढणे ... हे करू शकली. 

   तुम्ही हे वाचा .. आणि विचार करा अप्पीबद्दल!! उद्या थोडं पुढे जाऊ. 😊


#प्रज्ञा

(१३ डिसेंबर २०२१)


 


 

No comments:

Post a Comment