Sunday, 24 May 2020

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग४

   कामाची साईट जर कोणाचं घर असेल ...रेसिडेन्शियल साईट ..तर सहसा ते रिकामं असायचं. रहात्या घरात काम असेल तर बाबा किंवा साईटचा सुपरवायजर घरच्यांना आधीच सूचना देत की महत्त्वाच्या , मौल्यवान वस्तू उचलून सुरक्षित ठेवा. उगीच त्या तुटणे मोडणे गहाळ होणे चोरी होणे वगैरे नको.
   अंधेरीला एक 'परीख ' म्हणून क्लायंटकडे नथु आणि त्याची माणसं रंगाचं , ओटा कडप्पा आणि प्लंबिंग वगैरेचं काम करत होती. बाबांच आणखी एका साईटवर काम सुरू होतं.
    अचानक परीख साहेबांचा घरी तणतणत फोन आला की घरात चोरी झालीये आणि ती नथुनेच केलीये. परीख एवढ्या मोठ्याने बोलता होते की रिसिव्हरमधून आवाज बाजूला आम्हालाही ऐकू येत होता!!!बाबांनी शांतपणे पण ठामपणे हे शक्यच नाही... माझी माणसं उचलेगिरी करणारच नाहीत असं सांगितलं. नथु आला ...तो तोंड लटकावून! म्हणाला ...त्या बाईंचे मंगळसूत्र, चेन, पायल सगळं बाथरूममध्ये पडलेलं असतं. मी त्यांना कालच बोललो की उचलून ठेवा.. आणि आज ते माझ्यावरच आरोप करतायत की मी चोरलं त्यांची पायल.
    बाबा आता चिंताक्रांत झाले. त्यांनी परत परीख यांना फोन केला आणि शांतपणे नक्की काय झालंय सांगा ..म्हणाले!मिसेस परीख यांची #एक पायल मिळत नव्हती! 🤦 बाबा म्हणाले , चोरी करायचीच असती तर एकच चांदीचं पायातलं का चोरेल तो? तेही अजून महिनाभराचं काम शिल्लक असताना? तुम्ही घरातच शोधा!
   अर्थातच ...पायल घरातच सापडली. बाबा स्वत: नथुला घेऊन परीख यांच्याकडे गेले , मिसेस परीख कडून नथुला 'साॅरी' बदवलं. आणि...., झालेल्या कामाचे ही पैसे न घेता...ते काम सोडून दिलं. मिस्टर परीख यांनी नंतरही फोन केला, ज्यांच्या थ्रू हे काम मिळालं ..ते वैद्य साहेब ही बाबांना समजावू शकले नाहीत. मि.परीख स्वत: बेजबाबदार लागले आणि कसलीही शहानिशा न करता केवळ नथु कामगार आहे म्हणून आरोप केला, scalene चं नाव खराब करायचा प्रयत्न केला. आता एवढं व्यवस्थित काम करणारा ठेकेदार शोध म्हणा त्याला! ...असा स्टॅण्ड घेऊन बाबा मोकळे झाले.
   बाबांकडे शिस्त कडक होती. बारीक रद्दी सामान काय आहे, हत्यारं ( equipments) कोणती आणि किती आहेत याची ठिक नोंद असायची त्यांच्या डोक्यात आणि नजरेत. गंजका टॅप (नळ) जरी गायब असला तरी त्यांना कळायचं....कोणा मुळे नळाला पाय फुटतात (सदाशिव 😆😆 किस्सा वाटेवर आहे 👍) हे ही त्यांना ठाऊक असे. पण त्यांची माणसं विश्वासू होती. 'आपली ' टीम , कंपनी , आपलं नाव! अशा गोष्टी तोंडाने बोलून नाही तर कृतीतून दाखवणारी होती. 😊

#PradnyaSubodhAhire

No comments:

Post a Comment