Sunday, 24 May 2020

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग_३

  नथू अबोल , बारीक अंगकाठी चा , पंधरा-सोळा वर्षांचा मुलगाच म्हणायला हवा ..असा बाबांकडे कामाला लागला. शिक्षण जुजबी पण डोक्याने हुशार! तो आधी रंगाचे हात मारायचे ..एवढंच करे!
  बाबांच्या हातात मातीचा गोळा मिळाला होता. प्लंबिंग ची कामं तर तो शिकलाच पण रंग लावण्याची त्याची आवड बघून बाबांनी त्याला बरंच प्रोत्साहन दिलं. नथू एकही शब्द तोंडातून न काढता , तासंतास सतत काम करत असे. अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती. बाबा जे जे दाखवत ते ते तो लगेच शिकत असे. तो उपजत 'जुगाड मास्टर' होता 😄 असंही बाबा म्हणायचे!
   सगळीच कामं थोड-थोडी तरी आली पाहिजेत, समजली पाहिजेत , निदान माणसांकडून करून घेता आली पाहिजेत...हे सूत्र नथूने कायम लक्षात ठेवलं. निरीक्षण महत्त्वाचं! कान डोळे आणि हात आपले गुरू!!! हा बाबांकडून मिळालेला दुसरा गुरुमंत्र!!😊
  बाबांच्या बरोबर सगळ्या महत्त्वाच्या साईट्सवर ...क्वालिटी आईस्क्रीम, हर्डिलिया केमिकल्स वगैरे ...नथू होताच. काही साईटस् वर अपघाताचे प्रसंग आले , बाबा अडचणीत सापडण्याचे प्रसंग आले ...सर्व गोष्टींचा तो साक्षीदार होता!!
  तो रंग लावण्याची कामे स्वतंत्रपणे घेऊ लागला. चक्क त्याची दोन माणसं आणली पुढे त्याने हाताखाली. नथू चा आता 'नथूशेट' झाला .😄 शिवाय बाबांकडे कामे मिळायचीच !! 
  माझ्या वडिलांनी स्वत:चा व्यवसाय बंद करतानाही धाडकन बंद केला नाही. साधारणपणे दोन वर्षाच्या कालावधीत , सर्व कामांची , माणसांची पोटापाण्याची नीट सोय लाऊन बंद केला. या अवधीत ते आमचं गुहागर चं घर बांधून घेत , डागडूजी करून घेत राहिले आणि हातातली कामे संपवत राहिले.
  नथू ला हल्ली काही वर्षांपूर्वीच कामावर अपघात झाला. पाय फ्रॅक्चर झाला आणि पायात सळी घालावी लागली. तो त्यावेळेस ज्या हार्डवेअर वाल्या बरोबर ( यांचा ग्रूप असतो , हार्डवेअर वाला , electrician, plumber , carpenter वगैरे ) काम करत होता ...त्याने जुजबी मदत केली पण हा सर्व अपघात , हाॅस्पिटल वगैरे नथूला फार खर्चिक गेलं.
  निरोप मिळाल्यावर माझ्या बाबांनी पुष्कळ आर्थिक मदत केली. ती मदत नथूने लक्षातही ठेवली आणि आदराने त्याची परतफेड ही केली. माझ्या घरचं बरंच काम त्याने करून दिलं.छोटी बेबी,  फक्त सामान आणण्यासाठी पैसे द्या. बाकी काम त घरचंच आहे. असं म्हणून निग्रहाने एकही पैसा जास्तीचा घेतला नाही.
   नथुने जितूला ..त्याच्या भावाला ही मुंबईत आणला. जितूला मात्र  'office' मधे काम करायची हौस होती. 😊 भावासाठी त्याने काय केलं? आणि 'नथुवर चोरीचा आळ' आल्याचा किस्सा ...पुढच्या भागात!!!

#PradnyaSubodhAhire


No comments:

Post a Comment