Friday, 1 April 2022

#सण_सुट्टी_माहेरपण



  आमची दोघींची लग्न झाली, आई-बाबा दोघंच!! रोजचा स्वयंपाक आटोपशीर , 'उराऊर' नको ; या पद्धतीने व्हायला लागला. तसं दोघांनाही मधुमेह नसल्याने, इतरही तब्येतीचे त्रास नसल्याने पथ्यपाणी काही नव्हतं. वजन आटोक्यात ठेवणे ... हे एकमेव पथ्य पाळायची आईची सूज्ञ धडपड भजी, गोडाच्या गोष्टी .. यांना लांब ठेवणारी झाली.


   बाबांना गोड पदार्थ... विशेषतः श्रीखंड अतिशय आवडीचे!! रोज सुद्धा खातील इतकं प्रेम!! अतिरेक टाळण्याची आईची शिस्त असल्याने सणवार असले तरच श्रीखंड, जिलेबी ची वर्णी लागत असे! बाबा वाटच पहात असायचे .... मी किंवा ताई माहेरी जाणार असलो म्हणजे गडबड करायला सुरुवात!! 


   मुलींसाठी, नातवंडांसाठी तरी आणाला हवं! ... असं म्हणत 'हे' स्वतः साठीच श्रीखंड, कोथिंबीर वड्या, फाफडा , भजी वगैरे आणतात. अशी तक्रार एकदा तरी आई करीत असेच आम्ही गेलो की! (तिला समोसा अतिशय आवडतो , तो सुद्धा आणलेला असायचा .. याकडे कानाडोळा 😉)


  हळूहळू ताई आणि मी सणावारी जाण्याऐवजी सुट्टी.. रविवार, मे महिना इतपतच जाऊ लागलो. आमचे सांसारिक व्याप , नोकऱ्या , मुलांच्या शाळा -परीक्षा .. यांमुळे ते सहाजिकच होतं. आई-बाबा पण मुंबईत नसायचे. बरेचसे सणवार आई-बाबा गुहागरला साजरे करू लागले. अति पावसाचे तीनेक महिने वगळले तर दोघं गुहागरलाच जाऊन येऊन असतं. बाबा गेले, तोवर हा क्रम होताच.


   नंतर आई एकटी असायची... तिला सणाच्या दिवशी एकटी ठेवायचं नाही, असं आम्ही बहिणींनी न ठरवता ठरवून टाकलं होतं. ती आमच्या दोघींपैकी कुणाकडे किंवा आम्हीच तिच्या कडे!! .. असं करू लागलो. कोण कोणाकडे गेलं हा मुद्दा नसतो ... जिथं आई तिथं 'माहेरपण' असा अलिखित नियम असतो. 

  

  आता सणवार , माहेरपण आणि गोडधोड -चमचमीत असं समीकरण देखील संपलंय. आईला वयानुसार, तब्येती नुसार बरेच पथ्यपाणी सुरू झाले आहे. श्रीखंड आवडीने खाण्याची परंपरा माझ्या लेकाने चालवली आहे. त्याची ही आवड ताईने छान गाठीला बांधून ठेवली आहे! आम्ही ठाण्यात किंवा ती आमच्या कडे यायची असली की 'स्वाद' मधलं श्रीखंड हमखास तिच्या तर्फे ठरलेलं असतं!  


   वयाने वडील.. मोठं भावंडं आपोआपच पालकत्वाची जबाबदारी का घेत असावेत? ताई जवळजवळ सात वर्षे वडील आहे, पण ती जणू काही आधीच्या पिढीत आहे.. असं कसं काय वागू लागते? किंवा.. आई, ताई असल्या की मला. 'ह्हा , रिलॅक्स' .. असं का राहू वाटतं!! 


   नाती , बदलणाऱ्या भूमिका, जबाबदारी घेणं किंवा स्वतः कडे सानपण घेऊन निर्णय थोरल्यावर टाकून निर्धास्त, मजेत पाय हलवत बसून रहाणं!! सगळं कुतूहल कारक आहे.  


   आजुबाजुला नाती असावीत. आपल्या पेक्षा मोठी माणसं असावीत आणि आपल्यालाही थोरलेपणा घ्यायला मिळावा. सगळ्या चक्रातून फिरता यायला हवे. 

Tuesday, 22 March 2022

मुंगी

 

#मुंगी


  एक मुंगी होती. मुंग्या सगळ्या लहानच असतात,पण ही त्यातही लहान होती. तिला जमिनीमधून आतून आवाज ऐकू यायचे. हादरे जाणवायचे. इतर मुंग्यांना ही ऐकू यायचं, जाणवायचं; पण 'नेहमींचच' आहे , त्यात काय? .. असं वाटायचं.

  पण लहान मुंगीला वाटायचं की "असं कसं? असं का? असं कुठून?" लहान मुंगी चे पाय तर तिच्या पेक्षाही लहान होते. त्या पायांनी अतिशय जास्त अंतर चालत लहान मुंगी आवाज , हादरे इत्यादीच्या मूळ उगमाकडे जायला.. जवळजवळ पोहोचायला लागली.

   तिला ठाऊक नव्हतं की या जागी जिथे पोहोचलोत आपण तो एक समुद्र किनारा आहे. पण आपल्याला अर्थातच दिसू शकतं की लहान मुंगी समुद्रा जवळ वाळूत आहे! 

   वाळूत आल्यावर मात्र हादरे कमी झाले जमिनीतून येणारे... लहान मुंगी च्या लक्षात आलं. पण आवाज .. समुद्राची गाज मात्र जास्त गंभीर आणि दमदार झाली. अर्थात तिला हा हा समुद्र आणि हा इतका इतका मोठा .. हे काही कळलं किंवा दिसलं नाही. पण आपल्याला समुद्रा पुढे मुंगी कितीशी? हे जाणवतं.

   समुद्राच्या आवाक्याची चुणूक दाखवायला पांढरी फेसाळ आणि अनेक पदरांची लाट सळसळ सळसळ वेगाने मुंगीच्या अंगावरून घमघमघमघम करत गेली! एका बिंदूशी निमिषभर स्तब्ध होऊन आली त्याही पेक्षा खूप जास्त वेगवान 'खेच' बसली लाटेला...ती सरसरसरसरसर करत समुद्रात ओढली गेली.

    आपल्याला अर्थातच वाटतं की लहान मुंगी लाटेत गिळली गेली असणार आणि लहान असल्याने ती आपल्याला दिसणार नाही! त्यामुळे आपल्याला धक्का बसेल हे बघून की लहान मुंगी अजूनही किनाऱ्यावर आहे!! 

    लहान मुंगी ने तिच्या पेक्षाही लहान वाळूचा कण पकडून ठेवला , लहान वाळूचा कण दुसऱ्या कणाला, दुसरा कण तिसऱ्या कणाला पकडत पकडत किनाऱ्यावर टिकून राहिले. 

    आपल्याला भुसभुशीत, निराधार वाटणारी वाळू ... पाय वर घ्यायचा प्रयत्न केला तर पाय आणखी आत खेचणारी वाळू!! अर्थातच आपण मोठे आणि वजनदार असल्याने , जडत्व सोडू न शकणारे असल्याने लहान मुंगीच्या हलकेपणा मधलं मर्म समजू शकत नाही.  

     लहान मुंगी एवढी लहान, की तिला वाळूचा मोठेपणा दिसतच नाही. हादरे शोषणाऱ्या वाळूचे दडपण अर्थात तिला येतच नाही. पाण्यात भिजूनही वाळू ना ओली होत ना खारट! इतरांचा पाय गोठवून टाकणारं वाळूचा संकट लहान मुंगीला साधन ठरतं. पण आपल्याला जी ही गोष्ट खूप अचंब्याची वाटते , ती लहान मुंगीसाठी अस्तित्वात सुद्धा नाही. 

   जर लहान मुंगी वाळूला घाबरली असती तर वाळूच्या कणाची तरी मदत तिने का घेतली असती? 


२२ मार्च २०२२

    

Sunday, 19 December 2021

सल

 सल घेऊन कोणाकडे जावं तर तेच रक्तबंबाळ आहेत...

सय आली कोणाची तर त्या मनांची दारे-खिडक्या बंद आहेत..

ठाव लागतो का बघावे डोकावून तर तळ नव्हे प्रतिबिंब माझेच दिसते..

डाव नवीन मांडायचा मनसुबा हरवणाऱ्या सोंगट्यांत घरंगळताना पहावे लागते..

सरळ जाऊ , कशाला वळणे हवीत? म्हणेपर्यंत रस्ताच वळतो.

उतार सोपा ठरेल म्हणेपर्यंत परत नवा चढ लागतो.

क्षणभंगुर आयुष्य असलं तरी संपेपर्यंत कुठे संपणार आहे?

खूप करायचंय अजून म्हणणारे अचानक नाही से होत आहेत. 

वाचायचंच नाही म्हणून मिटता येतात तशा पापण्या कानांना सुद्धा असायला हव्यात , हवं तेवढंच ऐकू येतं .. अशी उत्क्रांती काही कानांत झाली आहे म्हणे!!

आपण फक्त उगणारा दिवस बघायचा असा आशावाद स्वतः ला बजाऊन सांगायचा. 

मावळतीचे रंग दिसले तरी त्यात प्रेमभरला शुक्रतारा शोधायचा.


Good night

Tuesday, 14 December 2021

असू आणि हसू


 जेव्हा सुखद थंडीत पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली नि प्रसन्न आळस देत अनाहूत हसू ओठांवर फुलंलं ...नाजूक ओठ चिरत रक्ताचा पिटूकला थेंब आसू घेऊन आला!!!🙆......

 थंडी आली आहे ....#ओठांची काळजी घ्या.लिपबाम व्हेसलिन लावा ...नाहीतर १००% शुद्ध गाईचं तूप आहेच.( भेसळवाली किंवा ८०-९०% शुद्ध गाय कशी असते भौ?🤔) 


खरखरीत ओठ कुणा गोबऱ्या लहानुल्या गालावर मुकं हसू आणण्या ऐवजी टोचरं आसू न आणोत.....किंवा दुसरे ओठ गाठता ...ओठ न् डोळे हसू लपवत मिटावे..

 थंडी आली आहे....#मोठ्यांची काळजी घ्या...स्वेटर आहे ना हळद घातलेलं दूध प्यायचं रोज (त्यांना ही ताकिद द्यायची संधी गमवू नका🙃) 

इतके च प्रश्न पुरतील ...(उगीच तू माझं पारले जी 😛 वगैरे लाडात यायची गरज काय?😜😁) ...थकले चेहरे, उगा निर्विकार चेहरे हसऱ्या डोळ्यात सुरकूततील ..आसू आणणाऱ्या.पायांच्या भेगा आपसूक मऊ पडतील!!


 थंडी आली आहे .....#तरूण_पट्ठे_पट्ठ्यांची काळजी घ्या.आता जवळ घेत नसाल त्यांना ,पण पाठीवर थाप ,केसांतून हात...(यें सब करने के लिए मैं हमेशा नहीं रहूँगी!!वगैरे 'क्रीमी' जाहिरात बाजी 😉 ) हरकत काय आहे?


 थंडी आली आहे ....#सगळ्यांचीच काळजी घ्या.


अक्षरशः काहीही लिहित सुटलेय...वाचून घ्या....बरं वाटलं तर हसून घ्या....ना तर (काहीही वाचायला लावलं म्हणून ) दोन आसू तरी गाळा


PRadnya

Monday, 13 December 2021

#उशी

 #उशी 

  लहान मुलं बरेचदा रात्री झोपताना कुशीत काही तरी खेळणं घेऊन झोपतात. बाहुली , टेडी बिअर वगैरे! माझा मुलगा एक साॅफ्ट टाॅय ... प्रीतीने भेट दिलेलं मनी माऊ कुशीत घेऊन झोपी जायचा. खरं म्हणजे त्या माऊवर लिहिलं होतं ... washable! पण प्रत्यक्षात मात्र ती धूतली आणि खराब झाली 😢 पुढले काही दिवस अस्वस्थ चुळबुळ झोप झाली होती लेकाची! 

  काही वर्षांपूर्वी फोमची गादी घेतली तेव्हा दोन उश्या सोबत मिळाल्या होत्या. मी डोक्याखाली कापसाचीच उशी घेते. फोमची एक उशी लेक वापरतो , दुसरी तशीच बेडवर इकडे तिकडे असायची! मध्यंतरी मला ती उशी कुशीत घ्यायची सवय लागली होती. 😅 

   रोज रात्री नव्हे ... रोज रात्री दिवसभराच्या दगदगीने अंग टाकल्या बरोबर झोपेत गुडूप!! पण क्वचित सुट्टी चा दिवस , एखादा आळसातला दिवस सरला ..की मात्र रात्री चटदिशी झोप येत नाही!! Ott पहाता पहाता किंवा काही वाचताना किंवा सहज लोळताना या उशीला मिठी मारून विसावायचं! 

   कशी कोण जाणे! पण ती उशी पलंगाच्या पलिकडे पडून पार खाली गेली आहे.बेड खूप अवजड! बाहेर काढता यायची शक्यता नाही. काढायचा प्रयत्न केला तरी ती इतकी धूळ भरली होईल की परत कुशीत घेववणार नाही. आत्ता जर्रास वाईट वाटलं ..पण चालसे!! कामात व्यग्र , व्यस्त दिवस आहेत तोवर काही चिंता नाही. पण एखाद्या निवांत , निवलेल्या संध्याकाळी कदाचित या उशीच सय येईलच! 

    कोणी म्हणाल ...त्यात काय? नवीन घ्या दुसरी उशी! पण ती तश्शीच  तेवढ्याच आकाराची , ठराविक ठिकाणीच पिचकलेली , तेलाचा वास येणारी वगैरे आणि मुख्य म्हणजे 'सवयीची' उशी परत मिळणार नाही. त्या पेक्षा उशी शिवायच झोपायची सवय लागलेली बरी .. नाही का? 


#प्रज्ञा 

(१४ डिसेंबर २०२१)


Sunday, 12 December 2021

सिनेमातल्या सारखी माणसं २

 #सिनेमातल्यासारखी_माणसं 

#अप्पी_बद्दल_आणखीन_सांग😊

    अप्पी सारखी माणसं भूरळ घालतात. परवाच्या पोस्ट मुळे अनेक मित्र मैत्रिणी ना तिच्या बद्दल कमाल आणि आदर वाटला. लोकांचं कुतूहल जागं केलं. असं कसं ती मुलगा होऊन राहिली? कोणी नव्हतं का तिचं आगे मागे? वगैरे बरेच प्रश्न पडले सर्वांना 😀

   मी सुरवातीला म्हणलं तर अगदी सहज आणि म्हणलं तर गैरसमजातून .. टूरिझम चा साधा सर्टीफिकेट कोर्स पूर्ण केला. ज्या इन्स्टिट्यूट मधे मी तो कोर्स करत होते, तिथे नारायण सर म्हणून होते. त्यांच्या मुळे मला Galileo या CRS (Computer Reservation System) चं ट्रेनींग घ्यायला जाता आलं. खरं म्हणजे असं कोणीही उठून गेलं ट्रेनींगला ... असं करता येत नाही. ट्रॅव्हल एजन्सी चे एम्प्लाॅयी फक्त ट्रेन केले जातात. 

    मी 'Aries Travels' ची एम्प्लाॅयी म्हणून तिकडे दाखल झाले. हीच युसुफ ची कंपनी होती. आणि हा जमवून आणलेला घोळ अर्थात अप्पीमुळे शक्य झाला होता. 

    आमची instructor म्हणून ती आत क्लासरूम मधे आली, प्लॅटफॉर्म वर चढली ... तरीही ती नीट दिसेना! इतकी बुटूकली होती. सरळसोट केसांचा झिडूक फिडूक करणारा पोनी , किंचित पुढे वाटणारे सशासारखे दात आणि टिपीकल बारीक डोळे.. अशी आमची ही instructor 😀 सगळं मिळून पाच दिवसांचं प्रशिक्षण , सहाव्या दिवशी टेस्ट आणि लगेच हातात सर्टीफिकेट!! 

    लंच ला ती आमच्यात येऊन बसायची. ती माझ्या बाजूला बसली... आणि तिच्या संपूर्ण डाव्या हातावर भाजल्याचा डाग दिसला. मी संकोचाने काही विचारलं नाही, पण माझी नजर , त्यातला प्रश्न समजला तिला. 

    बैदा पावच्या गाडीशी तवा अंगावर उलटून अपघात झाला म्हणाली! पुढे सगळी कहाणी .. निव्वळ सुरस! तिच्या बुटूकलेपणामुळे वयाचा अंदाज येत नव्हता. माझ्याहून आठ-दहा वर्षे तरी मोठी ! खेड्यात लहानपण गेलं. खाण्यापिण्याची आबाळ नव्हती. शिकायला ही मिळालं. त्यांना त्यांच्या खेड्यापासून जवळ जोगिंदर नगर च्या शाळेत , काॅलेजात बारावी पर्यंत रेटता आलं....पास नापास करत!

   अप्पी सात वर्षांची असताना तिच्या वडिलांना काहीतरी 'बाधा' झाली म्हणे! ते भ्रमिष्ट आणि वेगळ्या जगात हरवल्या सारखे झाले. मोठा भाऊ, अप्पी आणि तिची आई कष्ट करत , वडीलांची काळजी घेत , ही भावंडं जमेल तसा अभ्यास करत.

   मग वडील कुठे तरी निघून गेले, हरवले आणि सापडलेच नाहीत. दूर्दैवाने असं गाठलं या कुटूंबाला की आई ला घशाचा कॅन्सर झाला. उपचार करण्यात सगळंच पणाला लागलं !! आई पण गेलीच शेवटी. आता कमावणे , जगणे , शिकणे ... यामागे लागण्या शिवाय दोघा भावंडांकडे पर्याय नव्हता. 

     अप्पी चा भाऊ पर्यटकांना फिरवायचा , गाईड बनून फिरायचा!या पर्यटकांकडून बाकीचं जग जाणून घेण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. तेव्हा गुगल , यू ट्यूब सोडा ... मोबाईल तरी कुठे होता!! ओळखीची माणसं , माहिती असणारी माणसं आणि स्वतःवर विश्वास यावरच भिस्त ठेवावी लागायची. मुंबईत काही नशीब काढता येईल असं ठरलं. शिक्षण आणि अर्थार्जन दोन्ही दृष्टीने मुंबई गाठणं बरं वाटलं. मुंबईत म्हणावी तशी सोय लागली नाही. 

    अप्पीचा भाऊ अनेक भाषा सफाईदारपणे बोलायचा! विशेषतः इंग्रजी आणि हिंदी. जेवण उत्कृष्ट बनवायचा! त्याला काम मिळालं... पण फिरतीचं. अप्पीची सोय करता आली नाही, शिवाय तिला ग्रॅज्युएशन काही झालं तरी करायचंच होतं. रहाणार कुठे? काय कमावणार? वगैरे प्रश्न आ वासून समोर होते! 

    बेनी काका/चाचा बरोबर काम करायला ,रहायला, रस्त्यावर झोपायला , मिळेल तिथे आंघोळ इत्यादी करायला अप्पी तयार झाली कारण .... 'मला जगायचं होतं , मला चांगलं जगायचं होतं'. अप्पी म्हणते की आत्महत्या वगैरे विचार दूर दूर पर्यंत कधीच आला नाही मनात! पहाडी भाषा , त्यांचं कल्चर भाषा, त्यातली शिकवण वगैरे बद्दल सांगितलेलं बारीकसारीक लक्षात नाही माझ्या!! पण मथीतार्थ असा की आत्महत्या हे पाप !! संकट म्हणजे संधी! 'पहाडी' म्हणवल्या जाणाऱ्या बऱ्याच भाषा आहेत म्हणे! तिच्या मातृभाषेत बरेच संस्कृत शब्द आहेत. अप्पी बहुतेक त्यामुळेच मराठी खूप पटकन शिकली असावी. असो. 

     तर ...सुदैवाने ती लहान चणीची , बारीक काटक होती ...की मुलगा आहे, मुलगी आहे , ते कळतच नसे. अप्पी म्हणाली , खरं म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की 'मुलगा' म्हणून रहायचं!! योगायोगाने तिच्या अंगावर भावाचे ढगळ टी-शर्ट , चेक्स च्या थ्री-फोर्थ हेच बाॅईश कपडे होते. लोक आपले आपणच तिला 'अरे टिंगू, अरे छोटू' असं आवाज देऊ लागले. ती ज्या जागी होती त्या जागी एखादी मुलगी असेल अशी कल्पनाच केली नसणार कोणी!!या समजूती ची दुरुस्ती करायच्या फंदात ती पडली नाही. कारण हे पथ्यावर पडणार होतं.

   आठ महिने!! आठ महिने अप्पी अशी राहिली. 'गरज नसेल तर बोलायचं नाही. तोंडून शब्द काढायचा नाही.' ... हा गुरुमंत्र अप्पीने इतका मनावर घेतला होता की ती नंतर सगळं बऱ्यापैकी ठीक झाल्यावर सुद्धा बोलायचं विसरायची!'बोलने में बहुत एनर्जी वेस्ट करता है मनुष्य' 😂 असं म्हणत असे ती आम्हाला शिकवताना सुद्धा! अप्पी डिस्टंट एज्युकेशन ला हजार दूवा देते! ते नसतं तर तिला डिग्री मिळवणं फार कठीण गेलं असतं. ती मुंबई ला ही दुवा देते. 'मला चांगले लोक भेटले' असं आवर्जून सांगते. 

  ' त्यांच्यात ' बायका खूप कष्टाळू आणि त्या मानाने स्वतंत्र असतात. विशेषतः लग्न न करता एखादी तरूणी , स्त्री आयुष्यभर राहू शकते. कोणीच तिला प्रश्न विचारत नाही. तिला मूल झाले तरीही (लग्ना शिवाय) तिला प्रश्न विचारत नाहीत. मला वाटतं , या प्रकारच्या समाजात राहिल्यामुळे अप्पी एकटीने रहाणे , हिम्मत न हरता लढणे ... हे करू शकली. 

   तुम्ही हे वाचा .. आणि विचार करा अप्पीबद्दल!! उद्या थोडं पुढे जाऊ. 😊


#प्रज्ञा

(१३ डिसेंबर २०२१)


 


 

Saturday, 11 December 2021

सिनेमातल्या सारखी माणसे

 #सिनेमातल्यासारखे_लोक  

#अप्पी


  अप्पी नेपाळी ...माझी मैत्रीण! ती Galileo मधे ट्रेनिंग सुरू असताना भेटली. तिचे पणजोबा किंवा खापर पणजोबा नेपाळमधून भारतात आले , पोटापाण्यासाठी!! हिमाचल मधल्या कोणत्याशा खेड्यात वसले ते तिथलेच झाले. नेपाळसे आए .. नेपाळी , हेच नाव चिकटलं ओळख म्हणून.

    अप्पी ची गोष्ट भारी! बारकीशी पण काटक अप्पी मुंबईत आली ती मुलगा बनून! रस्त्यावर राहिली. चहाची टपरी , बैदा-पाव ची गाडी ... एकीकडे पदवीची परीक्षा! मी अविश्वासाने तिच्या कडे बघत तीची गोष्ट झटकून टाकली! तिने हसून काही फोटो दाखवले. बेनीचाचा वगैरे लोकांना भेटवलंन मला प्रत्यक्ष! तेव्हा नाईलाजाने मी तिच्या गोष्टी वर विश्वास ठेवला.मुंबईतल्या  त्या चार वर्षांतले कष्ट अप्पीच्या डोळ्यात बघून माझी बोलतीच बंद झाली. दलाल आणि पोलिसांना हफ्ते , मासिक अडचण असताना 'मुलगी' असणं लपवतानाची कसरत , इतकं कमी बोलायची की लोक 'गुंगा है क्या बे?' विचारायचे ती आठवण!! 

   अप्पीला पदवी मिळाली आणि मग ट्रॅव्हल एजंट कडे काम मिळालं. आधी पेईंग गेस्ट , मग भाड्याने खोली ,मग IATA UFTA चा अभ्यास !! नंतर महेंद्र बरोबर ओळख-मैत्री-प्रेम!! अप्पी आणि महेंद्र दोघंही चांगल्या ठिकाणी जाॅब करताना लग्नाचा आणि घर घेण्याचा विचार करत होते. 

     या दोघांची जात पात भाषा धर्म ...यात काहीही ताळमेळ नाही.महेंद्र अनाथ आश्रमात वाढला.हातावर नाव गोंदलेलं होतं! मल्याळी मधे गोंदलं होतं म्हणून ती मातृभाषा म्हणायची!! तेवढंच जन्मदात्यांनी दिलेली पूंजी!     

     अप्पी आणि महेंद्र ...' कष्टाळू ' हीच ओळख!! मजेत आहेत दोघे! 

   अप्पी तिची स्वतःची भाषा लिहिते , बोलतेच! पण मुंबईत रस्त्यावर राहून मराठी, गुजराती, हिंदी , इंग्लिश बरोबरच मोडकंतोडक्या कन्नड , मल्याळी पण बोलू , समजू शकते. 

    हे जोडपं अतिशय सहृदय आहे.आत्ता कोरोना काळात सुद्धा कोणाला कशी मदत करता येईल हे मनापासून पहात होती दोघं जण! मला पहिला लुटूपुटू चा जाॅब अप्पी मुळेच मिळाला. 'इथे बस् तू युसूफ ला मदद कर ! तेच्या स्टाफ ला आपडी(आपली) CRS शिकवून दे. तुला मंग एक दो सालचा एक्सपिरंस सर्टीफिकेट करून देल युसूफ' 😂 जास्तीत जास्त तिच्या सारख्या भाषेत लिहिलंय मी.

   युसुफ चे office म्हणजे गंमत , तो स्वतः एक नमुना आणि तिथे भेटलेल्या रफिक ची गोष्ट ..डिट्टो कयामत से कयामत तक 😂.. पण ती उद्या सांगते. 


#प्रज्ञा

(११ नोव्हेंबर २०२१)


Saturday, 27 November 2021

भीती

    आज पहाटे पहाटे जाग आली. सहज मोबाईल हातात घेतला आणि इथे आले. काही जणांनी भयकथा पोस्ट केल्या होत्या, त्या वाचल्या. पहाटे भीती वाटली नाही. मी कल्पना करून पाहिलं ... रात्री वाचल्या असत्या तर भीती वाटली असती का? यावर काही निर्णय झाला नाही माझा.

  भयकथा कधीही , कोणत्याही वेळी भीतीची भावना निर्माण करू शकली पाहिजे. जसं हास्यकथा कधीही हसू आणते. गूढकथा वेगळी आणि भयकथा वेगळी. बरोबर ना? भयकथेत काही गूढ असेलच असं नाही. तसंच गूढ आहे ते भय वाटवणारं असेलच असं नाही. पण 'अज्ञाताची' भीती .. असू शकते. 

   या कथा रात्रीच जास्त भीतीदायक का वाटतात? एकतर अंधार असतो ... कृत्रिम साधना (इलेक्ट्रीसिटी , टाॅर्च वगैरे) शिवाय 'उजेड' मिळत नाही. दुसरं .. मदतीला येऊ शकतील असे 'इतर' बेसावध, झोपेच्या अंमलाखाली!! 

   रात्र , अंधार , आजार , दु:ख....या गोष्टी 'एकटेपणा' घेऊन येतात. एकटेपणा स्वतः बरोबर असहायता, असुरक्षितता घेऊन येतो. आपण असुरक्षित आहोत हे अंतर्मनाला समजलं की कुठेतरी दडून बसलेल्या अपराधगंडाला हळूच पाय फुटतात. किंवा कसलीतरी भीती आधीच ,असतेच मनात ... तिला रस्ता फुटतो. 

    अंधाराची भीती .... ही एकमेव भीती 'उपजत' असते , इतर गोष्टींबद्दल माणूस शिकतो घाबरायला!! हे जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं कुठेसं , तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं. नवजात अर्भक आईच्या गर्भात असताना खरं म्हणजे अंधारातच तर असतं! मग जन्माचा सोबती अंधार! ..त्याचीच भीती? या मागचं गूढ काय असेल? 


#प्रज्ञा

(२८ नोव्हेंबर २०२१)

Saturday, 23 October 2021

 

  #ब्रॅंडेड_दिवाळी 
   इथल्या बैठ्या चाळींमधे सामुहीक दिवाळी असते. घाऊक भावाने एकाच प्रकारचे कंदील आणून दारोदार लावले जातात. फटाके , खवा , तेल , रवा ,पोहे , मका वगैरे सुद्धा घाऊक बाजारातून खरेदी होते.
   कालच 'टेम्पो आला' असा निरोप वनावळे वहिनी देऊन गेल्या. माझ्या विद्यार्थ्यांकडून फराळाच्या ... खास करून चकली आणि मक्याचा चिवडा यांच्या orders मी लगेच वहिनींना WhatsApp केल्या.
   यावर्षी चाळीत अनेकांना नोकरी नाही. बऱ्याच जणांना अर्धेच पगार !! आजारपण मागे लागलंय अशी घरे दर दोन खोल्या ओलांडल्या की दिसत आहेत.
  इथे सगळ्या ठिकाणाहून आलेली अठरापगड वस्ती आहे. नेपाळी(?)पोरं ... चायनीज गाडीवर काम करणारे! 🙄
कचरा उचलण्यासाठी येणारा मोगी इथेच रहातो. सकाळी लवकर उठून पार ऐरोली पर्यंत सायकल ठोकत रमेश इडली मेदुवडे आणि काॅफी विकून येतो. नंतर हा मद्रासी अण्णा हार्डवेअर च्या दुकानात चार तास बसतो.
   मुसलमान फूलवाले , नारळवाले रहातात. हरियाणवी प्रीतू की दादी !!ही बया आजच्या काळात सुईण ..बाळंतपणं करते. मसाल्याच्या ऑर्डर्स ज्या मैत्रीणींबरोबर मी घेते ... त्या ही इथल्याच!! त्यांची घरांची पत्र्याची छपरं आमचा मिरच्या भाजायचे कष्ट आणि इंधन वाचवतात.
    इथे खूप प्रचंड भा़डणे , शिव्या गाळ होते! बाया - बापये हाणामारी पण करतात क्वचित! प्रसंगी एकमेकांचे जात-धर्म , आई-बाप काढतील! पण उत्सव एकत्र आणि एकालाही बाकी न ठेवता साजरा करतील.प्रचंड आशावाद आणि 'जीवनेच्छा'  हा इथला ब्रॅंड आहे!

#आली_दिवाळी

  

Tuesday, 28 September 2021

सूक्ष्म-भव्य

 #उगाच


सूक्ष्म काय, काय भव्य 


सूक्ष्म गुंतागुंतीचं

भव्य सहज सोपे


कष्टपूर्वक पाहूनही दिसत नाही ते सूक्ष्म?

की दिसतं , पण समजत नाही ते?


सूईच्या टोकावरचा सूक्ष्म बॅक्टेरिया ?

मातीच्या कणातला सूक्ष्म ओलावा?


भव्य ते ,तेही दिसत नाही

कारण भवताल व्यापतं .. वेगळं काढता येत नाही.


आकाशात आकाश असावं तसं भव्य!

समुद्रात समुद्र दिसतो तसं भव्य! 


सूक्ष्म आणि भव्य एकच असतं का? 

का सूक्ष्मच दुसऱ्या टोकाला भव्य होतं?


सूक्ष्मात भव्य सूक्ष्मता असते .. म्हणता येईल!

भव्य अनेक सूक्ष्मांनीच घडतं ना? 


विश्व सूक्ष्मातून भव्याकडे जातं ? 

का भव्य विश्व सूक्ष्म होत जातं?

 तुम्हाला असा अनुभव आहे का ते बघा! 👇

काही तरी कारणाने ... कारण काहीही धरा! .. आपल्याला शुभेच्छा मिळत आहेत. समजा की म्हणे .. वाढदिवस असतो आपला! मग सगळे येतात. शुभेच्छा , हाय , हैलो, मेसेजेस .. वगैरे! 

एखादा माणूस/बाई असतो .. शेजारपाजार , ऑफिस किंवा असाच ! त्या माणसाकडून शुभेच्छा मिळतील का नाही असं आपलं असंच .. उगीच विचार येत जात रहातो. 

एकूणच फार काही शुभेच्छा महत्त्वाच्या नसतातच .. आता वाढदिवसाच्या शुभेच्छांचं ते काय कितपत ना कौतुक या वयात! 

त्या माणसाने येऊन बोलावं ..असंही वाटत असतं आणि या न बोलतील तरच बरंय ..असंही वाटत रहातं. 😂😂

मग हे डोक्यातून गेलं , आपण विसरलं , लक्ष वेगळी कडे वळलं की अचानक भाॅक् करून या व्यक्ती कडून शुभेच्छा आदळतात येऊन!! 😳 आपण कोरडे आभार मानून पुढे निघतो.

मग नंतर ... अर्रे यार! श्श्या !! हे नीटच नाय झाला यार कम्यूनिकेशन! साला काय त्रास! त्या पेक्षा यांनी बोललंच नाय पायजे होतं! वैत्ताग नुस्ता !


😂😂😂😂😂

Friday, 15 January 2021

#ऐसी_अक्षरे

 #ऐसी_अक्षरे 

आई सांगते की मी माझ्या वयाच्या दहाव्या महिन्यातच बोलायला सुरुवात केली होती ..बोलायला आणि धावायला लवकर सुरुवात केली पण लिहिण्याचा उत्साह मला अजिबात नव्हता. अक्षर म्हणजे कोंबडीचे पाय !! 

तेव्हा मला आईचा, शाळेतल्या बाईंचा खूप राग यायचा. पण आज लोक 'तुमचं अक्षर छान आहे हो!' वगैरे म्हणतात तेव्हा मनात मी खो खो हसते! वाटतं ...आईने ऐकलं पाहिजे हे 😆 


माझं अक्षर तरीही ... वळणदार वगैरे नव्हतं, पण वाचनीय आणि खूप मोठं  होतं, ज्याला दामले बाई 'ढबोळं' म्हणून आठ्या घालायच्या! त्या सतत मला टोकायच्या " खरेss ..एका ओळीत सात-आठ शब्द मावलेच पाहिजेत! केवढं ढबोळं लिहितेस? इथून तिसऱ्या बाकावरच्या मुलाला वाचता येईल !!"  त्यांच्या प्रयत्नांमुळे मी अक्षरांचं आकारमान कमी करण्याचा अथक आणि यशस्वी प्रयत्न केला. 


मी टुरिझम मॅनेजमेंट कोर्स केला तेव्हा मात्र या गोष्टी चा मला फायदा झाला. त्यावेळी विमानाचे तिकीट चेकबुक सारखं दिसायचं. त्यावर छोट्या चिंचोळ्या पट्टीवर प्रवाश्याचे नाव लिहावे लागे, तेही Capital letter मधे!! तिकिटं manually लिहावी लागायची. PNR , destination वगैरे डिटेल्स सुद्धा capital मधेच लिहायचं!! 


माझा स्पिड ... तिकिटं लिहायचा किंवा प्रिंट करायचा किंवा seats grab करायचा ... खूप फास्ट होता!! Infact जसा पाणीपुरी वाला स्लो पुऱ्या सर्व्ह करू शकत नाही तसंच ' हळूहळू' बुकिंग मी करु शकत नसे 😆 पण

जाॅब व्यतिरिक्त कुठे काही इंग्रजीत लिहायची वेळ आली की मी अनवधानाने सगळी अक्षरं capital मधे लिहायचे आणि आजुबाजुचे चक्राऊन जायचे! 


  मला सर्वात मोठं अप्रूप , आश्चर्य वाटतं आलंय धातूच्या भांड्यांवर लिहिलेल्या अक्षरांचं!!! ते सतत हेलकावतं , थरथर करणारं अवजड मशीन हातात धरून धातूच्या पृष्ठभागावर सुबक आणि वळणदार अक्षरात तारीख , प्रसंग नोंदून देणारे भंडारी काका !! मला साध्या पेन वा पेन्सीलने तपश्चर्या पूर्वक ही न जमणारं सुबक अक्षरं लिहिण्याचं काम एवढं लीलया करणारा भंडारी काका म्हणजे जगातील आठवं आश्चर्य होता माझ्या करीता 😀 आई , आजी , शेजारी-पाजारी भांडी विकत घ्यायला भुलेश्वर ला कोणत्यातरी ठराविक दुकानात जात. भांडं घेतलं की त्यावर नाव कोरून घ्यायचं! खास प्रसंग असेल ..जसं की आहेर, मुंज , घर लावणी , दिवाळसण वगैरे ची नोंद करून घ्यायची. भंडारी एकीकडे कर्र् कर् टटर् करणाऱ्या मशीनच्या टोकाने टकटकवत सुबक अक्षरं कोरून द्यायचे. दुसरी कडे कान्हेरे , बापट , साठे , गाडगीळ ...'अमक्याच्या कार्यात तमकी नी काय दिले ' अशा गप्पा करता करता शेट बरोबर किमती ची घासाघीस चालायची!!  


आज मला दूध उतू न जाऊ देता तापवणारा शिट्टी चा कुकर आणि त्या वरची अक्षरं पाहून भरून आलं. माझ्या जन्माच्या आधी .. कदाचित माझ्या जन्माची चाहूल लागली म्हणूनही असेल ...आई ला तिच्या दोघा भावांनी मिळून 'भाऊबीज' म्हणून ओवाळणी म्हणून ही उपयुक्त वस्तू दिली!! शार्दूल अगदी बाळ असताना त्याच्या पुरती मऊ खिचडी वा तत्सम काही करायला वगैरे छोटा कुकर ; बोंडली , बोळकं असं आईने मला दिलं ..त्यात हा कुकर सुपुर्द केला. "यात दूध उतू जायचं नाही , तेव्हा बाळाला टाकून गडबड करत उठायला नको .. उदय-अभय ने स्वतः च्या कमाईची भाऊबीज केली होती..." हे सगळं एकीकडे मी ऐकलं होतं पण आज ती तिच्या तोंडून निघालेली अक्षरं जणू काही पहिल्यांदाच शब्द बनून मला अर्थ सांगत होती.  


हल्ली भांडी काळी , रंगीत असतात! स्टील चे डबे , ताटं वाट्यांची जागा टपरवेर चे डबे , क्रोकरी डीनर सेटस् किंवा मायक्रोवेव सेफ भांड्यांनी घेतलीये! त्यावर नावं घालता येत नाहीत. आणि आताशा अशा गोष्टींमधे भावना कमीच गुंततात. 


हाताने कोरुन अक्षरं लिहिणं ... हळूहळू लोप पावणार आहे!! पेन्सील पेन किंवा मशीन जातील मरणालागी!! की-बोर्ड ची टकटक अक्षरं टाईप करतील. "तुझं अक्षर खराब , कोंबडी चे पाय!" ...असे शेरे उरणार नाहीत. 

अक्षरं किरटी , ढबोळी , वेगवेगळ्या वळणांची आहेत ...त्यावरून लिहिणाऱ्याचा स्वभाव किंवा भविष्य ओळखणारे आता काय करतील? 😀😀  


हळूहळू 'नावं कोरलेली भांडी' मोडीत जमा ...त्या भांड्यांची मालक असणारी पिढी देखील मोडीत निघते आहे! अक्षरां मागच्या भावना मात्र चिरायु राहोत ... एवढी काय ती सदिच्छा करू शकते मी 😊


#प्रज्ञा

#तेव्हा_असं_झालं_की



 आठवणी वादळासारख्या , लाटांसारख्या  असतात. एक आली की पाठून दुसरी येते , तिसरी येते ....जाणारीला परत किनाऱ्याला आणणारी आणीक एक येते!! 


  पूर्वी एखादे रंजक पुस्तक वाचायला बसले की मन म्हणायचं ...हा एक्कच भाग वाचून ठेऊन देऊ ...परीक्षा आहे , अभ्यास आहे , गृहपाठ आहे!! मग वाचता वाचता कधी पुढल्या भागात पोहोचायचे ते कळत नसे ...मग परत म्हणायचं , नै नै ..हा आता शेवटचाच भाग वाचू! ! उरलेलं नंतर वाचू 😀


  भूतकाळातल्या आठवणींचंही असंच काहीसं होतं!! त्यात जर त्या 'रम्य बालपणीच्या' किंवा 'कर्तबगारीच्या' काळातल्या असतील तर मन परत वर्तमानात यायला खूपच खळखळ करतं! 


 तुमचा अनुभव? 


#प्रज्ञा

#तो_म्हणून_मी

  


एक जण खाणाखुणा करून बोलत होता ...समोरचा ही खाणाखुणा करून बोलत होता.


   तिसरा आला ..तो ही तसेच बोलू लागला.


 आता पहिला खूप म्हणजे खूपच वैतागला!! त्याने जवळचा एक कागद घेतला , पेन घेतले आणि त्यावर लिहिले ...


"अरे ...माझी दाढ काढलिये ,  दाढेत कापूस दाबून धरुन बस म्हणालाय डेंटिस्ट! म्हणून खूणा करतोय मी ... तुम्ही दोघे का खाणाखुणा करताय? " 🤔😒


 दुसरे दोघे ....👉 हा ..तू 👈 ..👉 तो 👈 बोलतोय म्हणून मी बोलतोय 


😁😁😁😁


#प्रज्ञा

Sunday, 24 May 2020

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग१२
 गोवर्धनदास यांनी बाबांना शांत रहायला सांगितलं. मिटिंगमध्ये फक्त आणि फक्त ऐकण्याचं काम करायचं. ना चिडायचं ना इमोशनल व्हायचं ना अपराधी भाव मनात ठेवायचे! सगळं ऐकून 'ठिक आहे, विचार करून कळवतो.' एवढंच बोलून यायचं.
  काकांनी सुद्धा बाबांना जवळपास असाच सल्ला दिला. डोकं थंड ठेव हा मुख्य सल्ला होता.😀
  मिटिंगला बाबांबरोबर गोवर्धनदास यांचे एक स्नेही गेले होते. मला त्यांचं नाव आठवत नाही. ते आर्किटेक्ट आणि वकील होते. मांजरेकरांच्या पुतण्याने 'आमचं कुटुंब त्यांच्या (मांजरेकर मामांच्या) एकट्यावर अवलंबून आहे' असा दावा केला. तसंच कामगार जर कामावर ..साईटवर असताना जखमी झाला , मृत्यू पावला वगैरे तर मालकावर /कंपनीवर थेट जबाबदारी असते. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी लागते. कायद्यात तशी तरतूद आहे. असं पुतण्या चं म्हण्णं होतं. त्याच्या वकिलाने पाच लाख रुपये नुकसानभरपाई ची मागणी केली.
   बाबा म्हणाले की त्या दिवशी ते घरी कसे पोहचले ते त्यांचं त्यांना माहीत! हात पाय कापत होते. हृदयाची धडधड दुप्पटीने होत होती. संध्याकाळी काका , बाबा खूप वेळ बोलत बसले होते. पुढचे अनेक दिवस, महिने काका गिरगावात खूप उशिरा पर्यंत थांबायचे. पार शेवटच्या गाडीने बोरीवलीला परत जायचे. सतत बाबांबरोबर थांबायचे. नंतर एकदाच काकांनी बोलता बोलता म्हटलं की 'मी थांबाचो ...याचा काय भरवसा? भलतं सलतं डोक्यात घेतलंन , इकडे तिकडे निघून गेला ...त्याला आपल्या डोळ्यासमोर गुंतवून ठेवला पाहिजे एवढं माझं मी ठरवलं होतं.'
   नंतर या सगळ्या गोष्टी वर गोवर्धनदास , त्यांचे स्नेही , कंपनी (ज्यांची मुख्य साईट होती) चा एक लिगल अॅडव्हायझर आणि पै काका पण यांच्या चर्चा झाल्या. कोर्टात न जाता बाहेर सेटलमेंट झाली तर बरं ...यावर सगळ्यांचं एकमत होतं.
  पुतण्या खोटं बोलत होता हे नक्की. कारण मांजरेकर मामांची पत्नी काही वर्षांपूर्वी वारली होती आणि त्यांना मूलबाळ नव्हते. ते स्वत:च्या घरात दोन मित्र म्हणा, गाववाले म्हणा .. यांच्या बरोबर रहात. तेच लोक अंत्यसंस्काराला पुतण्या व भावा बरोबर होते. पुतण्याचा आणि भावाचा जेवढ्यास तेवढाच संबंध होता. पण माझे बाबा 'हिरो' ..पुतण्या 'व्हिलन' ..मग कोर्टात हिंदी सिनेमा इष्टाईल आरोप-प्रत्यारोप होऊन बाबा जिंकले ..असं व्हायला आयुष्य काही हिंदी सिनेमा थोडाच होता? 😄
   कोर्टात काहीही होऊ शकतं. केस कितीही वर्ष चालू शकते. जेव्हा मांजरेकरला अटॅक आला तेव्हा काम बंद होतं, लंच ब्रेक होता. त्या दिवशी मुळातच कामाला हातही लावला नव्हता मांजरेकरांनी. अर्धा दिवस उलटला आहे..रोज पूरा मिळणार नाही , तुम्ही आराम करा , उद्या या ...वगैरे संवाद सर्वां समक्षच झाला होता. ही बाबांसाठी मोठी जमेची बाजू होती. तरीही मनस्ताप टाळण्यासाठी समझौता करण्यावर भर द्यायचं ठरलं.
  पुतण्याने मागितलेली रक्कम देणं तर निव्वळ अशक्य अशक्यच होतं. बाबांना जीवाला तोच घोर लागून राहीला होता. दोन्ही मुलींची शिक्षणं बाकी , आई तर निवृत्ती घेऊन बसली होती! व्यवसायाचा पसारा मांडला होता. दिवसा गणिक गरजा वाढत होत्या.. महागाई वाढत होती.
   त्यांचं मनस्वास्थ्य साफ बिघडलं. ते पूर्ण नास्तिक होते वा काय मला माहित नाही ..पण जप , नामस्मरण केल्याने आणि देवाचा धावा केल्याने संकट टळत नाही हे ज्याला पक्कं ठाऊक आहे ..असा प्रचंड practical माणूस होता तो!!! अशा प्रसंगात देवावर विश्वास नसणाऱ्यांची खूप खूप मोठी परीक्षा असते. सगळी कडून आधारच नाहिसा होतो ...ज्या स्वत:वरच्या दूर्दम्य विश्वासावर सगळं उभं केलेलं असतं तो विश्वासच जर हलला गेला तर काय होईल?
   त्यांची सिगरेट वाढली , चहा वाढला. वजन घटलं , केसही पांढरे होऊ लागले भरभर. कोणा कोणाला चालल्या प्रकाराची कुणकुण लागली की त्यांचे चौकशी ला फोन येत. असे फोन घेतले , बोललं की त्यांना अधिकच नैराश्य येई.
  गोवर्धनदास काकांच्या सल्ल्या प्रमाणे ते रोजच दिवसभरातील महत्त्वाच्या गोष्टी, घटना लिहून ठेवत होते. मग बाबांनी त्याच चोपडीच्या (बिझनेसवाले लोक बरेचदा वही ला (notebook) 'चोपडी' म्हणतात.😄 ) शेवटच्या पानावर स्वत: साठी काही तरी सकारात्मक लिहायला सुरुवात केली. उदाहरणार्थ : माझ्यावर पाच पैशांचही कर्ज , उधारी आज घडीला नाही.
Yess ..😀 this was a positive thought 👍
मग यात भर पडू लागली , माझा भाऊ माझी बहीण मला धीर देतात. माझी बरीचशी माणसं (😢) अजूनही माझ्या बरोबर आहेत...
माझी पत्नी समजूतदार आहे, माझ्या बरोबर खंबीरपणे उभी आहे.
मुली शिक्षणात हुशार आणि समंजस आहेत. वगैरे!!
   त्यांनी या काळात 'positive thinking'. या विषयावरील पाच पंचवीस पुस्तकं वाचून काढली. सतत मनाला उभारी मिळावी म्हणून जे करता येईल ते केलं. आम्हाला 'लघुरुद्र घाला , उपवास धरा , गुरू शोधा' असे पुष्कळ सल्ले मिळाले. आई-बाबांनी या प्रेमळ सल्ला देणाऱ्यांची मने कधीच दुखावली नाहीत पण आई म्हणते ..आमचं अशा गोष्टींत मनच रमलं नाही..कराव्याशा वाटल्याच नाहीत तर जूलुमाचा रामराम हवा कशाला?  नाही म्हणायला आई दर शुक्रवारी काळ्या रामाच्या देवळात तेवढं जायची. एक गजरा देवीला वहायची.
  बऱ्याच मिटिंगज् झाल्या. गोवर्धनदास यांचे स्नेही हुशार होते. त्यांनी एका फार मोठ्या आणि नावाजलेल्या वकिलांच्या वांद्रे येथील मोठ्या आॅफिस मधे फायनल मिटिंग ठरवली. पुतण्या , त्याचा वकील , बाबा आणि ते स्नेही असे मिटिंगला गेले. बाबा म्हणाले...तो माणूस म्हणजे प्रचंड आत्मविश्वास!! एक एक करत तो पुतण्याच्या वकीलांशी कायद्याच्या अगम्य भाषेत बोलत होता...त्यांना निरुत्तर करत होता.कोर्टात जाणं तुम्हाच भारी पडेल , त्यापेक्षा अनुकंपा म्हणून खरे देऊ करत असलेली रक्कम चर्या निवांत !! हे सहज गळी उतरत होता त्यांच्या!! त्या कायदेशीर भाषेतलं मला काही जरी कळत नव्हतं तरी मला अचानकच अवघड पेपर सोप्पा वाटायला लागला! इतके दिवस उगाच मी चिंता केलीसं वाटून मला मानेवर केस उभे राहिले. माझ्या ही नकळत माझे ओठ छोटं हसू येऊन ताणले गेले आणि डोळेही चुरचुरीत होते! 😄
  पुतण्या व त्याचा वकील तोंड पाडून होते पण तरी पैशांवर तडजोड ही केलीच त्यांनी!! पाच लाखावरून थेट पन्नास हजारांवर 😂😂 त्यांनी सगळं आवरतं घेतलं.
  वांद्र्याच्या या (बहुतेक कुलकर्णी साॅलिसिटर्स ..नाव नक्की आठवत नाही) वकीलांनी या तीन तासांच्या मिटिंगची सात हजार रुपये फी घेतली. 😄
बाबांनी मग काही दिवस चक्क नोकरी केली ...त्यांच्या माणसां सकट त्यांना नोकरी दिली तरी कोणी? मग तिथे पुढला वाढदिवस कसा साजरा झाला? 😂😂😂 हा किस्सा ऐकायचा आहे का तुम्हाला?
#PradnyaSubodhAhire.


   
 
 

  
#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग११

 बाबा, काळेले दोघं धावत फाटकातून आत गेले. गोवर्धनदास यांनी गेट जवळच्या इंटरकाॅम वरुन वरच्या office मधे काॅल केला आणि कंपनीचा डाॅक्टर बोलवा वगैरे सांगून मेन officer ना पण काय झालं ते कळवलं!!
  बाबांना माणसांनी सांगितलं की सगळे बसले , बोलत होते आणि एकदम मामा छाती दुखते दुखते करत आडवा झाला. तोंडावर पाणी मारलं , हात चोळले ... काही उपयोग नाही. बाकी officer , कंपनी डॉक्टर येऊन पटापट ambulance बोलाऊन पुढच्या वीसेक मिनीटात जवळच्या हाॅस्पिटल मधे नेलं. तिथे डाॅक्टरांनी सांगितलं की काही करता येणार नाही. मॅसिव्ह हार्टअटॅक...आॅन द स्पाॅट गेले. 😑
  सगळं वातावरण पालटलं. वाईट वाटतं होतं , मांजरेकर मामांच्या घरी कळवायचं तर फोन वगैरे नव्हता. बाबांनी त्यांच्याच दोन माणसांना स्वत: घरी जाऊन निरोप द्यायला पाठवलं.
   कंपनीतले officer , पोलिस , गोवर्धनदास सर , हाॅस्पिटल , डेथ सर्टिफिकेट देतानाचे सोपस्कार या सगळ्यात बाबांचा उरलेला वाढदिवस संपून गेला. मांजरेकरचा पुतण्या , भाऊ आणि काही जण आले. सगळे विधीवत आटोपून "काही लागलं तर कळवा" सांगून बाबा एकदाचे घरी निघाले.
   गोवर्धनदास साहेब दुपार पासून बाबांसोबतच होते. त्यांनी बाबांना स्वत:च्या गाडीने घरा पर्यंत सोडलं. तू खूप जास्त काळजी करतोस खरे ! आणि खूप चूकीच्या ठिकाणी ओवर रिएक्ट पण करतोस. एवढा नरम दिल कामाचा नाही. जे झालं त्यात तुझा काय मिस्टेक आहे का? मऊ लागलं की लोक कोपराने उकरणार! तुला कसली गरज लागली तर मला सांग. आणि आज पासून एक एक गोष्ट जी होते , कोणाचा काॅल आला , कोण तुला काय बोलला ...एव्हरीथिंग तू नोट डाऊन कर.
   असे चमत्कारीक सल्ले गोवर्धनदास साहेबांनी का द्यावेत ? हे समजण्या एवढी शारीरिक, मानसिक शक्ती बाबांना नव्हती. ते दुपारपासून उपाशी , उभ्या-उभ्याच धावपळ , चिंता , मदत सगळंच करत होते. मोठा सुस्कारा सोडत आणखी एक सिगरेट पेटवत ते म्हणले "मी जरा जास्तच कडक सूनावलं मांजरेकरला" ते ऐकल्या बरोबर गोवर्धनदास साहेब ताडकन उठून बोलले , तू हे वाक्य आयुष्यात परत एकदा जरी बोललास तरी तू , तुझं संसार , तुझी पत सगळं डूबवशील. माझं ऐक पोरा ...एकच लक्षात ठेव .. जिंदगी कोणाच्या हातात नसते. जे झालं त्यात तुझी काही चूक नाही हे दिमागमधे फिट्ट कर. 
   त्यांनी आईला त्याच सूचना दिल्या की कोणाचा फोन आला गेला वगैरे गोष्टी नोंद करून ठेवा. आईने विचारण्याचा प्रयत्न केला की हे सगळं का? कशासाठी करायचंय , बुवा काय होणार आहे? त्यावर साहेब म्हणाले की काही झालं नाही तर चांगलंच आहे. मग हसून , गप्पा मारून , मला काजू चिक्की चं पाकीट देऊन ते गेले.
   मी तर फार लहान होते ....ताई माझ्या हून सहा-सात वर्षे मोठी !! तिला गांभीर्य कळलं होतं. आई पण चिंतेत होती. बाबा मात्र रात्री थकून असे काही झोपले होते ...अगदी घोडे बेचके👍
     पुढले दोन-तीन महिने तरी ही अशी गाढ झोप त्यांच्या वाट्याला आली नाही. ...असं आई सांगते. बाबा या काळाबद्दल बोलायचे किंवा सांगायचे तेव्हा समुद्रसफर करून सुखरूप घरी पोहोचलेला सिंदबाद असाच दिसला असेल असं मला वाटायचं 😄
   शनिवार , रविवार गेला !! सोमवारी संध्याकाळी मांजरेकरच्या पुतण्याचा फोन आला ....त्याने बाबांवर आणि कंपनी वर केस करणार आहे ..असं कळवलं !! सगळं सामोपचाराने व्हावं असं वाटतं असेल तर आधी मिटिंग करूया असं म्हणाला !! 🙁
    या फोन नंतर बाबांनी सर्वात आधी गोवर्धनदास साहेब आणि नंतर गजूकाका (बाबांचा सख्खा मोठा भाऊ) यांना फोन करून घडलेल्या गोष्टी सांगितल्या. पुढले काही दिवस बाबांचं सगळंच .. सुख , चैन , केलेली चांगली कर्म , पूर्वसंचित (याच जन्मातली) , नातेवाईक , मैत्र ...सगळंच पणाला लागलं.
    कसं काय घडल्या पुढच्या गोष्टी? कोर्ट-कचेरी झाली की नाही? केस नक्की काय केली गेली? त्यातनं रस्ते कोणी कसे काढले? ...वाचत रहा.

#PradnyaSubodhAhire
#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग१०

  बाबांच्या कामाच्या साईटवर त्यांच्या वाढदिवशीच घडलेला जो प्रसंग पुढं येणार आहे ..तो त्या क्षणी चित्तथरारक वगैरे नव्हता. पण त्याचे खूप वाईट पडसाद त्यांच्या व्यवसायात उमटले, बाबांना-आईला अत्यंत मनस्ताप देणारे ठरले.
  आता व्यवसाय स्थिरावला होता. कंपनी , कामं आणि माणसं ही गाडी ठराविक गतीने पुढे पुढे जात होती. संघर्षाच्या वर्षांत , आर्थिक स्थैर्य नसणाऱ्या काळात बाबा कमी-अधिक प्रमाणात त्यांच्या अटी शर्तींवर काम करू शकले कारण माझी आई खमकी होती. ती नोकरी , घर आणि दोन मुली ..अशा तीनही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होती.
  गाठीला चार पैसे , रूळलेली व्यवसाय व संसाराची गाडी यावर विसंबून दोघांनी ठरवलं की मुलींचं आरोग्य, अभ्यास आणि संस्कार याला महत्त्व देत आईने नोकरी सोडावी. तिला पेन्शन मिळणार आहे हे कळल्यावर आजी (वडीलांची आई) म्हणाली .."वा , छान!!तुला साडी चोळी ला याच्यापुढे हात पसरायला नकोत" 😂😂 मला आणि ताईला हा प्रसंग आई अनेकदा प्रेमाने सांगायची की सासूला सुद्धा सून आत्मनिर्भर असणं महत्त्वाचं वाटलं होतं. असो ...विषयांतरा बद्दल क्षमस्व😊
   खरं असं होतं की मी फारच मस्तीखोर आणि सतत धडपडणारी आणि धावरी मुलगी होते, शाळेतून जवळपास रोज निरोप येत , ताई ला चांगले मार्क्स मिळवण्याची इच्छा होऊ लागली होती आणि वरच्या इयत्तांच्या अभ्यासात मदत लागू लागली होती. आईला office मधे increament आणि promotion तर मिळालं असतं पण... त्यापाठोपाठ त्रासदायक राजकारण येऊ घातलं होतं ज्यामुळे ती मेटाकुटीला आली होती.
  हे सर्व सांगायचं कारण एवढंच ..की आता पहिल्या प्रथमच माझे बाबा व्यवसाय आणि संसार एकट्याने पेलण्याकरीता सज्ज झाले होते. फाजिल नव्हे तर अनुभवाने आलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर , कष्टाने जमवलेल्या घडवलेल्या माणसांच्या भरवशावर त्यांनी हे करायचं ठरवलं होतं. खरं तर हे सगळं ते already करत होते ..... सायकल ला नाममात्र लावलेला हाताचा टेकू अलगद बाजूला व्हावा आणि सायकल विनासायास चालवत रहावं ...अशा सारखं होतं हे सगळं!!
   पण!! माणूस जसं ठरवतो ते आणि तसंच दर वेळेस होतं असं काही नाही 😀. एखादं वर्ष आई ने रिटायर होऊन झालं असेल. शुक्रवार होता , बाबांचा वाढदिवस होता. आमच्या कडे वाढदिवसाचं फारसं कोणाला कौतुक नसायचं ...कोणाचेच बड्डे वगैरे करायची प्रथाच नव्हती. म्हणजे केक वगैरे तर नाहीच ..पण मला कोणाचं औक्षण वगैरे केलेलंही आठवत नाही. (पुढं मग मी माझ्या वाढदिवसाला मी स्वत:च  खूप्पच खुश  रहाण्याची , मीच माझं कौतुक करण्याची प्रथा पाडली 😉😁😂. असो.)
   बाबांचा दिवस नेहमीप्रमाणे उगवला, एका मोठ्या फॅक्टरीच्या मोठ्या साईटवर बाबा सब-काॅन्ट्रॅक्टर होते. ( वेगवेगळ्या कामातील स्पेशालिस्ट वेगवेगळे काॅन्ट्रॅक्टर असतात...प्रत्येक जण मुख्य contractor कडे टेन्डर भरत असतो.) ते जरा त्रासलेही होते. ज्या वेगाने आणि वेळेत ठरलेलं काम व्हायला हवं तसं ते होत नव्हतं.
   मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टीत तरबेज असणारी वेगवेगळी माणसे कायम स्वरुपी म्हणावीत अशी होती. काही होते ..जे चार दिवस बाबांच्या साईटवर काम करत आणि पुढले दोन वा चार दिवस दुसऱ्याही एखाद्या शेटची साईट किंवा स्वत:ची घेतलेली कामेही करून येत. अशा लोकांचे 'रोज' एखाद्दोन दिवसांसाठी कापले जात नसत scalene मधे!!
   पण मांजरेकर नावाचा माणूस जवळपास आठ दिवस आला नव्हता ..त्या दिवशी आला तो ही अकरा वाजे नंतर ....बाबा कधी नव्हे ते जरा गरम झाले. ते तापट होते, पण माणसे , दांड्या , अंगावर पैशांची उचल वगैरे बाबतीत ते कमालीचे सहनशील होते. की माझं काम अडकून रहात नसेल तर 'खाली टाईम' चा वापर करा स्वत: साठी बुवा!! त्यांनी मांजरेकर मामांना जाब विचारला. तुमच्या जागी वेगळा माणूस तजवीज करावी लागते, त्या करता लोकाकडे शब्द खर्चावा लागतो ( obligation नको वाटायचं त्यांना ...कारण वेळेला आपली चांगली माणसे दुसऱ्याला द्यावीही लागतात 😄) नेमलेला मानुष्य आणि शिवाय तुमचाही 'रोज' द्यायचा ...हे मला कसं परवडणार? असा सवाल बाबांनी मामांना केला.
  मामा गयावया करून म्हणले की त्यांची तबियत बरोबर नसल्याने ते आठ दिवस आले नाहीत. फोन केला नाही कारण एक रुपयाची नाणी नव्हती PCO मधे टाकायला 🤦
    "तुमची तब्येत बरी नसेल तर तुम्ही आज पण घरी जा. .. नाही मला काही ऐकायचे नाही. आराम करा. #माझी_जिम्मेवारी_नाही.उद्या या. आज अर्धा दिवस उलटला आहे ...आजचा रोज पूरा मिळाचा नाही." 
      वरील संवाद सर्व माणसं , काळेले नावाचे सुपरवायजर यांच्या समक्ष झाला होता. नंतर काही वेळातच कंपनीतून जेवणाच्या सुट्टीचा भोंगा झाला. बाबा , काळेले , वैद्य आणि गोवर्धनदास नावाचे एक वयस्कर मोठे साहेब एकत्र गप्पा करत कंपनी बाहेर जाऊन चहा पाणी सिगरेट आणि काही बाही खाण्यात गुंतले !!! पंधराच मिनिटे झाली असतील ...तोच ओरडा आरडा , खरे शेट च्या नावाचा जोरदार पुकारा ... समोरून बाबांची माणसं ..विजय , नथू आणि महाराज ..धावत आले.
  "शेट , मांजरेकर मामाच्या छातीत कळायली. आता नाडी लागत नाही. "

😑😑😑😑😑😑😑

#PradnyaSubodhAhire


#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग९

  Contractor म्हणून स्वतंत्र लहान-मोठी कामं करतानाच वेगवेगळ्या ठिकाणी , मोठ्या कंपन्या, इंडस्ट्री, केमिकल फॅक्टरी अशा ठिकाणी सब-काॅन्ट्रॅक्टर म्हणून कामे मिळणं हे हुरुप वाढवणारं , पैसा आणि अनुभव .. दोन्ही देणारं असायचं.
  बाबांनी अगदी सुरवातीच्या काळात BPT(Bombay Port Trust) आणि हर्डिलिया केमिकल्स ...अशा आणखी ही ठिकाणी काही महिने कालावधी च्या नोकऱ्या केल्या. ते permanent झालेही असते पण त्यांना स्वत:चा व्यवसायच करायचा होता, त्यामुळे कायम नोकरीसाठी प्रयत्न केलाच नाही.
  जून्या office मधील एक सहकारी ...मिस्टर पै !! हे बाबांना अचानक ट्रेनच्या प्रवासात भेटले. 'स्लज काढण्याचे टेंडर निघत आहे.' या वर पुष्कळ चर्चा झाली. गमती गमतीत शिअर इमॅजिनेशन करत ...पण तांत्रिक दृष्ट्या अचूक पद्धतीने तेही मोठी मशीनरी / पंप न वापरता हे काम मी आणि माझी माणसं असू तर कसं करू!! हे बाबांनी पै ना समजावलं. 😊
   चार दिवसांनी 'खरे , तू हे टेंडर सिरियसली भरतो का? ' असा पै काकांचा फोन आला ; बाबांनी टेंडर भरलं ; आणि मग एका मोठ्या मुलाखती नंतर ते टेंडर आणि प्लॅन पास!!!
   कंपनी ला कित्येकपट कमी खर्चात काम करून मिळालं. पै काकांचा भाव वधारला (त्यांना कमिशन मिळालं , नोकरी च्या ठिकाणी हितशत्रू ही निर्माण झाले. 😑) बाबांना खूप आव्हानात्मक काम मिळालं. पैसे मिळाले , दांडगा अनुभव मिळाला , कल्पना प्रत्यक्षात आणू शकतो ..हा आत्मविश्वास मिळाला. पुढे सतत हे काम scalene लाच मिळत राहिलं.
   पण ...याच साईटवर बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशीच नेमका सदाशिव चा अपघात होणार होता. त्याचा जीवच जायचा !! काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
   मोठ्या पाईपलानमधे उतरून , खूणा केलेल्या काठ्या वापरून , चक्क aluminium च्या बादल्या , कंटेनर्स वापरून बाबांची माणसं घाण पाणी/ साॅलिडीफाईड झालेला कचारा / वर तरंगणारे oily chemicals वगैरे काढून टाकत. ड्रेनेज साफ करत. तोंडावर घालायला हेल्मेट असायची. ही अग्निशमनदलाकडून आणि ज्यांचं काम होतं त्या कंपनी कडूनच मिळायची.
    पाईप मधे फक्त माणसंच नाही तर बरेचदा बाबा स्वत: उतरायचे. सूचना द्यायचे , सुपरवाईज करायचे. शर्ट आणि पॅन्ट काढून माणसांच्या कपड्यांबरोबरच लटकवून देत. वाटेल तिथे कपडे लटकवल्यामुळेच  आमच्या घरात एकदा ढेकूण शिरकाव करणार होते 😂 म्हणून आई भयंकर कावली होती. बनियान आणि हाफ पॅन्ट वरच्या 'खरे शेट' ला पाहून पै काकांना त्रास वाटायचा!! पण बाबांना माणसांची काळजी असायची!! आणि ती अनाठायी नव्हती.
    सदाशिव तब्ब्येतीचा उन्नीसबीस असूनही या कामात विशेष तरबेज होता. म्युनसिपालटीच्या मैल्याच्या पाईपपेक्षा हे खूप 'बेस' आहे असं म्हणायचा. त्याला अनुभव जास्त! तोच आधी आत उतरायचा. तसाच उतरला होता. पण त्या दिवशी नक्की काय झालं ते त्यालाही कळलं नाही. तो आत गेला ...तो बाहेर येईचना!!! बाबांना लगेच गडबड जाणवली. ते पण आत होते!! आणि त्यांना सदाशिव चे केस दिसत होते खाली ..पण हालचाल दिसेना! बाबा दोरी खेचून ठरलेल्या खूणा करत होते पण हा काहीच प्रतिसाद देईना.
  बाबांना भीतीने घाम फुटला आणि घसा कोरडा पडला एवढा ..की वर बघून ओरडत होते तो आवाजही फूटेना!! आपल्या तोंडावर हेल्मेट आहे , हे लक्षात आलं आणि ते कसंबसं त्यांनी ओढून काढलं, ओरडून वर आवाज दिले.
   सिक्योरिटी गार्ड‌‌‌ साईटवर कायम तैनात असणं ..हा नियमच होता. हा गार्ड पण विशेष प्रशिक्षण दिलेलाच असतो. पुढल्या काही मिनीटात हालचाल करून बाबांना आणि सदाशिव ला बाहेर काढलं. बाबा सुरक्षित खोलीपर्यंतच उतरले होते ...प्रश्न सदाशिवचा होता.
   सदाशिव व्यवस्थित शुद्धीवर होता. त्याला खाली गेल्यावर 'पंजन्ट आॅडर' ...(chemical gas strong smell) मुळे जोरदार शिंक आली आणि नाकापासून पार डोक्यात झिणझिण्या गेल्या. हिसका बसल्याने कमरेचा बेल्ट सैल झाल्याची त्याला शंका आली. पाईपच्या दोन्ही बाजूला ..डाव्या बाजूला गुढगा , डावं कोपर आणि दूसऱ्या पायाचं पाऊल दुसऱ्या बाजूला रोऊन पट्ठा तोल सावरत न हलता-डूलता थांबून राहिला.
   दोर हलवून इशारा करायला हातच मोकळा नव्हता बिचाऱ्याचा 😄.. आणि हेल्मेट शिंकल्यामुळे बरबटून गेल्याने हा डोकं पण न हलवता स्टॅच्यू केल्यासारखा स्तब्ध राहिला 😂
   त्याला बाहेर काढला , नंतर ताण निवळला खरा!! पण सदाशिव धोकादायक डिपनेस पर्यंत पोहोचला होता , तिथे प्राणवायू कमी पडला असता , विषारी वायू वगैरे असले असते तर सगळंच कठीण होतं.
   हे वर्णन अगदी अचूक आणि तंतोतंत असेल असं नाही. घडलं तेव्हा थोडंफार कानावर पडंलंय. नंतर मी बाळंतपणात घरी रिकामी असायचे तेव्हा बाबांकडून बऱ्यापैकी संगतवार ऐकलं. तेव्हाच छान लिहून ठेवायचं का नाही सुचलं मला! 🙁 
असो.
    सदाशिव ने बाबांना दोषही दिला नाही , कामही सोडलं नाही किंवा स्वभावही सोडला नाही. 😄तो अपघात जीवावर बेतता ..तर सदाशिव चा जीव , बाबांचं करीअर , पैंची नोकरी वगैरे सगळ्यावर गंडांतर होतं!!
   बाबांचा 'असा' साजरा होणारा हा एकच वाढदिवस नव्हता!! योगायोगाने पुढेही काही वेळा नेमक्या वाढदिवसाच्याच दिवशी अशा काही गोष्टी घडल्या ...की शेवटी आई ने 'वाढदिवसाच्या दिवशी काम बंद' असा नाॅन - अपिलेबल फतवा काढला आणि आम्हाला दिवाळीच्या आसपास बाबा घरातच सापडू लागले ..😄 ऐन दिवाळीत घर उघडे पाहिजे वगैरे गोष्टी फाट्यावर मारत 😜 आमची पुणे-महाबळेश्वर वारी पण होऊ लागली.

#PradnyaSubodhAhire

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग८

  सदाशिव म्हणजे एक शेलका नमुना होता!! त्याचं वय सांगणं मुश्किल. पांढरा फटक दिसायचा. अॅनिमिक होता. डोक्यावरचा केस न् केस पांढरा , ते केसही डोक्यावर टोपलं ठेवल्यासारखे दिसायचे. डोळ्यांच्या पापण्या पण पांढऱ्या!! पांढरं भूत!!
  दारू खूप प्यायचा. डोळे दारूने आणि झोप न झाल्याने क काय ..लाल लाल दिसायचे. अवतार भूताटकी असला तरी सदाशिव चं वागणं मात्र अतिशय मर्यादशील होतं. घरी वरती शेटनी पाठवला की हळू कडी ठोकून लांब जाऊन उभा राही. आम्ही 'या आत' म्हटलं की जर्राही आवाज न करता हवी ती हत्यारं गोणपाटात गुंडाळून रस्सी बांधून घेऊन जाई.
  त्याचे हात थरथर थरथर कापायचे ....मी टक लावून बघत नवल करायचे की इतकी घट्ट रस्सी बांधता तरी कशी येते त्याला!! मला आणि ताईला छोटी बेबी , मोठी बेबी ...असं म्हणायचा पायंडा त्यानेच पाडला. 😊
   बाबांना खूप घाबरायचा. दारू पिऊन कामाला यायचं नाही ..अशी बाबांची सख्त ताकीद होती. बाबा म्हणायचे की हा दारू साठीच काम करतो xxx 😅. बाबा त्याचे काही पैसे पोस्टात टाकायचे. नाही तर सगळ्याची दारू पील म्हणायचे.
   तरी कधी कधी हा संध्याकाळी चहा च्या सुट्टीत गायब व्हायचा तो परत उगवत नसे 😄 मग बाबा घाल घाल शिव्या घालत दुसऱ्या दिवशी 😂. कामाच्या ठिकाणी बरेचदा फूटके नळ , गंजके पाईप , इतर भंगार सामान जमा व्हायचं. नियमाने याची विल्हेवाट contractor ने लावायची असते. वेगवेगळ्या प्रकारचं scrap वेगवेगळ्या प्रकारे डिस्पोज करावं लागत असे.
   या स्क्रॅप ला पाय फूटले ...की समजून जायचं ... सदाशिवची करामत आहे 😂 रद्दीचे पैसे मिळाले की हा नवटांक मारून बसेल घरीच!!! हा कयास करून ..बाबा, नथु , विजय वगैरे सगळेच हसायचे. पण दारू पिऊन साईटला यायचं नाही ...हे मात्र सदाशिव कसोशीने पाळत असे. नाही तर बाबांकडे टिकलाच नसता!
  साध्या , निरुपद्रवी सदाशिव चा बाबांच्या साईट वर विचित्र अपघात होता होता राहिला!! काळ आला होता पण वेळ आली नव्हती ...असा हा प्रसंग! सदाशिव चा जीव , बाबांची करीअर , मोठ्या कंपनीचं नाव आणि कामावरच्या माणसांचं भवितव्य पणाला लागलं ....पण पण ... यातून सगळेच सहीसलामत बाहेर ही पडले 😄
  अपघात का आणि कसा घडणार होता , कसं सगळं निभावलं ...हा प्रसंग उद्या!! 😊

#PradnyaSubodhAhire

#बाबा_आणि_त्यांची_माणसं
#भाग७

  ट्रक चा चालक म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते पंजाब दे पुत्तर!! ...हिंदी सिनेमा चे गारूड , बाकी काही नाही. 😄 पण तसं नाही. हिम्मतलाल , मगनलाल वगैरे बाबांचे ठरलेले मालवाले होते आणि त्यांच्याच माध्यमातून काही राजस्थानी ट्रकवाले बाबांच्या संपर्कात आले. ट्रक कधी मालकीचा असायचा तर कधी भाड्याचा!!!
  मोठमोठे कडाप्पा , संगमरवरी लाद्या , ग्रॅनाईट चे ओट्याचे दगड यांच्या ट्रकमधून मुंबईत येत. धोतर किंवा लुंगी , त्यावर जाळीवाले बनियान , डोक्याला मुंडासे असायचे. अंगकाठी काटक!!
   या लोकांकडे मनगटा एवढे जाड दोरखंड , लोखंडी पुलीज् ,   फल्क्रम बदलता येतील अशा levers  वगैरे अद्भुत वस्तू (बाबा त्या गोष्टींना अद्भूत म्हणायचे 😂) असायच्या ... आणि अवजडातलं अवजड सामान हे लोक लिलया दहा मजली इमारती मधे चढवत असत.
   पवईला टाईल्स् फॅक्टरीची काही कामं , एका प्रतिथयश हाॅटेलच्या कामात मोठाल्या अवजड फर्निचर वगैरे गोष्टी चढवण्याचे काम , कडाप्पा फरशा वगैरे चे काम ....बाबांमुळे त्यांना मिळाले.
    हे लोक पैसे advance घेत नसंत कारण महागडा माल ट्रकवर असे. माझ्या वडिलांची पद्धत contract करून घेण्याची असे. समजावणं मुश्कील आहे. एखादं काम ठरलं , ते किती आणि काय स्वरूपाचं हे ठरलं की एकच काय रक्कम ठरवायची. जसं जसं काम पुढे सरकलं तसं तसं पैसेही देत जायचं... बाबांकडून हा ट्रकवाला त्याच्या कडच्या 'अद्भूत हत्यारांचा' वापर जास्त innovative पद्धतीने करायला शिकला. फक्त हे इथून ने आणि तिथे रिकामं कर ...यापेक्षा वेगळ्या प्रकारची कामं मिळवू लागला. त्याने एकदा 'प्रसाद' म्हणून लाल कापड ...(बहुदा देवी वगैरे चा प्रसाद असावा) , रेवड्या आणि अक्रोड पाठवलेले. 
   पुढे ..बाबांनी व्यवसाय बंद करून ..त्यातही मोठी महत्त्वाकांशी कामं कमी करून काही वर्ष उलटली होती. फोन नंबर्स चं तंत्र बदललं होतं. Landline आठ आकडी असायचे ते दहा आकडी झाले , landline कमी होऊन pagger mobile चा जमाना आला!!
   माझ्या घराचं शिफ्टिंग सुरू असताना मोठाले बेड , लाकडी अवजड युनिट दरवाज्यातून आणि चिंचोळ्या जिन्यातून उतरवणे आणि नवीन घरी हलवणे ...या विचारानेच नवरा , दिर गळपटले! बाबांनी "काय माहीत... संपर्क होईल क नाही, निरोप ठेऊन पहातो ...ओळखलंन माझं नाव तरी खूप म्हणाला हवं" वगैरे पुटपुटत दोन-तीन ठिकाणी निरोप-नंबर दिला.
    अक्षरशः तीन तासांत 'अजमेरवाला बोलता हूं खरेसाप! किधर पहूंचना है?' ...असा फोन आला आणि दोरखंड लावून कधी व्हरांड्याच्या मोठ्या खिडकीतून बेड, कपाट , फ्रिज , लाकडी युनिट खाली उतरले ...नव्या घरी पोहोचले ...कळलंही नाही. 😄 त्यांनी लोखंडी कपाटावरची माझी magnet वाली चिकटवायची फूलं पण सांभाळून परत कपाटाला चिकटवली. 😂. मेहुण्या सोबत भागीदारीत तीन ट्रक ,विटांचा आणि टाईल चा कारखाना वगैरे प्रगती ऐकून बाबाना ही मजा आली!!!

#PradnyaSubodhAhire